आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस आणि स्री मन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाचे तुषार पडले की निसर्ग जसा चारी अंगांनी बहरून येतो, तसंच बहरतं ते कवी मन. हळव्या  स्त्रीमनातला पाऊस अलगद  टिपत पाऊस आणि स्त्री मनाचं नातं उलगडणाऱ्या काही कवितांची ही मेजवानी...
 
पावसाचे आणि स्त्रीचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे. कवयित्रींनी तर पावसाचे वर्णन केलेलेच आहे; पण कवींनीसुद्धा पाऊस स्त्रीच्या नजरेतूनच टिपलेला दिसतो. पावसाची जादू स्त्रीमनाला कशी मोहिनी घालते पाहा.
 
आला पाऊस मातीच्या वासात गं,
मोती गुंफीत, मोकळ्या केसात गं.
या शांता शेळके यांच्या ओळी. पहिला पाऊस स्त्रीला आनंदित करतो. पावसामुळे मातीला येणारा गंध मनाला उल्लसित करतो.
आली आली सर ओली
छुम छुम पायी पैंजण बांधून
सजले मी दिनरात.
कवी गंगाधर महांबरे पावसामुळे स्त्रीला होणारा आनंद अशा शब्दांत व्यक्त करतात. स्त्रीचे मन सौंदर्यसक्त आहे. पावसाचा आनंद घेताना ती स्वत:चे सौंदर्य खुलवित असते. पावसाळ्यातले सणवार, श्रावण झुले, मंगळागौर या सुखद अनुभवांत स्त्रीमन रमताना दिसते. कवी अनिल पावसाचे वर्णन करताना म्हणतात,
फुलली ही जाईजुई, बहरून वाया जाई
पारिजातकाची बाई, कशी केली दैन
बाई या पावसानं...
पावसाळ्यात फूलवेलींना बहर आलेला असतो. इतका की, फुले फुलून वाया जातात. पारिजातकाची फुलं झाडावरून पडून मातीत मिसळतात. त्यांची ही अवस्था पाहून स्त्रीमन हळवे होते. 
परिस्थितीनं गरीब असणाऱ्या स्त्रीचं वर्णन इंदिरा संत करतात.
नको रे नको पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली
ही गरीब स्त्री म्हणते, माझ्या झोपडीत वाट्यालोट्या ठेवून मी रक्षण करते आहे. माझ्या दारातल्या सायलीची नाजूक वेल मुसळधार पावसात थरथरते आहे. तू अवेळी धिंगाणा घालू नकोस. 
ऐन पावसाळ्यात आपला प्रियकर घरी नाही. तो कुठे अडकला आहे, या काळजीमुळे विरहिणीची अवस्था कवी मधुकर जोशी अशी वर्णन करतात,
रिमझिम झरती श्रावणधारा 
धरतीच्या कलशात 
प्रियाविण उदास वाटे रात
उलट एखादी प्रेमवेडी आरती प्रभूंच्या शब्दांत पावसाला म्हणते, 
ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना
तर ग. दि. माडगुळकर म्हणतात,
कृष्णविरहिणी कोणी गवळण 
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले
भिडले जलदारात
पण ज्या प्रेयसीला भर पावसात तिचा प्रियकर भेटला, तिचे वर्णन करताना ना. धों. महानोर म्हणतात,
घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला साजण छैलछबीला घन होऊन बिलगला
तर पी. सावळाराम यांच्या कवितेतून राधा म्हणते,
रिमझिम पाऊस पडे सारखा 
यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे 
बाई गेला मोहन कुणीकडे
असं हे पावसाचं आणि स्त्री मनाचं नातं उलगडताना आपलंही मन पावसाच्या आपुलकीनं ओलंचिंब होतं.
 
ratithorat@gmail.com
बातम्या आणखी आहेत...