आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bhasha Vikas Aani Rajkaran Dr. Maruti Tegampure Book

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्वलंत प्रश्नांचा शास्त्रीय वेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही समस्या सार्वकालिक असूनही वर्तमानात उग्र रूप धारण केल्यासारख्या वाटतात. प्रत्येक काळात याविषयी समाजचिंतकांमध्ये गंभीर स्वरूपाचा खल होत असतो. प्रासंगिक आणि सार्वकालिक अशा स्वरुपांच्या समस्यांना तात्काळ उत्तर देण्यासाठी लहानमोठ्या उपाययोजना आखल्या जातात आणि तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न होतो. या प्रयत्नांतूनच दीर्घकालीन उपाय शोधावे लागतात. जैविक समस्यांच्या निराकरणासारखे सामाजिक समस्यांना शास्त्रसिद्ध उत्तर जरी देता आले नाही तरी शक्य होईल, तेवढे शास्त्रशुद्ध उपाय किंवा पर्याय देणे अगत्याचे असते. असाच काहीसा प्रामाणिक प्रयत्न ‘भाषा, विकास आणि राजकारण’ या संपादित ग्रंथातून करण्यात आला आहे. डॉ. मारोती तेगमपुरे, प्रा. पुरुषोत्तम जुन्ने, प्रा. देविदास नरवाडे आणि प्रा. रमेश वाघमारे यांनी संपादित केलेला हा एकूण अठ्ठावीस लेखांचा समावेश असलेला ग्रंथ होय. महाराष्ट्रातील काही ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्वांचे मूलगामी चिंतन जसे या ग्रंथातून गोचर होते, तसेच काही नवोदित परंतु प्रचंड अभ्यासऊर्जा असलेल्या मंडळींचे विचारही यातून व्यक्त होताना दिसतात. प्रस्तुत वैचारिक ग्रंथात भाषाविषयक आठ, विकासावरील सोळा आणि राजकारणावर आधारित चार लेख दिसून येतात. प्रत्यक्ष लेख सुरू होण्यापूर्वी सुरुवातीला सीपीएमचे राज्यसभा सदस्य सीताराम सेंचुरी यांचे हिंदीतून निवेदन आहे. यातून त्यांनी अगदी अल्प शब्दांमध्ये भारतीय समाजासमोरील आव्हानांचा आणि त्यावरील उपायांचा थोडक्यात परामर्श घेतला आहे. या ग्रंथात भूमिका स्पष्ट करणारे सहा पृष्ठांचे संपादकीय दिले आहे. कोणत्याही समस्यांचे सुटे-सुटे विश्लेषण न करता ते एका व्यापक व्यूहरचनेचा भाग असतो, असे संपादक म्हणतात. याचाच अर्थ देशात आज वेगवेगळ्या ज्या समस्या उग्र स्वरूप धारण करत आहेत त्या खाजगीकरण, उदरीकरण आणि जागतिकीकरण प्रक्रियेचा एक भाग होय. याकडे अंगुलीनिर्देश करतात. प्रादेशिकता जपणे म्हणजे, इतर भाषकांचा द्वेष करणे नव्हे किंवा इतर भाषेचा तिरस्कार करणे नव्हे. हे तत्त्व प्रकर्षाने अधोरेखित होते. जी गोष्ट भाषेची तीच विकासाचीसुद्धा. भारत पूर्वीपासून एकसंघ स्वरुपाचा कधीच नव्हता; परंतु तो एकमेकांपासून पूर्णत: भिन्नही नव्हता. ज्या 562 संस्थानांना खालसा करून ‘राष्ट्र’ या संकल्पनेत गोवण्यात आले ते काहीएक सामाजिक सूत्र गृहीत धरून. पुढे 1956ला भाषावार प्रांतरचना करण्यात आली. त्या निर्मितीपाठीमागचा उद्देश आज पूर्ण विसरून जाऊन आपण अतिव्यापक तरी होऊ इच्छितो, किंवा केवळ भाषेच्या मुद्यावरून संकुचित गैरसमजुती तरी प्रसारित करतो. दोन्ही गोष्टी धादांत चुकीच्या आणि फसव्या आहेत. कोणत्याही संघराज्यतील मंडळींना स्थानिक आणि राष्ट्रीय या दोन्ही भूमिका व्यवस्थित पार पाडता आल्या तरच राष्ट्रराज्य संतुलित राहील. प्रस्तुत ग्रंथात पारंपारिकदृष्ट्या भाषेच्या अंगाने अत्यंत उत्तम लेख आहेत. यशवंत मनोहरांपासून ते पुरुषोत्तम जुन्नेपर्यंत सर्वांनीच भाषा किती महत्त्वाची आहे किंवा तत्सम गोष्टी ब-याच सांगितल्या; परंतु प्रादेशिक भाषांची अस्मिता जोपासतानाच राष्ट्रीय वगैरे कसे व्हायचे या संदर्भातील विवेचन जर असते तर ते अधिक फलदायी आणि कालसुसंगत ठरले असते. कॉ. अजित अभ्यंकरांनी त्यांच्या लेखातून तसे सूतोवाच केल्याचे जाणवते न जाणवते तोच त्या मुद्याचा संक्षेपही होतो. कॉ.अभ्यंकरांनी नकारात्मक खंडणापेक्षा सकारात्मक मंडणावर भर दिला असता तर एक दिशानिर्देश झाला असता असे वाटते. डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे भाषेवरील लेख अत्यंत अभ्यासू पद्धतीने उतरले आहेत. प्रा. बसवराज कोरे यांचा शास्त्रीय स्वरूपाचा लेख काहीसा ललित अंगाने जाणारा ठरतो. थोडक्यात, या ग्रंथात फक्त मराठी भाषेच्या अंगाने विचार केल्यामुळे राष्ट्रीय जीवनात भाषा (प्रादेशिक) वापराचे नियोजन करून स्व अस्मितेसोबत राष्ट्रवादी (पक्ष नव्हे) वृत्ती कशी अंगिकारता येईल याचे उत्तर स्पष्टपणे सापडत नाही. या ग्रंथामध्ये विकास या संकल्पनेला मध्यवर्ती गृहीत धरून एकूण सोळा लेख आहेत. ज्यात महिलांच्या विकासाच्या अनुषंगाने इतर लेखांच्या प्रमाणात जास्त लेख आहेत. डॉ. अशोक ढवळे यांचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि दीर्घस्वरुपाचा ‘स्वातंत्र्योत्तर भारतातील कृषि धोरण आणि विकास’ हा लेख अभ्यासूंसाठी मौलिक स्वरुपाचा ठरणारा आहे. अकृषक व्यक्तिंचा कृषि व्यापारातील वाढत्या वावरामुळे आणि नफाखोरी वृत्तीमुळे शेत-यांवर आज आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यात सरकारचे जेथे शेतीहिताचे धोरण असावयास हवे त्याठिकाणी पूर्ण विसंगती दिसून येते. असाच आशय डॉ.ढवळे यांच्या लेखातून स्पष्ट होतो. विकास चहूअंगाने झाला तर समाज संतूलन टिकून राहण्यास मदत होते. दलित-आदिवासी विकास, ग्रामीण, सिंचन, महिला, शिक्षण इत्यादी क्षेत्रांकडे सरकारने जाणीवपूर्वक लक्ष घालून विकास करावयास पाहिजे. प्रस्तुत ग्रंथातून अशा सर्व बाबींच्या बारकाव्याकडे त्या-त्या लेखकांनी लक्ष वेधले आहे. प्रस्तुत ग्रंथात राजकारण विषयावरील एकूण चार लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. तात्त्विक राजकारण आणि त्याचा व्यवहारातील वापर कशा पद्धतीचा असावा, तत्त्व आणि व्यवहार कोठून सुरू होऊन कोठे संपतो याची निश्चित सीमारेषा दाखवणे तसे दुरापास्त असते असे डॉ. भालचंद्र कांगो यांच्या लेखातून स्पष्ट होते. डॉ.आदिनाथ रंगोले यांचा दलित विचारवंतांस आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त करणारा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास विषयक वर्गीय दृष्टिकोण’ हा लेख एक नवा आयाम प्रदान करतो. राजकारण हा तसा बुद्धिवंतांचा त्याज्य विषय राहत आलेला आहे. राजकारणाला आपण कितीही गलिच्छ वगैरे म्हटले तरी सर्व समस्या सोडविण्याचे लोकशाहीतील एक प्रभावी माध्यम म्हणून राजकारणाकडे पाहता येईल. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना राज्यकर्ती जमात बनण्याचे आवाहन केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकातील लेख चिंतनीय आहेत. उपर्युक्त काही निरीक्षणे नोंदविल्यानंतर एवढेच म्हणावे वाटते की, अशा सर्वच बाबतीत गोंधळाच्या अवस्थेत हा वैचारिक ग्रंथ संपादित करून संपादक मंडळाने विचारप्रक्रिया अधिक गतिमान राहण्यास निचितच हातभार लावला आहे. या निमित्ताने समाजात सकारात्मक-नकारात्मक विचारमंथन सुरू होऊन सत्य शोधन मोहीम अव्याहत कार्यरत राहील, हे निश्चित. भाषा, विकास आणि राजकारण लेखक : डॉ. मारोती तेगमपुरे, प्रा. पुरुषोत्तम जुन्ने, प्रा. देविदास नरवाडे, प्रा. रमेश वाघमारे प्रकाशक : चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद