आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरंभ मनाच्या स्वच्छतेचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयादशमीचा सण आला की शाळेतली पूजा आठवते. मोठ्या भक्तिभावाने घर, नातलग, अगदी शाळेतले शिक्षक सार्‍यांच्या घरी आवर्जून आपट्याची पाने देण्याचा हा दिवस. खूप आनंद आणि सतत रोमांचित वाटावे असा हा काळ... नवरात्रात नऊ दिवस देवीला जाण्याचा घराचा शिरस्ता. दर्शनाबरोबर जत्रेत भटकणे, विजेच्या पाळण्यात बसणे, फुगे, खेळणी दिसेल ते विकत घेणे... आजूबाजूला फक्त झेंडूच झेंडू, लालगर्द, पिवळेभडक, केशरी... गाभारा रंग गंधाने भारलेला. नजर हलूच नये अशी ती सजावट... हा दिवस श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून साजरा करायचा...पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या वृक्षावरची शस्त्रे काढत कौरव सैन्यावर विजय मिळवला, तो हाच दिवस.साडेतीन मुहूर्तांपैकी एक. शाळेने मनावर पुराणाचे, इतिहासाचे संस्कार रुजवलेले...
आता दसरा येतो. कधी सुट्टी मिळते, तर कधी रविवारी येऊन सुट्टी घेऊन जातो. त्याचे येणे म्हणजे परीक्षेची चाहूल. झेंडूचे वाढलेले भाव... आदल्या दिवशी आकाशाला भिडणारे भाव दुपारनंतर फुलांप्रमाणेच कोमेजू लागतात. त्या वेळेस वाईट वाटते. जत्रेतली विजेची नासधूस, कर्णकर्कश्श संगीत, वाहतुकीचा खोळंबा, गर्दीचा फायदा उठवत, स्पर्धकांचे विकृत वर्तन किळसवाणे वाटू लागते. घरात राबणारी आई आणि सुट्टी एन्जॉय करणारे आम्ही... चित्र बदलावेसे वाटते.
सोयीसोयीने सणांचा आपण वापर करून घेतो. नवरात्रात रात्र रात्र गरबा खेळतो. नाच नाच नाचतो. इव्हेंटसाठी धडपडतो. प्रायोजक मिळवतो. खेटा घालतो. अक्षरश: जीव काढतो. पैसा मिळवणे सोपी गोष्ट थोडीच आहे? मंडळ निर्माण केले की ते कायमस्वरूपी टिकणे महत्त्वाचे. तरुण-तरुणी गोळा करणे, त्यांना गरबा शिकवणे, दिवसा प्रॅक्टिस नि रात्री स्पर्धा. प्रचंड वेळ, शक्ती खर्च करतो... नऊ दिवस जागविले आणि गाजविले. एवढे थकल्यावर दसर्‍याच्या दिवशी घरात काम कसे करणार, अनेक मित्र-मैत्रिणी हातपाय-पाठ दुखते म्हणत लेक्चरला दांडी मारणार. ‘बघता काय, सामील व्हा’ म्हणत नवरात्रात आम्हाला खेळवण्याचे मोहमयी प्रकार होत असताना, आम्ही मागे कसे राहणार?
परीक्षा नेहमीच्याच. पास-नापासाचा खेळ. घरात आरडाओरडा, रात्री नाच, दिवसा जाच. पण हे सर्व हवे असते. एखादा नृत्यप्रकार शिकावासा वाटतो. ताल धरावासा वाटतो. लय नसानसांत भिनवावीशी वाटते. टिपर्‍या... त्याचा नाद सर्वदूर पोहोचवावासा वाटतो. कॉलेज कलेला वाव देते, पण एकदम डिसेंबर-जानेवारी वा फेब्रुवारीत. त्या त्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनाच्या ठरलेल्या तारखा. अधेमधे कलागुणांना वाव नाहीच. नवरात्र महोत्सव असता, तर कदाचित रात्री हे कौशल्य दाखवण्यासाठी बाहेर पडलो नसतो. उत्तम बक्षिसे आणि कौतुकाची मोहोर कोणाला नको असते? कित्येक कॉलेजमध्ये प्रचंड चापल्य असणारी मुले-मुली माहीत नसतात, हीच मुले बाहेर स्टेज दणाणून सोडतात. आपल्या शहरात नव्हे तर अन्य अनेक ठिकाणी त्यांना डिमांड असते. पण जेथे ते शिकतात, तेथे त्यांचे वर्गात उपस्थित असणेच महत्त्वाचे ठरते. दसर्‍याला त्यांचे कौतुक होत असताना महाविद्यालयात मात्र नवरात्रातील अनुपस्थिती नोटीस बोर्डावर झळकत असते.
सण आले की बालपण आठवते, ते या अर्थाने. रावणाचा पुतळा जळताना दुष्टांचे निर्दालन आणि सुष्टांचा विजय हे समीकरण मनात पक्के रुजलेले. आज वाईट प्रवृत्ती बाहेर काय स्वत:मध्येच आहेत, असा साक्षात्कार आम्हाला घडतो. घरात एक; बाहेर एक, असे आमचे वर्तन. ध्वनिप्रदूषणावर वक्तृत्व स्पर्धेत ढाल मिळवायची आणि नवरात्रात ध्वनिक्षेपकावर गाणी वाजवण्यात पुढाकार घ्यायचा. कुटुंब नि नातेसंबंध यातील ताणतणावावर कार्यशाळा आयोजित करायच्या, घरात मात्र सतत भांडणे करून गोष्टी मिळवायच्या.
दुर्गेची, शक्तीची विविध रूपे पथनाट्यातून साकार करायची, मात्र आसपासच्या मुली, तरुणी यांची घोर उपेक्षा करायची; छेड काढायची. अशा वेळी विनाश व्हावा, तो आमच्याच मनातल्या अंधाराचा. अशा वेळेस कोणीतरी आपट्याच्या पानाची प्रतिकृती करून रतन टाटांचे वाक्य कोरते. None can destroy iron but its own rust can. Likewise, none can destroy person but his own mindset can. मनाला घासूनपुसून स्वच्छ करत त्याची ठेवण बदलायला हवी. दसरा त्या अर्थाने शुभारंभ ठरावा...
bhargavevrinda9@gmail.com