आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोधडी ते क्विल्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याकडच्या पारंपरिक गोधड्या तयार करण्यासाठी जे तंत्र वापरतात त्या तंत्राचा व्यावसायिक अभ्यास करून ‘क्विल्टिंग’च्या क्षेत्रात सातासमुद्रापलीकडे नावलौकिक मिळवणाऱ्या कलाकार म्हणजे पुण्याच्या कालिंदी हंबीर.
सुरुवातीला काहीशा अनिच्छेने शिवण क्लासमध्ये रुजू झालेल्या कालिंदीताईंचा एका इंटरनॅशनल शिवणमशीन कंपनीच्या ब्रँड अॅम्बॅसॅडर होण्यापर्यंतचा हा प्रवास...

सुरकुतलेली काया, तिची नभाएवढी माया
गोधडीमध्ये सापडते, माझ्या आजीची गं छाया!
‘गोधडी’ या शब्दांतच माया भरलेली आहे. आजीच्या नेसून जुन्या झालेल्या साड्यांमधली ती प्रेमाची ऊब दुसऱ्या कुठल्याही उंची वस्त्रात सापडणार नाही. काटकसरीतून जन्माला आलेल्या या गोधडीला कलात्मकतेची जोड मिळाली आणि कालांतराने या कलेत हळूहळू बदल होत गेले. जागतिक पातळीवर ही कला ‘क्विल्ट’ या नावाने ओळखली जाते. पूर्वी रोजच्या घरगुती उपयोगाबरोबरच लग्नसमारंभात, बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा परगावी जाणाऱ्या माणसाला गोधडी देण्याची प्रथा होती. परंतु अलीकडे या कलेला अधिक व्यापक स्वरूप आलं आहे. कुशन्स, बॅग्जपासून, भिंतीवर टांगायच्या शोभेच्या वस्तूंपर्यंत विविध माध्यमांमध्ये क्विल्टचा वापर झालेला दिसतो. या कलेला व्यावसायिकतेची जोड देत यशोशिखरावर पोहोचणाऱ्या भारतीय महिला कलाकार दुर्मीळच. यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे कालिंदी हंबीर.
पुण्याच्या अभिनव महाविद्यालयातून कालिंदीताईंनी जी. डी. आर्ट (रेखा व रंगकला पदविका अभ्यासक्रम) हा डिप्लोमा पूर्ण केला आणि ‘पोर्ट्रेट पेंटिंग’ या विषयात स्पेशलायझेशन केलं. लग्नानंतर गृहिणीची भूमिका बजावत असताना त्यांना पेंटिंग करण्यासाठी फारसा वेळ हाती उरत नसे. पण जो काही थोडासा वेळ मिळे त्याचा सदुपयोग करण्यासाठी त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांना शिवणक्लास सुरू करण्याचा सल्ला दिला. अनिच्छेने त्या शिवणाच्या क्लासला जाऊ लागल्या. या दरम्यान वेगवेगळी कापडं हाताळली गेली. कशिदा, भरतकाम, पॅचवर्क अशा एका मागोमाग पायऱ्या त्या चढत गेल्या आणि त्यातून आपल्या मुलांसाठी दुपटी, मुलांचे कपडे, स्वतःसाठी काही ड्रेस अशा कलाकृती निर्माण होत होत्या. कालांतराने त्यांच्या यजमानांच्या कामानिमित्ताने हंबीर कुटुंब तीनेक वर्षांसाठी चीनमध्ये स्थायिक झालं. तिथे कालिंदीताईंनी ‘बेसिक्स ऑफ क्विल्ट’ हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्या सतत वेगवेगळ्या क्विल्ट प्रदर्शनांना भेटी देत. त्यात सहभागी होत. क्विल्ट तयार करण्याची पद्धत, रंगसंगतीची कॉम्बिनेशन्स, डिझाइन्स हे सगळं पाहून त्यांच्यातला पेंटरसुद्धा जागा झाला आणि त्यांनी पेंटिंग आणि क्विल्ट यांचा सुंदर संगम साधायचं ठरवलं.
लेखातील चित्रामधले मकाऊ पोपट हे पेंटिंग नाही, ते क्विल्ट आहे. त्यात त्यांनी कापडावर पेंटिंग करून त्यावर क्विल्ट केलं आहे. तर यंत्राचा वापर करून संपूर्ण धाग्यापासून देवीची प्रतिमा साकारली आहे. एखाद्या चित्रामध्ये चित्रकाराने शेड्स तयार कराव्यात इतक्या हुबेहूब तुम्ही हे चित्र कसं साकारता, असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “एखाद्या क्विल्टसाठी शेड्सच्या स्मूथ ट्रान्झिशनची गरज असेल तर मी स्वतः त्या त्या रंगछटा मिळवण्यासाठी कापड रंगवून घेते आणि मग क्विल्टमध्ये वापरते. मग त्यावर पॅचवर्क करणे आणि मग क्विल्टिंग करणे अशी मोठी प्रक्रिया यामागे आहे. माझ्याकडे कोणीही मदतनीस नाहीत. जेवढं काम एकटीला करणं शक्य होईल तेवढ्याच ऑर्डर्स मी घेते.”
प्रत्येक कलाकाराचं काहीतरी स्वप्न असतं, कुठलीतरी इच्छा असते. बाबा आमटेंच्या आनंदवनात जाऊन तिथल्या लोकांना क्विल्टिंग शिकवावं, अशी कित्येक वर्षांपासून कालिंदीताईंची इच्छा होती. पण योग जुळून येत नव्हता. अशातच एक दिवस त्यांना फेसबुकद्वारे आनंदवनाशी संलग्न असलेल्या बाईंचा मेसेज आला की, आनंदवनात राहणाऱ्यांना क्विल्टचं शिक्षण द्यायचं आहे. त्यासाठी आमच्या एका प्रतिनिधीला तुम्ही हे ट्रेनिंग द्याल का? कित्येक वर्षांपासून मनात दडलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी संधी समोरून चालत आली म्हटल्यावर कालिंदीताईंनी लगेचच त्यांना कळवलं की, तुमच्या प्रतिनिधींना तर मी शिक्षण देईनच, पण मी स्वतः तिथे येऊन प्रशिक्षण देईन. या वेळची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, “आनंदवनातल्या काही अपंग आणि गतिमंद मुलांना मी क्विल्टिंगचं शिक्षण देत होते. त्या वेळी पोलिओने ग्रस्त असलेली दोन मुलं आपल्या एका हाताने स्टिचिंग करत होती आणि एका हाताने मशीनचं पॅडल चालवत होती. अतिशय सुंदर कलाकृती तयार झाल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यातून मला मिळालेलं समाधान यांचं शब्दांत वर्णन करता येणार नाही. तिथल्या सगळ्याच लोकांनी अगदी एक-दोन दिवसांतच आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे वेगवेगळ्या डिझाइन्स तयार करून आणल्या होत्या.
ऐंशीहून अधिक देशांमध्ये शाखा असलेल्या ‘बर्नीना’ या आंतरराष्ट्रीय स्विस कंपनीच्या त्या ब्रँड अॅम्बॅसॅडर आहेत. बर्नीना ही कंपनी शिवण, क्विल्ट करण्यासाठी लागणारी मशिन्स तयार करते. याच वर्षी या कंपनीच्या कॅलेंडरसाठी कालिंदीताईंनी केलेल्या थ्रेड पेंटिंगचा फोटो निवडला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोर्ट्रेट कालिंदीताईंनी धाग्यांचा वापर करून साकारले आहे. त्याचप्रमाणे या वर्षी ‘दुबई इंटरनॅशनल क्विल्ट शो’मध्ये ‘थीम’ या कॅटेगरीमध्ये द्वितीय पुरस्कार तसेच ‘जजेस चॉइस पुरस्कार’ आणि अमेरिकेतील उटा येथे झालेल्या एचएमक्यूएस स्पर्धेत विशेष पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. क्विल्टिंगच्या क्षेत्रात पुरस्कार मिळवणाऱ्या त्या भारतातल्या पहिल्या महिला ठरल्या. त्याचप्रमाणे यंदा त्यांनी अमेरिकेतील ह्यूस्टन येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी कलाकृती पाठवली असून ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली आहे. या स्पर्धेसाठी कलाकृती निवडली जाणं, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, असं त्या सांगतात. याशिवाय वर्ल्ड क्विल्ट फेस्टिवल ऑफ शांघाय, ओपन युरोप क्विल्ट चॅम्पियनशिप, द अॅन्युअल जज शो, ह्यूस्टन या प्रदर्शनांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत. कालिंदी हंबीर यांची क्विल्टिंगच्या क्षेत्रातली घोडदौड अशीच सुरू राहो आणि भारतातच नव्हे तर जगभरात क्विल्टिंगच्या कलेचा प्रसाराचं त्यांचं स्वप्न पूर्ण होवो, हीच सदिच्छा!
bhaktiathavale06@gmail.com
बातम्या आणखी आहेत...