आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bharat Sasne Article About Literature Books Reading

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाचन : एक अंतर्यात्रा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाचन म्हणजे जणू स्वतःचा शोधच असतो. आणि आत्मशोध ही अपरिहार्य अशी अन् बहुधा अंतिम अशी मनाची अवस्था आहे. सुदैवी माणसाला त्यामुळे आज ना उद्या वाचनाकडे वळावे लागते, आयुष्याच्या विविध टप्प्यांवर. वाचन माणसाला समृद्ध करते, दिलासा देते,-कदाचित जगणे सुसह्य करते. या वाचनसंस्कृतीचा धांडोळा ‘ऐसा दुस्तर संसार’सारखी गाजलेली पुस्तके लिहिणारे ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी या ‘अक्षरनामा’मध्ये घेतला आहे.


तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काही तरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत येणारी ‘वस्तू’ किती मौल्यवान आहे, किती अस्सल आहे, यावर वाचनाचा आनंद अवलंबून असतो. वाचताना तुमच्यातला-मनाच्या आत दडून बसलेला-अंधारप्रकाशातला वाडा जिवंत होतो. तुमच्या धमन्यांतून वाहतो. म्हणजे तुम्ही वाचता तेव्हा तुमच्यातला भूतकाळसुद्धा तुम्ही वाचता, कदाचित जगता. तुमच्यातले संस्कारसुद्धा तुम्ही वाचता. तुमचे तुम्ही पुन्हा एकदा जगून घेता. वाचता वाचता तुम्ही एखाद्या अगम्य अंतर्यात्रेत निघून जाता. किंवा कदाचित आत्मशोधाच्या प्रवासावर प्रयाण करता. वाचन म्हणजे जणू अात्मशाेधच असतो. आत्मशोध ही अपरिहार्य अशी अन् बहुधा अंतिम अशी मनाची अवस्था आहे.
* * *
अहमदनगरला असताना लहानपणी मी मित्राच्या जुन्या वाड्यात नेहमी जात असे. वाड्यात गूढ असा अंधार आणि प्रकाश पसरलेला असायचा. जुने खांब, जुने दगडी बांधकाम, छतातून उतरणारा प्रकाशचौकोन अशा काही मुद्रा मनावर स्पष्ट आहेत. तेथे खांबाला टेकून वृद्ध आत्याबाई बसलेल्या असायच्या. त्यांनी शिवलीलामृत इत्यादी वाचणं अपेक्षित असलं तरी त्यांच्याकडे एक मोठा ग्रंथ ठेवलेला असायचा. त्या तो ग्रंथ मन लावून वाचत. वृद्ध आत्याबाईंनी त्याही वयात इतकं रंगून जाऊन वाचणं, ह्या गोष्टीचं त्या वयात मला मोठं आकर्षण वाटायचं. तो ग्रंथ काय आहे, याचंही कुतूहल वाटायचं. नंतर शोध लागला. ती एक कादंबरी होती आणि कादंबरीचं नाव होतं ‘वीरधवल’.
‘वीरधवल’ नंतर माझ्याबरोबर वाटचाल करीत राहिला. सळसळत्या रक्ताचा हा वीरनायक मुळात राजपुत्र असला तरी त्याचे राज्य त्याच्या चुलत्याने गिळकृंत केले आहे आणि वीरधवलला मात्र त्याचे जन्मरहस्य माहीतच नाही; पण तो पराक्रमी आहे. त्याला दैवी मदतसुद्धा मिळते आहे. कधी तो ‘वंगबंधूं’च्या कैदेत सापडतो, तर कधी तळघरात अडकतो. तुमच्या शहाऱ्यातून खिंकाळतो. वीरधवल सद््गुणी आहे. स्वतः सज्जन आहे आणि सज्जनांची साथ देतो. त्याचे मित्र त्याला संकटातून सोडवायला येतात, तेव्हा त्यांच्यासोबत तुम्हीही गुप्तपणे गेलेले असता. तुम्हालाही वीरधवलला संकटातून सोडवायचं असतं. भलेही, ‘वीरधवल’ ही कादंबरी परदेशी कृतीवर आधारलेली-रूपांतर केलेली असो, तुम्हाला त्याच्याशी काही देणंघेणं नसतं. ‘वीरधवल’ तुमचा असतो आणि तुमचा राहणार असतो. कुमारवयात तुमच्या वाचनसंस्काराची ही एक देणगी असते.
* * *
हे मी जरा पुढचं सांगतो आहे. त्या आधी, कुमारवयात आणि वाचनाच्या प्रवासात तुम्हाला अन्य मित्र भेटलेले नसतात, असं मात्र नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला सिंदबादला विसरता येत नाही. केव्हा तरी काही सुदैवी चमत्कार होऊन सिंदबादच्या सात सफरींवर तुम्हीही प्रवासाला निघता आणि न पाहिलेला खवळलेला समुद्र आपल्या अंगावर घेता. जहाज बुडाल्यानंतर सुदैवी सिंदबादबरोबर तुम्हीही एकाकी बेटावर जाता आणि गुहेत लपल्यानंतर सर्वांगावर सोनेरी केस असलेले प्रचंड भुजंग पाहता. भयभीत होता. सिंदबादने या संकटातून सुखरूप बाहेर पडावं, असं तुम्हाला वाटतं. कारण त्याच्या सोबतीने तुम्हीदेखील त्या बेटावर-त्या संकटात अडकलेले असता.
प्रौढवयीन वाचनामध्ये केव्हा तरी असे संदर्भ सापडले की, ज्या मार्गाने सिंदबादने आपल्या सफरी केल्या होत्या तो सामुद्री मार्ग ढोबळमानाने शोधण्यात आला आहे. संशोधकांनी असे नोंदविले आहे की, सिंदबादच्या सफरींची कथानके अद््भुत आणि काल्पनिक असली तरी त्यांना सामाजिक संदर्भ आहेत. सिंदबादने नोंदविलेले विविध समाज, विविध चालीरीती आणि चमत्कृतीपूर्ण जीवनपद्धती या ना त्या स्वरूपात त्या काळी अस्तित्वात होत्या. अर्थात, ही माहिती प्रौढवयात मिळालेली असते नंतर. प्रत्यक्षात, त्या वयात अशी माहिती उपयोगाची नसतेच. आपण सिंदबादबरोबर अद््भुत सफरींवर निघालेलो असतो, इतकं आपल्याला पुरेसं असतं. अल्लादीन नावाचा असाच एक समवयस्क अफलातून मुलगा आपल्याला भेटतो. अरेबियन नाइट‌्समध्ये याचं वय मुळातून काही जरी दाखवलं असलं तरी आपल्या हाती पडलेल्या पुस्तकानुसार हा तुमचा समवयस्क मित्र असतो. जादूगाराने गोड बोलून त्याला भुलवलं आहे आणि खोल तळघरात उतरवलं आहे. जादूचा दिवा तुम्हाला शोधायचा आहे. अल्लादीन बनून तुम्हीच हा जादूचा दिवा मग शोधत राहता. हा अल्लादीन सूक्ष्मरूपाने नंतर तुमच्या स्वभावाचा भाग बनून तुमच्या व्यक्तिमत्त्वात मिसळून जातो. पुढच्या वाढत्या वयात ‘जादूच्या दिव्या’चा शोध आयुष्यातून संपलेला नसतोच.
* * *
नंतर आपल्याला ‘शेरलॉक होम्स’ भेटतो. त्याचे भेदक डोळे, चोचदार नाक, त्याची चौकटी-चौकटीची कॅप हे सगळं तुमच्या मनाच्या कप्प्यात साठवलं जातं. शेरलॉक होम्स मुळातून प्रौढांसाठी लिहिला गेला आहे. पण त्याची मोहिनी अाबालवृद्धांवर पडली. त्यांचे अनुवाददेखील येऊन पोहोचले. तोपर्यंत, बालकुमार साहित्याबाबत आपल्या काही जरी कल्पना असल्या तरी एव्हाना शेरलॉक होम्स कुमारगटात प्रविष्ट झाला होता. त्याच्याकडे एखादं प्रकरण आलं की आपणदेखील खुर्चीत ताठ होऊन बसतो. डॉक्टर वॅटसनबरोबरच आपणसुद्धा प्रकरणाचा तपशील ऐकतो आणि त्या बौद्धिक शोधसाहसयात्रेत समाविष्ट होतो. ‘द हाउंड ऑफ बास्करविलेज्’ या १९०२मध्ये लिहिलेल्या पुस्तकातला भला मोठा हाउंड आपल्यालासुद्धा पहिल्यांदा जेव्हा दिसतो तेव्हा आपणसुद्धा भयचकित होतो. शेरलॉक होम्स हे प्रकरण कसं सोडवणार, याचं आपल्याला कुतूहल वाटतं. ‘एलिमेंटरी माय डियर’ असं त्याने आपल्यालाही उद्देशून म्हटलेलं असतं. मग, धडधडत्या काळजाने आपण त्या वातावरणात स्वतःला बुडवून घेतो. शेरलॉक होम्स वाचत वाचत आपण प्रौढ झालो असलो तरी त्याला एखाद्या वेळेस पत्र लिहावं असं आपल्याला वाटावं अशी परिस्थिती आलीच नसते, असं मात्र नाही.
bjsasne@yahoo.co.in