आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथांची मोहिनी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काउंट ऑफ मॉन्टेक्रिस्टो’ या नावाचं इंग्रजी पुस्तक तुमच्या कुमारवयात अपरिहार्यपणे तुमच्या मनाच्या दारावर टकटक करत असतं. या ठोठावण्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येतच नाही. अठरा वर्षांचा आपला वीरकथानायक चांडाळचौकडीच्या कारस्थानाचा बळी होऊन जन्मठेपेच्या शिक्षेत अडकला आहे. समुद्राच्या मधोमध असलेल्या कुठल्याशा पुराण्या किल्ल्यात कैदी म्हणून त्याची रवानगी झाली आहे. तो अन्यायाने अडकवलेला आहे आणि त्याची सुटका झाली पाहिजे, असं तुम्हालाही वाटतं आहे. पुस्तक दोन्ही हातात घट्ट धरून, इंग्रजी भाषेशी लढा देत, तुम्ही या आपल्या वीरनायकाबरोबर
त्या किल्ल्यावर अंधारकोठडीत जाऊन पडला आहात. येथे आलेला कैदी मेल्याशिवाय सुटूच शकत नाही, अशी कु-ख्याती. आणि अठरा वर्षांच्या उमद्या कथानायकाने तर अजून जगायला सुरुवातच केली नाही. तो सुटला पाहिजे, असं आपलंही ठाम असं मत. अनपेक्षितपणे, दुसर्‍या एका वृद्ध आणि विद्वान अशा कैद्याशी आपल्या वीरनायकाची अकल्पित आणि अद्भुत अशी भेट होते. मग त्या कैद्याने त्याला दिलेलं शिक्षण आणि गुप्त खजिन्याची दिलेली माहिती. वृद्ध कैद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कलेवराच्या जागी स्वतःला पोत्यात बंद करून आपल्या कथानायकाने करून घेतलेली सुटका, त्याचं समुद्रात फेकलं जाणं, पोत्यातून बाहेर येणं आणि जीव वाचवणं, हे सगळं श्वास रोखून आपण वाचतो. सुटकेनंतर अफाट खजिन्याचा त्याने घेतलेला शोधही रोमहर्षक असतो. कादंबरीकाराने समुद्राच्या मध्यभागी उंच खडकावर असलेला कोणता किल्ला काळकोठडी म्हणून नजरेसमोर ठेवला असेल, यावर संशोधन झाल्याचं मी वाचलं. आपल्या श्रेष्ठ कादंबरीकारांवर अशा सर्वांगीण पद्धतीने संशोधन होत नाही, ही खेदाची बाब आहे. आपल्या नाथमाधव इत्यादी रोमहर्षक कादंबरीकारांनी त्यांच्या कादंबर्‍यांसाठी कोणता भू-प्रदेश नजरेसमोर ठेवला असेल, हे कोण्या संशोधकाने सांगितल्याचं स्मरत नाही.

पण मग नंतर ‘अरेबियन नाइट्स’ नावाचा ग्रंथ भेटतो. हा ग्रंथ भेटणारच असतो. सन अठराशेच्या अखेरीस छापलेला, बारीक अक्षरातला दुर्मिळ असा मूळ ग्रंथ आमच्या घरीच होता, वडलांच्या संग्रहातला. या ग्रंथाची जादू वेळोवेळी विस्तारत राहिली. यातली पात्रं नाहीत तर हा ग्रंथच एखादा वीरनायक बनून आपल्या आयुष्यात येतो. गरजेनुसार आपण त्याचे बोट पकडायचे असते. नंतर तो ग्रंथ तुम्हाला अनोख्या दुनियेतून प्रवास करवून आणतो. संशोधक सांगताहेत की पर्शियन कथांमध्ये या कथांचा उगम असावा किंवा त्याही पूर्वीच्या प्राचीन भारतीय कथांमध्ये त्यांचा उगम असावा. ख्रिश्चन व मुस्लिमांमध्ये दोन शतकभर रक्तरंजित धर्मयुद्ध झालं. या धर्मयोद्ध्यांनी युरोपमध्ये, सिसिलीमधल्या पार्लेमो येथील ‘मूरिश सेंटर्स ऑफ कल्चर’पर्यंत किंवा ‘स्पेन’पर्यंत या कथा नेल्या असाव्यात, असं संशोधकांचं म्हणणं आहे. काही असलं तरी हा ग्रंथ आपल्यासोबत चालत राहतो.

आणि ‘कथासरित्सागर’ची भेट टाळता येतच नाही! उशिरा का होईना, या ग्रंथाची जादू स्वीकारावी लागते. या ग्रंथातून कोणी एक वीरनायक तुम्हाला भेटत नाही. कोणती एक गोष्ट तुम्हाला आठवत नाही. पण सगळा ग्रंथच वीरनायकाच्या स्वरूपात तुम्हाला दिलासा देण्यासाठी तुमच्याबरोबर वाटचाल करत राहतो. विद्वान व्यासंगी एकांतात जाण्यापूर्वी ‘महाभारत’ व ‘कथासरित्सागर’ हे ग्रंथ सोबत राहावेत, अशी इच्छा व्यक्त करतात, असं नंतर वाचनात आलं. रोमहर्षक वयातील सुरुवातीच्या वाचन-यात्रेत ‘कथासरित्सागर’ सापडलेला असतो. या बृहद‌्ग्रंथाचे गारूड मनावर पडलेले असतेच. याच कथांनी जगभरच्या संकलनांना प्रेरणा दिली-अगदी अरेबियन नाइट्सलासुद्धा-असं म्हणतात. पण हे सगळं नंतर. तुमच्या कुमारवयातल्या आधीच्या वाचनात हा बृहद‌्ग्रंथ तुम्हाला प्रभावित करून गेलेला असतोच. मूळ कथा, त्या मूळ कथेची उपकथा, उपकथेची कथा आणि उपकथेची पुन्हा उपकथा... अशी साखळी तुम्हाला गुंग करून टाकते.

‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक!’ ही गोष्ट किती जुनी असावी? कदाचित चक्रधरांच्या ‘लीळां’मध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. इतकी वर्षं होऊनसुद्धा ही म्हातारी विसरली जात नाही. कालप्रवाहात वाहून जात नाही. म्हणून मी तिला तिच्या गोष्टीत शोधण्याचा प्रयत्न केला. ही म्हातारी आपल्याला भेटलेल्या काही चिरंतन पात्रांमध्ये समाविष्ट होऊन गेलेली आहे. या लोककथेचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही विलक्षण हाती लागलं. मुलांसाठी मी एक नाटिका लिहिली, याच गोष्टीवर आधारित. ती नाटिका येथे सांगणं अशक्य आहे; मात्र, या नाटिकेच्या मी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही अंश येथे पुनर्मुद्रित करीत आहे. त्यातून हे म्हातारीचं पात्र अजूनही का जिवंत आहे आणि आपल्या संस्कृतीतून, आपल्या धमन्यांतून, आपल्या स्मरणातून का वाहतं आहे, याचा थोडासा उलगडा होईल. वाचन संस्कृतीमध्ये अटळपणे भेटणार्‍या विविध पात्रांचा परामर्श घेत असताना या म्हातारीची पण भेट आपल्याला घ्यावीच लागत असते. म्हणून त्या निमित्ताने या प्रस्तावनेतील काही भागांचे येथे पुनःकथन.

“...‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक!’ ही गोष्ट खूप जुनी आहे. नाटिकेतली म्हातारी म्हणते त्याप्रमाणे कितीतरी मुलं ही गोष्ट ऐकता-ऐकता मोठी झाली, आणि ही गोष्ट आपल्या मुलांना सांगता-सांगता म्हातारी झाली. काहीतरी कारण असल्याशिवाय कोणतीही गोष्ट अशी लोकस्मृतीमध्ये उगाचच कायम राहत नसते. ‘चल रे भोपळ्या...’ ही गोष्टही नामशेष झाली नाही, तेव्हा तिच्यात काहीतरी ताकद असणार.

मी या गोष्टीचा अन्वयार्थ लावू लागतो, तेव्हा मला ‘जरा आणि मरणाचा झगडा’ दिसू लागला. पण ही सामग्री मुलांच्या नाटिकेसाठी उपयोगी नसते, याचं भान ठेवून या मूळ गोष्टीत काही गमतीदार आणि आधुनिक काळाच्या संदर्भातले बदल करण्याचा प्रयत्न केला आणि ही नाटिका तयार झाली आहे...”

याच सुमारास ‘रॉबिन्सन क्रूसो’ येतो. अन्यायाची यालासुद्धा चीड आहे. त्याने आपली नमुनेदार अशी सेना तयार केलेली आहे. काही काळ ‘रॉबिनहूड’ची तिरंदाजी, त्याने केलेली साहसे तुम्हाला मोहिनी घालतात. पण हाही काही तुमचा पुढच्या वाटचालीतला कायमचा साथीदार नसतो. त्या वयात त्याची सोबत होत असते, हे मात्र खरं.

अलीकडे ‘रॉबिनहूड’वर संशोधन झालं आहे. अशा नावाची खरंच कोणी व्यक्ती होती, असं संशोधक म्हणतायत. जुन्या दस्तऐवजांमध्ये नावाची नोंद पण आहे म्हणे. त्याचं थडगंही शोधून काढलंय म्हणे. आपल्याकडल्या ‘तंट्या भिल्ला’सारखी ही काही ‘मिथ’ असावी. काही असलं तरी आपल्या कुमारवयाने ‘रॉबिनहूड’ला स्वीकारलेले असते, त्याच्या निपुण तिरंदाजीसह.
bjsasne@yahoo.co.in