आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींमध्ये वाङ्मयीन अभिरुची वाढविणारे ‘भाषा भगिनी’ मंडळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावत 1984 मध्ये डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाची स्थापना डॉ. अण्णासाहेब बेंडाळे यांनी केली होती. त्याच वेळी महाविद्यालयात मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांनी मिळून ‘भाषा भगिनी’ मंडळाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात मू. जे. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी या विभागांना सेवा दिली. मुलींमध्ये वाङ्मयीन अभिरुची वाढावी यासाठी विविध उपक्रम तिन्ही विभागांतर्फे राबविण्यात येतात. काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नियतकालिकातील लिखाण आदी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलींचा सहभाग आणि यश वाखाणण्याजोगे आहे.

‘भाषा भगिनी’ मंडळाचे काम हे मराठी विभागाचे प्रा.साळवे, प्रा.डॉ.मीनाक्षी ब-हाटे, हिंदी विभागाचे प्रा.डॉ.प्रमिला पाटील, प्रा.डॉ.संजय रणखांबे, इंग्रजी विभागाचे प्रा.बी.पी.सावखेडकर, प्रा.सी.एस.नेतकर, प्रा.पी.डी.पाटील हे पाचही प्राध्यापक यशस्वीपणे सांभाळत आहेत. मराठी विभागातर्फे ‘साहित्य साधना’ नावाची भित्तिपत्रिका, हिंदी विभागातर्फे ‘नवांकुर’ ही भित्तिपत्रिका सुरू आहे. इंग्रजी विभागातर्फे ‘स्पोकन इंग्लिश’ हा प्रमाणपत्रीय अभ्यासक्रम सुरू आहे.

‘लेखक आपल्या भेटीला’ - मराठी विभागातर्फे ‘लेखक आपल्या भेटीला’ या अंतर्गत कवी अशोक कोळी यांच्याशी मुलींनी मुक्तसंवाद घडवून आणला होता. काव्य मैफलीचा आनंद मिळवून देण्यासाठी कवी विठ्ठल वाघ यांचा काव्यगायनाचा कार्यक्रम, मॉरिशस या देशातील संस्कृती, शिक्षण आणि मराठी भाषा समजून घेण्यासाठी प्रा.होमीराजन गौरीया यांचे व्याख्यान झाले होते. तसेच ना. धों. महानोर, गंधाधर पानतावणे, डॉ.किसन पाटील, डॉ.शिरीष पाटील यांनी विभागाला भेटी देऊन मुलींशी संवाद साधला आहे. बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रातर्फे ‘बहिणाबाई -स्त्री जाणिवांच्या निमित्ताने’ या पुस्तकाचे संपादन प्रा. सत्यजित साळवे यांनी केले आहे. तसेच त्यांनी महाविद्यालय गीताचे लेखनही केले.

हिंदी अन् इंग्रजी विभागही आघाडीवर - राष्ट्रभाषा हिंदी विभागातर्फे दरवर्षी हिंदी दिवस साजरा केला जातो. त्यात राष्ट्रभाषेचे महत्त्व सांगण्यासाठी डॉ.पितांबर सरोदे, डॉ.मालती जावळे, डॉ. मधु खराटे, डॉ. शशी मुदिराज (हैदराबाद), डॉ. सुरेश तायडे, डॉ. शंकर पुणतांबेकर यांनी व्याख्यान दिले. राष्ट्रभाषा प्रचार समिती (वर्धा) याद्वारे राष्ट्रभाषा कोविद व राष्ट्रभाषा रत्न या परीक्षांचे आयोजन करण्यात येते. तसेच आंतरविद्याशाखीय व्याख्यानांचे आयोजन इंग्रजी विभागातर्फे करण्यात येते. डॉ. विवेक काटदरे, डॉ. योगराज वैष्णवी यांचे व्याख्यानांबरोबर प्राचार्य आर. डी. राणे यांचे मार्गदर्शन मुलींना लाभले. विभागात स्वतंत्र ग्रंथालय सुरू केले आहे. उमविस्तरीय इंग्रजी प्राध्यापकांची परिषदही विभागातर्फे घेण्यात आली होती.

नॅक, उमवितर्फे ‘ए’ ग्रेड - महाविद्यालयाने आयएसओ-9001-2008 हे मानांकन मिळविले असून नॅक, बंगलोर संस्थेने महाविद्यालयास ‘ए’ ग्रेड दिले आहे. उमवि क्षेत्रात ‘ए’ ग्रेड मिळविणारे बेंडाळे कॉलेज पहिले महिला महाविद्यालय आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. एस. एस. राणे व प्राध्यापक वर्ग यांचा सिंहाचा वाटा आहे.-

शब्दांकन : सुनील बडगुजर, जळगाव