आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhartiya Cinema, Priyanka Dhahale, Rasik, Magazine

गोंधळलेला ‘भारतीय...’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नकाशापासून सरकारी कचेरीपर्यंत कुठलीही नोंद नसलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ‘अडनिडं’ या गावाच्या बेदखल ते दखल होईपर्यंतच्या प्रवासाची कथा म्हणजे हा चित्रपट आहे. मग ‘भारतीय...’ या शीर्षकाचा या कथेशी काय संबंध?
चित्रपट पुस्तकी ज्ञानाला फँटसी आणि रिअ‍ॅलिझमचा आधार देऊन भारतीयत्व काय आहे हे शिकवतो. हे शिकवणे कधी लांबलेल्या लेक्चरसारखे कंटाळवाणे वाटते, तर कधी करमणूक करते. रोज सकाळी सातची वा दहाची लोकल पकडून सेंट्रल टू वेस्टर्न असा ओबडधोबड तरीही सिस्टिमॅटिक प्रवास करताना सायनपासून सुरू होणारी झोपडपट्टी बघून किळस येणार्‍या पांढरपेशा माणसाला, मुख्य प्रवाहापासून तुटलेल्या खेड्याचे, तेथील माणसांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न ‘भारतीय... म्हंजे काय रे भौ’ या चित्रपटाने केला आहे. अर्थात ही काही या चित्रपटाची थीम नाही. नकाशापासून सरकारी कचेरीपर्यंत कुठलीही नोंद नसलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ‘अडनिडं’ या गावाच्या बेदखल ते दखल होईपर्यंतच्या प्रवासाची कथा म्हणजे हा चित्रपट आहे. मग ‘भारतीय...’ या शीर्षकाचा या कथेशी काय संबंध? संबंध हा, की स्वातंत्र्योत्तर काळातही दुर्लक्षित राहिलेल्या भारतातील कुठल्याशा कोपर्‍यात वसलेल्या गावाची नोंद घेतली जावी म्हणून हे शीर्षक. या चित्रपटामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, नक्षलवाद चीन-भारत आंतरराष्‍ट्‍ीय संबंध, यांना वरकरणी हात घातला गेला असला तरी ही निव्वळ प्रतीके आहेत, हा चित्रपटाचा मध्यवर्ती धागादेखील नाही. पायाभूत सुविधांसाठी ना सरकार हलत, ना गावातील लोकांना लढावेसे वाटत. अशा गावात युरोप, अमेरिका फिरलेला सरदेशमुख घराण्याचा एक तरुण येतो. अस्वच्छ पाणी, सतत जाणारी वीज आदी गैरसोयींनी गावकर्‍यांच्या उदासीनतेमुळे अस्वस्थ होतो. या अस्वस्थतेतूनच गावात वादळ येते. ज्यामुळे काही काळ अनेकांची वाताहत होते, पण नंतर गाव सावरतेही. ही नियोजनबद्ध वाताहत आणि नियोजनबद्ध सुखांत चित्रपटाची जमेची बाजू. चित्रपट म्हणून कथानकाची भट्टी जमली आहे, पण आपण शाहरुखचा ‘स्वदेस’ पाहात असल्याचा क्षणोक्षणी भास होत राहतो, ही या चित्रपटाची तोकडी बाजू. मकरंद अनासपुरेने साकारलेला ‘नंदीबैलवाला’ हा चित्रपटापेक्षाही रंगमंचावर असल्यासारखा वावरत असला तरी मकरंदच्या आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी ठरते. या गावाची दुरवस्था ही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे झालेली आहे. ज्याला शासनाबरोबर या गावाची जनतादेखील कारणीभूत आहे. जिला आपली भारतीय म्हणून दखल घेणे तर दूरच, पण साधे माणूस म्हणून सरकारने दखल घ्यावी याकरता प्रयत्नदेखील करावेसे वाटत नाहीत. आंधळेपणाने या गावातल्या दोन मातब्बर व्यक्ती (प्रत्यक्षातही हे दोन कलाकार मातब्बर आहेत) आपापसांत लढत राहतात. हा संदर्भ विस्तृतपणे मांडताना चित्रपटातील संवाद इतके पुस्तकी का, असा सहज प्रश्न पडतो. अर्थात काही काही हलक्याफुलक्या संवादांमधली नैसर्गिकता मात्र सहजपणे जपली गेली आहे. थोडक्यात, हा चित्रपट पुस्तकी ज्ञानाला फँटसी आणि रिअ‍ॅलिझमचा आधार देऊन भारतीयत्व काय आहे हे शिकवतो. हे शिकवणे कधी लांबलेल्या लेक्चरसारखे कंटाळवाणे वाटते, तर कधी जितेंद्र जोशीने साकारलेल्या कनफ्युज्ड श्रीपतीमुळे उपहासात्मक करमणूक करते. त्यामुळे हा चित्रपट ना धड मनोरंजक ठरत, ना धड देशभक्तीची भावना जागवून अंतर्मुख करत. त्यामुळे मराठीमधील तगडी स्टारकास्ट ही जरी या चित्रपटाची जमेची बाजू असली तरी कथानकात सखोलता व मध्यंतराआधी काही काळ गतिमानता नसल्याने हा चित्रपट अनेक बाबतीत तोकडा पडतो. अजय-अतुल या जोडीच्या संगीताची जादूही विशेष अशी जाणवत नाही, मात्र यातील आनंद अभ्यंकरांवर चित्रित झालेले भजन मात्र आनंद देते. या चित्रपटातील फँटसी पाहताना आमीर खानच्या ‘पीपली लाईव्ह’ या चित्रपटाची पुसटशी आठवण होते, पण ‘भारतीय’मधील फँटसी वास्तवापासून बराच काळ फारकत घेते. त्यामुळे हा चित्रपट समांतर चित्रपटांच्या कक्षेतही बसू शकत नाही.