आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदर इंडिया - एक गूढ !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा गांधी हे भारतीय राजकारणातील एक अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या हत्येला २०१४मध्ये ३० वर्षं झाली. तरीही त्यांच्या कालखंडाचा आणि त्यांच्या पुढारीपणाचा, वारशाचा शोध घ्यावासा वाटतो. २०१४मध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रणय गुप्ते यांच्या ‘मदर इंडिया’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद पंढरीनाथ सावंत व रमेश दिघे या पत्रकार द्वयीने वाचकांना उपलब्ध करून दिला आहे. मूळ पुस्तक प्रकाशित झाले १९९२मध्ये, तेव्हा राजीव गांधींचीही हत्या झालेली होती. त्याची सुधारित आवृत्ती २००९मध्ये आली, त्याचे मराठी रूपांतर पाच वर्षांनी वाचकांसमोर आले. पुस्तकाची सुरुवातच होते, इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर, दहनाच्या वर्णनाने. अतीव दु:ख, भांबावलेपण, पुढे पंतप्रधान कोण होणार, याची जुळवाजुळव, स्वहित पाहणार्‍यांची धडपड ही काजोळलेली पार्श्वभूमी मनाला एक सुन्नपणा देते.

ऑक्टोबर १९८४मध्ये प्रणय गुप्ते हे भारतात आले होते. (ते अमेरिकन नागरिक आहेत) तेव्हा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने त्यांना विचारणा केली की, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जी परिस्थिती उद््भवली आहे, त्याबद्दल पंजाबमध्ये जाऊन वृत्त पाठवाल का? त्याला होकार देतानाच त्यांनी ठरविले की, फक्त इंदिरा गांधींची हत्या व तिचा परिणाम यावर लिहायचे नाही तर भारतीयांना देश कोठे चालला आहे असे वाटते, त्यावरही लिहायचे. हकिगत, प्रासंगिक गोष्ट आणि विश्लेषण यांचे मिश्रण लिहायचे. त्यानुसार ते पंजाब, दिल्ली इथे फिरले, सामान्य लोकांशी बोलले. त्याचबरोबर रोमेश थापर, आशीष नंदी, इंदर मल्होत्रा, वीर संघवी, निखिल चक्रवर्ती अशा दिग्गजांच्या अनेक मुलाखती घेतल्या. इंदिरा गांधींच्या विश्वासातले जानकी गंपू, प्रा. राल्फ बुल्टजेन्स यांच्याशी बोलले. तसेच भारतीय राजकारणासंदर्भात असलेल्या अनेक पुस्तकातील संदर्भ त्यांनी लिखाणाला पुष्टी देण्यासाठी घेतले आहेत.

रुढार्थाने ‘मदर इंिडया’ हे पुस्तक इंदिरा गांधींचे राजकीय चरित्र असले तरी फक्त तेवढेच नाही. स्वातंत्र्योत्तर भारताच्या वाटचालीवर ठसा उमटवणारा राजकीय, सामाजिक घडामोडींनी व्यापलेला तो कालखंड आहे. अशा अस्वस्थ माहोलमध्ये इंदिरा गांधींनी देशाची धुरा हाती घेतली. बहुसंख्य पत्रकारांना त्या व्यक्ती म्हणून आवडणार्‍या कधीच नव्हत्या. त्यांचे वर्णन ‘भयगंडयुक्त सत्ता सक्ती’ करणार्‍या, “भारतीय लोकशाहीच्या बहुतेक संस्था खिळखिळ्या करणार्‍या’ असे केले गेले आहे. लेखकाने या पुस्तकात अनेक नामवंत लेखकांची, नेत्यांची परस्परविरोधी मापन असणारी विधाने दिलेली आहेत. त्यामुळे इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्वच परस्परविरोधी होते का, असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. एक मात्र आहे की, इंदिरा गांधींचे व्यक्ती म्हणून कसे मापन करायचे, हा भारतीय राजकारणातला एक गहन प्रश्न होता. त्या काळात कम्युनिस्ट पक्षांमध्ये त्यांचे मापन कसे करायचे याबद्दल जसे मतभेद होते, तशीच फूट गांधीवादी सर्वोदयी मंडळीमध्ये आचार्य विनोबा व जयप्रकाश नारायण यांच्या रूपाने समोर आली होती, याचे उल्लेखही पुस्तकात आहे.

इंदिरा गांधींच्या निमित्ताने लिहिताना लेखकाने प्रस्तावनेत त्यांचा हेतू स्पष्ट केला आहे. ‘हे पुस्तक भारतीय उपखंडाच्या समकालीन इितहासाबद्दल काही शिकू इच्छिणार्‍या सर्वसाधारण वाचकांसाठी आहे.’ त्यामुळे या पुस्तकात भारताची फाळणी, काश्मीर प्रश्न, अलिप्ततावादी (नाम) चळवळ, पाकिस्तान व चीनबरोबर झालेली युद्धे, दुष्काळ, प्रांतिक अस्मिता, त्यातून टोकदार झालेला खलिस्तानचा प्रश्न, भारतीय उपखंडात मुजिबर रेहमान, बंदरनायके यांच्या झालेल्या हत्या, झुल्फिकार भुत्तोंना दिलेली फाशी, सिमला करार असे अनेक संदर्भ तपशीलवार येतात. राजकीय चरित्र लेखन करताना लेखनाचा बाज हा ललित लेखनाच्या अंगाने जाणारा ठेवला आहे, त्यामुळे राजकीय विश्लेषण वाचताना ते रुक्ष होत नाही. तसेच त्याचे गांभीर्यही कमी होत नाही.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, इतिहासातील इतके राजकीय धागेदोरे जुळवून मांडणी करतानाच त्यांनी इंदिरा गांधींच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती तेवढ्याच बारकाईने गुंफली आहे. पुस्तकात इंदिराजींच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय झंझावाती कारकिर्दीचे विश्लेषण केले आहे. १९८५मध्ये सुरू झालेले पुस्तकाचे लिखाण फक्त इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत येऊन थांबत नाही. कारण परत लेखकाच्या मनात, ‘भारत या देशाचा प्रवास पुढे कसा होणार आहे’ हा प्रश्न असतोच. २००९च्या आवृत्तीत संयुक्त पुरोगामी लोकशाही सरकारबद्दल उल्लेख आहेत. सोनिया गांधींनी २००७मध्ये नेदरलँडमध्ये जे भाषण केले होते, तेही सविस्तर दिले आहे. त्यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात; पण त्यातील ‘युगातियुगांनी बनलेले थराथरांचे सामाजिक व आर्थिक बांधकाम झिजत जाऊन राजकीय सत्ता वंचित लोकांकडे वाहात आहे. परिणामी या वर्गाच्या अपेक्षा उंचावल्यामुळे भारतात प्रचंड सामाजिक खळबळ चालली आहे. परस्परविरोधी हितसंबंध असलेल्या गटांमधील ओढाताण स्थैर्य व प्रगती यांच्या आड येत आहे. पण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.’ ही विधाने विचार करायला लावणारी आहेत.

प्रणय गुप्ते यांचा एक वैयक्तिक संदर्भ या पुस्तकाला आहे. त्यांची आई, चारुशीला गुप्ते यांच्या नावाने दक्षिण मुंबईत एक चौक आहे. लेखक त्या चौकाला बहुभाषिक, बहुसांस्कृतिक भारताची छोटी प्रतिकृती मानतात. भारत हा लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष देश व्हावा, यासाठी जी पिढी कसोशीने जगली त्या पिढीच्या चारुशीला गुप्ते प्रतिनिधी होत्या. वर्तमानाकडे संचितपणे पाहात असताना त्यांना आईच्या काळातल्या हिंसाचार- जातीयवाद व आताच्या राजकारणातला अश्रद्धपणा, जीवन दूषित करणारे जागतिक संघर्ष यातला फरक जाणवत राहतो. भविष्याकडे बघत असताना आशावाद व्यक्त करणारे गुप्तेंसारखे लेखक, नजीकच्या काळातला इितहासाचा पट बहुधा म्हणूनच आपल्यासोर ठेवतात.

मदर इंडिया
इंदिरा गांधी यांचे राजकीय चरित्र
लेखक : प्रणय गुप्ते
अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
मूल्य : रु. ४५०/-
बातम्या आणखी आहेत...