आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेकळे अडाण्यां, ते कां न वळे शहाण्यां?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'उद्या आषाढ संपतोय नि परवा रविवारी श्रावण लागतोय.
अनेक जणी या महिन्यात अनेक प्रकारची व्रते, पूजा करतात.
त्यासाठी त्या विशिष्ट प्रकारची फुलं,
पानं, फळं विकत घेतात आणि दुसर्‍या दिवशी
हे सगळं केराच्या टोपलीत टाकतात.

रितालिकेचा दिवस होता. आज भाजीवाल्या बाईने भाज्यांसोबत पूजेला लागणार्‍या पत्री पण आणल्या होत्या. माझ्या शेजारणी बरीच चिकित्सा करून त्यांची खरेदी करत होत्या. सगळा सौदा एकदाचा पटल्यावर ती भाजीवाली एकदम म्हणाली, ‘आज लई निरखून-पारखून पूजाचं सामान घेता, नव्या नव्या साड्या नेसून पूजा करता, आता उद्या ह्ये समदं तिकडं उकिरड्यावर घाणीत फेकता, ही तुमच्या शेरातली सार्‍यांची रीत. आमी खेड्यातले अडाणी नदीत सोडतो, न्हाईतर श्येतात टाकतो समदं द्येवाला वाह्यलेलं.’

‘आता आम्ही नदी कुठून आणावी?’ माझी शेजारीण उद््गारली. त्यावर तिचं हजरजबाबी उत्तर तयार होतं. ‘आवं, नदी न्हाई म्हून काय झालं? या बगिचातल्या झाडांना खत करून घालावं की, पर घानीत कशापायी फेकावं?’ एवढं बोलून ती भाजी विकायला पुढे निघून गेली.

ती तर गेली, पण माझ्या विचारचक्राला गती देऊन गेली. खरंच अडाणी कोणाला म्हणावं, रूढार्थानं ज्यांना शिक्षण नाही त्यांना, की पुस्तकी विद्या शिकूनही अशिक्षित राहिलेल्या पढत-पंडितांना? आपण शिकतो खरं, पण ज्ञानी होतो का? पूर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरा पाळताना त्यांची कारणमीमांसा जाणून घेतली तरी त्यातील तथ्य उलगडले जाते. आपण मात्र तेवढेच नजरेआड करतो आणि कर्मकांडात मात्र गुरफटून जातो.
श्रावण-भाद्रपद महिने निसर्गाच्या बहराचे, सृजनाचे दिवस. त्या निसर्गात रमावं, त्याची ओळख अगदी जवळून व्हावी, त्याचं ते मनोहारी रूप डोळाभर साठवून घ्यावं हा खरं म्हणजे या पूजाअर्चेचा मूळ हेतू. त्या निमित्ताने घरातील लेकी-सुनांना जरा वेळ घराबाहेरही जायला मिळे. आणि कुठल्याही गोष्टीला धार्मिक अधिष्ठान लाभलं की त्याला पुरेसं पाठबळ मिळते. पण आपण त्यातील धार्मिकता तेवढी घेतली आणि निसर्गात रमण्याऐवजी त्याला ओरबाडणंच सुरू केलं. (आणि घराबाहेर पडण्यासाठी आता निसर्गाऐवजी ऑफिसात जावं लागतं एवढंच.)
जी झाडे फुलांनी बहरलेली असतात, सकाळ होता होता ती अगदी पुष्पहीन होऊन जातात आणि तीच फुले दुसर्‍या दिवशी उकिरड्याचे धनी होतात. फुलांसाठी हा अट्टहास तर फळे कच्चीच हवी हा आग्रह. ही कच्ची फळे खायलासुद्धा चांगली लागत नाहीत, ती नैवेद्याला कशी चालतात. एवढी फळे वाया जातात. त्यामुळे श्रावण-भाद्रपद म्हणजे ‘झाडांचा काळ आणि कचर्‍याचा सुकाळ’ अशी नवी व्याख्या नक्कीच रूढ होईल.
बरं, घरात एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर प्रत्येकाची वेगळी साधनसामग्री हवीच का? एकानेच उपचारापुरती सामग्री घेऊन बाकी सर्वांनी हाताला हात लावून ‘मम’ म्हणून वाहिली तर नाही चालणार? ‘देव भावाचा भुकेला’ असे संतवचन आहे. मनोभावे केलेला नमस्कारही देवाला नक्कीच पोहोचत असेल.
आपण परदेशातील स्वच्छतेचे व शिस्तीचे नेहमी गोडवे गात असतो. पण आपलेही कुणी कौतुक करावे, आपल्याला वाखाणावे, यासाठी आपण काय प्रयत्न करतो? परदेशात सार्वजनिक स्वच्छतेचे, शिस्तीचे बाळकडू मुलांना लहानपणीच पाजले जाते. आपण मात्र आपल्या घरातील कचरा शेजारच्या अंगणात किंवा रस्त्यावर लोटण्यात धन्यता मानतो. परदेशातील चंगळवाद अंगी बाणवण्याऐवजी त्यांच्या काही चांगल्या गोष्टी जरी अंगीकारल्या तरी बरेचसे चित्र पालटू शकेल. पण लक्षात कोण घेतो?
खरं म्हणजे पर्यावरण हा शब्दही कुणाला माहीत नव्हता, तेव्हापासून आपल्या पूर्वजांनी निसर्गरक्षण आणि संवर्धनाचं काम सहजप्रवृत्तीने केलं म्हणून आपल्यासाठी एवढी तरी साधनसंपदा अस्तित्वात आहे.आता मात्र पर्यावरणाला, निसर्गालाच देव मानण्याची, त्याला प्रसन्न करून घेण्याची वेळ आली आहे. आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना सुखी ठेव, अशी ईश्वराजवळ प्रार्थना करण्यापूर्वी त्यांच्या सुखासाठी आपण काहीतरी कृती करायला हवी, तरच त्या प्रार्थनेला बळ लाभेल. नाहीतर आता ज्या देवांच्या पूजेसाठी आपण एवढा आटापिटा करतो, ते देवही आपल्याला वाचवू शकणार नाहीत.
(bharati.raibagkar@gmail.com)