आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरचा साहित्यिक इतिहासकार (भूषण देशमुख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगरच्या निझामशाहीचा इतिहास सांगणारा ‘बुरहाने मासीर’ हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथकर्ता सय्यद अली तबातबा हा निझामशाहीतील अनेक घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक घटना त्याने आपल्या या ग्रंथात नोंदवल्या आहेत. सय्यद अली तबातबा मूळचा इराणमधील सिमनान या गावचा राहणारा. हिजरी ९८८ मध्ये तो भारतात आला. त्या काळी भारत आणि इराणमध्ये व्यापाराबरोबर अन्य अनेक बाबतींत जवळचे संबंध होते. सय्यद अली प्रथम गोवळकोंड्यात वजीर मीर शहा अमीरच्या पदरी राहिला. अमीरला काही कारणाने अटक झाल्यानंतर सय्यद अलीने गोवळकोंडा सोडले. नळदुर्गच्या वेढ्यात तो निझामशाहीकडे आला. दुसऱ्या बुऱ्हाणशहाकडे रुजू झाल्यानंतर त्याला थोडे स्थैर्य प्राप्त झाले. बुऱ्हाणशहाने त्याला निझामशाहीचा इतिहास लिहायला सांगितले. हिजरी ९९९ मध्ये त्याने ग्रंथलेखनाला सुरुवात केली आणि हिजरी १००३ मध्ये लिखाण संपवले. हिजरी १००५ मध्ये त्याचा मृत्यू झाला.

हैदराबादमध्ये छपाई : सय्यद अलीने लिहिलेल्या तवारिखची हस्तलिखित प्रत केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात आहे. या हस्तलिखिताला त्याच्या मुलाने- अबू तालीब याने नंतर जोड दिली. या प्रतीवरून हैदराबादमध्ये ‘बुरहाने मासीर’ ग्रंथ छापला गेला. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर नंतर सर वुलस्ले हेग यांनी ‘द हिस्ट्री आॅफ द निझामशाही किंग्ज आॅफ अहमदनगर’ या नावाने केले. हे लिखाण प्रथम ‘द इंडियन अँटिक्वेरी’च्या अंकांत प्रकाशित झाले. ब्रिटिश इंडिया प्रेसने ते ग्रंथरूपात प्रसिद्ध केले.
- भूषण देशमुख, अहमदनगर
बातम्या आणखी आहेत...