आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारातील माणिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
    डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. 
अशा महापुरुषाची पत्नी असणं अतिशय कठीण, एखाद्या व्रतासारखं. म्हणूनच जयंतीच्या निमित्ताने रमाबाईंच्या कर्तृत्वाची ही ओळख.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उच्च शिक्षण असो किंवा समाजासाठी विविध आंदोलने, सत्याग्रह असो; माता रमाईने बाबासाहेबांचे कुटुंब सांभाळले. प्रत्येक वेळी त्या बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला आपले हक्क मिळवून दिले. महात्मा जाेतिबा फुले यांची पत्नी सावित्रीबाई, तशी डॉ. आंबेडकर यांची सुविद्य पत्नी रमाई. डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यात सतत सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या रमाबाई उर्फ रमाईंचा आज ७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्या निमित्त त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक कार्याविषयी माहिती जाणून घेऊ.

डॉ. आंबेडकरांसारख्या प्रकांड पंडिताची रमाबाई ही अशिक्षित पत्नी. पण त्या पतीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहिल्या. त्या धार्मिक, सहनशील होत्या आणि सदैव पतीच्या काळजीने झुरत असत. त्यांच्या स्वास्थ्यासाठी, उत्कर्षासाठी सतत व्रतवैकल्येही करत, पण वेळप्रसंगी शिकण्यासाठी पतीचा सततचा आग्रह मोडून काढत. महापुरुषाची सहचारिणी होणे हे एक प्रकारचे असिधाराव्रत असते. पण हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळणारी रमाईसारखी स्त्री दुर्मीळ असते. आणि म्हणूनच बाबासाहेब सर्व पददलितांचे, पीडितांचे, स्त्रियांचे बाबा झाले; तर रमाबाई या आई झाल्या. रमाईचा जन्म दापोली येथे एका गरीब कुटुंबात १८९८मध्ये झाला. रमाईचा वर्ण गोरा, उंची मध्यम, बांधा सडपातळ, नाक सरळ व डोळे पाणीदार, स्वभाव निगर्वी, प्रेमळ, मनमिळाऊ होता. त्यांचे आईवडील लहानपणीच वारले. त्यांचे व त्यांच्या भावंडाचे संगोपन त्यांचा चुलता आणि मामा गोंविद पुरकर यांनी केले. बाबासाहेबांचे वय १६ वर्षे व रमाईचे वय अवघे ९ वर्षांचे असतानाच भायखळ्याच्या बाजारात त्यांचे लग्न झाले. विवाहानंतर मिराअक्काने रमाला व भीमाला मातृवत प्रेम दिले. त्यांच्या वैवाहिक जीवनाचा सुरुवातीचा काळ खूपच हालअपेष्टांचा व काबाडकष्ट करण्यात गेला. अशा कठीण परिस्थितीत रमाबाईंनी मनाची शांतता ढळू दिली नाही. 

डॉ. आंबेडकर परदेशात असताना कुटुंबाची काळजी, जीवघेणी गरिबी, मुलांचे एकामागून एक मृत्यू अशा अनेक संकटांमुळे रमाईची प्रकृती ढासळली. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता मुलांसाठी व कुटुंबासाठी, आपल्या विद्वान पतीसाठी खूप हालअपेष्टा सहन केल्या. सहा माणसांचे कुटुंब होते. एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच पार पाडत होत्या. मात्र त्यासाठी त्या कुणाकडेही हात पसरत नव्हत्या. बाबासाहेबांच्या गैरहजेरीत स्वत:च्या आणि मुलांच्या आजारपणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि रोजच्या घरखर्चासाठी स्वत: काबाडकष्ट करत त्यांनी सम्यक अजीविकेचा मार्ग पत्करला, तो म्हणजेच शेण गोळा करून गोवऱ्या करून त्या विकणे. त्यावर येणाऱ्या पैशावर त्या कुटुंबाची गुजराण करत होत्या. रमाई कधी उपाशीपोटी राहात, पण बाबासाहेबांना थोडीसुद्धा जाणीव होऊ देत नसत.

परदेशातून परत आल्यानंतर १९२३ मध्ये बाबासाहेबांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. त्यांनी रमाईसाठी सोन्याचे दागिने केले. पण रमाईने ते फारसे अंगावर घातले नाहीत. राजगृह बांधताना अडचण आली तेव्हा रमाईने त्यातलेच सोने बाबासाहेबांना दिले आणि राजगृह बांधून पूर्ण झाले. आज आपण जे राजगृह पाहतो ते रमाईच्या सहकार्यानेच बाबासाहेब पूर्ण करू शकले. मुंबईच्या सिडनहॅम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असताना बाबासाहेबांना ४५० रुपये वेतन मिळत असे. ते घरखर्चाला रमाईला ५० रु. देत असत. रमाई त्यामधून पाच रुपये शिल्लक ठेवत. डॉ. बाबासाहेब जेव्हा पुन्हा परदेशात जायला निघाले, तेव्हा ते साठवलेले पैसे त्यांना दिले. रमाईंनी अनपेक्षितपणे दिलेली रक्कम पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे डोळे भरून आले. बाबासाहेबांच्या प्रती असलेल्या असीम श्रद्धेतून निर्माण झालेले ते प्रेम होते. पत्नीचे कर्तव्य म्हणून त्यांनी कणाकणाने पैसा जमा करून बाबासाहेबांना दिला आणि त्यासोबतच आपल्या सुखाची आहुती दिली. एकदा रमाई वसतिगृहात भेट द्यायला गेल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आज मुलांना खायला काहीच शिल्लक नाही. म्हणून त्यांनी स्वत:च्या ट्रंकेतून सोन्याच्या बांगड्या काढून या बांगड्या गहाण ठेवा आणि मुलांच्या भोजनाची व्यवस्था करा, असे सांगितले. सामाजिक बांधिलकीतून रमाईंनी केलेल्या दानाच्या कितीतरी घटना सांगता येतील.

रमाईचे जीवन उच्च आदर्शांनी ओतप्रोत भरलेले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातला अमूल्य वेळ समाजोपयोगी, देशोपयोगी व सत्कारणी खर्ची व्हावा, म्हणून रमाई स्वत:ला विसरून एका अदृश्य आगीत सतत जळली. युगप्रवर्तक, महामानव बाबासाहेब या देशातील जगावेगळ्या अस्पृश्यतेविरुद्ध लढा देत होते, तर रमाई जीवनभर दु:खात होरपळत राहिली. पण दु:खातही बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. दु:खाने माणसे मोठी होतात, हे तिने जाणले होते. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे संत तुकारामांनी म्हटले आहे. रमाई गरीब कुटुंबातील असूनही महान त्यागाच्या व कारुण्याच्या वैभवाने कोट्यवधी लोकांच्या काळजात आई म्हणून कोरली गेली. 
अशा या रमाईच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
 
भाऊराव बागडे  -अकोला
बातम्या आणखी आहेत...