आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही सावित्रीच्या लेकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राला स्त्री शिक्षकांची मोठी परंपरा आहे. स्त्रीशिक्षणाचा पाया रचणा-या सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक स्त्रिया शिकल्या, सवरल्या. संधी मिळाली तिथे पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून दाखवू लागल्या. खेडोपाडी, वाडीवस्तीवर तन-मन-धन वेचून शिकवण्याचे काम करणा-या महिला म्हणजे ख-याखु-या सावित्रीच्या लेकी. सावित्रीचा शिक्षणाचा वारसा त्या नेटाने पुढे नेताहेत. तसे पाहिले तर गेल्या शतकाच्या सुरुवातीपासूनच राज्यात प्रशिक्षित शिक्षिका होण्याला सुरुवात झाल्याचे दिसते. पुढे सत्तरच्या दशकात देशात शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाला सुरुवात झाली. खासगी अध्यापक विद्यालये सुरू झाली. त्यात शिकणा-या मुलींची संख्या वाढत गेली, तशी शिक्षकांच्या तुलनेत शिक्षिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत गेली.
आजमितीस राज्याच्या प्राथमिक शिक्षणात जवळपास ४५ टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षिका कार्यरत असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. इतक्या मोठ्या संख्याने महिला आज प्राथमिक शिक्षणात कार्यरत असल्या तरी पुरुषसत्ताक व्यवस्थेचा प्रत्यय इथेही आल्यावाचून राहत नाही. सावित्रीबाई, फातिमा शेख, अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांच्यापासून राज्याला लाभलेल्या
शिक्षणाच्या देदीप्यमान परंपरेची चर्चा होत असताना आज महिला (खासकरून शिक्षिका) शैक्षणिक क्षेत्रात देत असलेले प्रामाणिक योगदान काहीसे उपेक्षित राहिल्याची खंत वाटत राहते.एकीकडे संसाराची वेल फुलती ठेवायला अपार मेहनत घेणारी, मुलाबाळांचे करणारी, कुटुंबातली कर्ती-करविती स्त्री शाळेत गेली, की शिक्षिका म्हणून झटून, समर्पित भावनेने काम करत राहते. निरागस चेहरे, उत्सुक डोळे आणि भविष्याची स्वप्ने घेऊन येणा-या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी सतत नवे काहीतरी करायला उत्सुक असते. वर्गातली,
शाळेतली सर्व मुलं चांगली शिकली पाहिजेत, यासाठी तिची अविरत धडपड सुरू असते.
घरातल्या सगळ्या जबाबदा-या पेलताना नावीन्याच्या, सृजनाच्या वाटा धुंडाळणा-या कर्तबगार, संवेदनशील शिक्षिका कमी नाहीत. दर दहा शिक्षकांत ४ ते ५ स्त्रिया असल्या तरी पुरुष शिक्षकांच्या तुलनेत स्त्रियांच्या कामाची ‘गणती’ जशी व्हायला हवी, तशी ती झालेली दिसत नाही! किंबहुना त्यांचे योगदान कुठेतरी कोप-यात भिंतीलगत उगवलेल्या आणि बाराही महिने फुललेल्या सदाफुलीसारखे दुर्लक्षितच राहिलेय. महिलादिनी वर्तमानपत्रात झळकणा-या निवडक बातम्या-लेखांपलीकडे प्रयोगशील शिक्षिकांच्या सामाजिक योगदानाची नोंद घेण्यात आपण कमी पडलोत. अगदी उदाहरणासह बोलायचे झाले तर- जिल्हा, राज्य, अथवा
राष्ट्रीय पातळीवरील दरवर्षीच्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या याद्यांवर नजर टाकली की त्यातला ‘लिंगभेद’ सहजपणे ‘पुरुषसत्ताक’ वास्तवतेची जाणीव करून देईल.

शिक्षण क्षेत्रात अनेकानेक प्रयोग, उपक्रम सुरू असतात. त्यातून नव्या वाटा निर्माण होत राहतात. परंतु हे काम समाजापर्यंत धड पोचतेच असे नाही. मग अपु-या माहितीच्या आधारे किंवा पूर्वग्रहातून होणारी एकांगी टीका वास्तव मानली जाऊ लागते. त्यामुळे ‘जे सरकारी आहे ते तद्दन फालतू, दर्जाहीन, टाकाऊ आणि जे खासगी आहे ते गुणवान’ असा सरळसोट समज आपल्याकडे मध्यमवर्गीय वाचकांनी करून घेतलाय. त्यात सरकारी शाळांचा तर विषयच नको! या शाळा म्हणजे पोरांचं वाट्टोळं करण्याची हमखास हमी, असं वातावरण निर्माण केलं गेलंय. सरकारी शाळांबाबत अशा नकारात्मक आणि अविश्वासाच्या वातावरणाची ‘निर्मिती’ केली जात असताना राज्यभरातल्या खेड्यापाड्यांतल्या शाळांकडे चौकस आणि चिकित्सकपणे बघितल्यावर असं दिसलं, की आज खेड्यापाड्यांतल्या अनेक शाळा कात टाकताहेत. तिकडे मन लावून काम सुरू आहे. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे अभिनव प्रयोग सुरू आहेत. आश्वासक काम उभं राहताना दिसतंय. शैक्षणिक ‘समृद्धीची बेटं’ तिकडे फुललीत.

या नवनिर्माणात अर्थातच महिलांची संख्या भरपूर मोठी आहे. वाडी-वस्तीवरच्या शाळेत त्या आपलं काम नेटाने करताहेत. वेगळं काही करून दाखवण्याची अनिवार ऊर्मी त्यांच्या ठायी आहे. झपाटलेपणातून आलेलं ‘जाणतेपण’ही आहे. या गोष्टी त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. बाह्यप्रेरणेपेक्षा अंत:प्रेरणा महत्त्वाची आहे. असे असले तरी पुरुष शिक्षकांप्रमाणे त्या
‘व्होकल’ नाहीत. त्यांना ‘आवाज’ नाही. मुख्य धारेतली प्रसिद्धिमाध्यमे सोडाच; सोशल मीडियातही त्यांचा अजून फारसा वावर नाहीये. म्हणूनच त्यांचे कामही दूरवर पोहोचत नाही. विशेष म्हणजे याविषयी त्यांची कोणतीही तक्रार नाहीये!

‘इदं न मम’ अशा निरलस, निरपेक्ष वृत्तीने त्या आपले मन लावून काम करताहेत. अनेक शाळांतील बदलांचे नेतृत्व महिलाच करताहेत. तिथली शैक्षणिक अभिक्रिया नीटपणे घडवून आणण्यासाठी स्वतः उत्प्रेरकाचे काम करताहेत. उत्प्रेरकाचे वैशिष्ट्य हे, की तो अभिक्रियेत उपस्थित असल्याखेरीज ती पूर्ण होत नाही, परंतु त्याचे अस्तित्व कुठेच दिसत
नाही! अशा या दूर कुठे गिरिकंदरात कार्यरत असलेल्या उत्प्रेरक स्वभावाच्या सावित्रीच्या लेकींचा परिचय मधुरिमातल्या या पाक्षिक सदरातून होणार आहे.