आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी शाळेतून धावतच आली. ‘मम्मी, माझी शाळेतून बुद्धिबळासाठी निवड झाली आहे त्यासाठी मला खूप सराव करायचा आहे. आता तू हातातले सगळे काम सोड आणि माझ्यासोबत बुद्धिबळ खेळण्यासाठी बस.’ ‘अगं, तू आता शाळेतून आली आहेस, थोडा श्वास तर घे आणि मला सविस्तर सांग काय झाले ते!’
‘मम्मी, आमच्या शाळेत बुद्धिबळ घेण्यात आले होते त्याच्या तीन फे-या होत्या. त्या तिन्ही मी जिंकले. आता एका ठिकाणी दुस-या शाळेच्या स्टुडंटसोबत आमची स्पर्धा राहील. त्यासाठी मला आता खूप सराव करायचा आहे. आता तू तुझी कामे पटकन आवर आणि माझ्यासोबत बस.’ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिच्या वडिलांना तिच्यासोबत पाठवले. पहिला दिवस तिच्यासाठी थोडा जडच गेला, कारण पहिल्यांदाच ती अशा स्पर्धेला गेली होती. तिच्यासाठी सगळे नवीन होते, पण ती छान खेळत होती. तिच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आला होता. दुस-या दिवशी मी तिच्यासोबत गेले. तिथे तिच्या मैत्रिणी भेटल्या व मला सांगू लागल्या, ‘काकू, ही खूप छान खेळते, सराव करून आली का?’ मी हो म्हटले. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होण्यास थोडा वेळ असल्याने सर्व मैत्रिणी सरावासाठी बसल्या. सगळ्याजणी एकमेकींना विचारत होत्या की, तुला किती पॉइंट पडले. कोणी सांगत होते, मला एक, कोणाला दोन, कोणाला तीन. कमी पॉइंट आहे म्हणून काय झाले, आपल्या शिकायला तर मिळतेय, असे ती मुले आपापसात बोलत होती. मुलांची ही समजूतदार वृत्ती पाहून फारच बरे वाटले.
थोड्याच वेळाने तिथे नावांची लिस्ट लागली आणि लगेच स्पर्धा चालू झाली. सकाळी 10 ते दुपारी 1 यादरम्यान दोन फे-या झाल्या. शेवटची फेरी बाकी होती.
त्या वेळी सगळे जण लिस्ट लावण्याची वाट बघत होते. तेवढ्यात तिथे एका प्रसिद्ध दैनिकाच्या पत्रकार ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आमच्याजवळ आल्या. माझ्याशेजारीच एक पालक उभ्या होत्या, त्यांना त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुम्हाला इथे मुलांची काही गैरसोय तर वाटत नाही ना, बसण्यासाठी जागा अपुरी तर नाही ना, वगैरे. त्या बार्इंनी त्यांना योग्य ती उत्तरे दिली. मग त्या माझ्याजवळ आल्या. थोडं हसतच म्हणाल्या, ‘ब-याच वेळापासून तुम्ही इथे आहेत, ही स्पर्धा कालपासून चालू आहे. त्याबद्दल तुम्ही सांगा कसं वाटतंय?’ मी त्यांना म्हटले, ‘इथले जे वातावरण छान आणि प्रेरणादायी आहे मुलांसाठी. आत्मविश्वास वाढवणारे आहे. मीसुद्धा त्यांच्यासोबत आनंदी व उल्हसित आहे.’
‘तुम्हाला असं वाटत नाही का की, आजचे आईवडील मुलांवर दबाव टाकतात?’ असं म्हटल्यावर थोडा मनावर दबाव आल्यासारखं झालं; पण मी त्यांना म्हटलं, ‘मी तिला क्लास लावला नाही. ती व मी कॉम्प्युटरसोबत खेळताना बुद्धिबळ शिकलो. थोडी प्रेरणा मी तिला दिली आणि तिने शाळेत भाग घेतला व ती इथपर्यंत आली. मी तिच्यावर कधीच कुठल्या प्रकारचा दबाव टाकत नाही. तिला आम्ही सांगतो तुझ्याकडून जेवढे होते तेवढेच कर. आणि आमच्यासाठी ती महत्त्वाची आहे, स्पर्धेतील तिचे यश नव्हे.’
‘आईवडिलांनी मुलांवर दबाव न टाकता त्याची कशामध्ये रुची आहे त्याप्रमाणे त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा मुलांना स्पर्धात्मक परीक्षेत भाग घ्यायला सांगतात तेव्हा त्यांनी त्याच्या बालपणावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादले जाणार नाही, हीसुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे.’आमचा संवाद छान चालू होता. तेव्हाच शेवटच्या फेरीची लिस्ट लागली व आमचा संवाद तिथेच थांबला. ‘चला मीसुद्धा जाते, प्रत्येक पालकाने असाच विचार केला पाहिजे,’ असं म्हणत त्या गेल्या व स्पर्धा चालू झाली.