Home | Magazine | Pratima | bhushan deshmukgh article on antic pic

अँटिक्सची अजब दुनिया

भूषण देशमुख | Update - Jul 27, 2012, 10:38 PM IST

सरकारी नोकरी सांभाळून, शिवाय कर्मचारी संघटनेचा व्याप पाठीशी असताना एखादी व्यक्ती ऐतिहासिक वस्तूंचा किती मोठा संग्रह करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नगरचे अबुबकर पठाण

 • bhushan deshmukgh article on antic pic

  सरकारी नोकरी सांभाळून, शिवाय कर्मचारी संघटनेचा व्याप पाठीशी असताना एखादी व्यक्ती ऐतिहासिक वस्तूंचा किती मोठा संग्रह करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नगरचे अबुबकर पठाण! आगपेट्यांच्या टिक्क्यांपासून सुरू झालेला त्यांचा छंद विस्तारत आता त्याला संग्रहालयाचे स्वरूप आले आहे. काय नाही त्यांच्या संग्रहात ? नाणी, नोटा, हस्तलिखिते, पोथ्या, ग्रंथ, सनदा, भांडी, अडकित्ते, दिवे, कुलपे, मूल्यवान खडे, शस्त्र, राजे-रजवाड्यांचे भरजरी कपडे, अत्तरं...पाहण्यासाठी एक दिवस कमी पडेल इतक्या बेहत्तरीन चिजा अबुबकर यांच्या संग्रहात आहेत.
  शाळेत असताना त्यांना काडेपेट्यांवरील रंगीत चित्रे गोळा करण्याचा छंद जडला. त्याकाळी जहाज, रेल्वे, फुले, दिवे अशी चित्रे असलेले टिक्के मिळायचे. कुठून कुठून ते जमा करून त्यांचे गठ्ठे त्यांनी करून ठेवले होते. पुढे पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा नाद लागला, पण नंतर हे टिक्के व तिकिटे त्यांनी छंद जोपासणा-या शाळकरी मुलांना देऊन टाकले. ं
  लष्कराच्या सीक्यूएव्ही आस्थापनेत नोकरी लागल्यानंतर अबुबकर यांच्यातील छांदिष्ठाला नवे परिमाण मिळाले. वाहनांच्या चाचणीसाठी त्यांना देशभर फिरावे लागे. त्यानिमित्ताने त्यांनी तब्बल दहा वेळा भारतभ्रमण केले. एखाद्या गावात थांबले की, ते तेथील जुन्या बाजारात चक्कर मारत. अशा भ्रमंतीतून एक-एक अँटिक वस्तू त्यांच्याकडे जमू लागली. वस्तू दुर्मिळच असायला हवी, असा त्यांचा आग्रह नसे. वेगळी, कलात्मक वस्तू दिसली की ते विकत घेत. चाळीस-पन्नास किलो वजनाची जड भांडीही त्यांनी गोळा केली. यातील ब-याचशा गोष्टी नंतर त्यांनी इतरांना देऊन टाकल्या. मात्र, ज्यांना खरंच ऐतिहासिक महत्त्व आहे अशा जिनसा जपून ठेवल्या. अबुबकर यांच्या संग्रहात अडीच-तीन हजार वर्षांपूर्वीच्या मातीच्या नाण्यांपासून विविध कालखंडातील दुर्मिळ नाणी आहेत. त्यात आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे रोमन नाणेही आहे. मुघल, बहामनी, निजामशाही, मराठे, इंग्रज अशा राजवटींचे दर्शन या नाण्यांतून होते. देशभरातील सुलतानांच्या नाण्यांचा मोठा संच त्यांच्याकडे आहे. मोहेंजोदडो उत्खननात ज्या पद्धतीची टेराकोटा खेळणी सापडली, तशी काही खेळणी, खापराची भांडी अबुबकर यांच्याकडे आहेत. अरबी आयाते कोरलेली मुघलकालीन तसेच पूर्वी राजे-रजवाडे विषपरीक्षेसाठी वापरत असलेली जहरमोहरा दगडापासून बनवलेली भांडी त्यांच्या संग्रहात आहेत. ही भांडी खुलताबाद, दौलताबाद, वेरूळ, अजिंठा परिसरात त्यांना मिळाली. अबुबकर यांच्याकडे अडकित्ते, घड्याळे, दुर्बिणी, मूल्यवान खडे, सुवर्णजरीने नक्षीकाम केलेले राजस्थानी पोशाख अशा अनेक गोष्टी आहेत. दिव्यांचे पन्नास तरी प्रकार त्यांच्या कलेक्शनमध्ये असतील. त्यात मंदिरातील दिवे, लामणदिवे, कंदील, सायकलचा दिवा, रेल्वेचा लालटेन, तसेच बग्गीवरचा दिवाही आहे.
  जहांगीर, अकबर, निजाम आदींच्या सनदा, मोहरा, संस्कृत मोडीतील पोथ्या, शंभर वर्षांपेक्षा जुने ग्रंथ, याचबरोबर पार्कर कंपनीचे जुने पेन आणि सत्तर वर्षांपूर्वीचा ब्रिटिश पेन्सिलींचा संचही आहे. शस्त्रांमध्ये खंजीर, तलवार आणि ब्रिटिशकालीन रिव्हॉल्व्हर आहे. विजेची गरज नसलेला किल्लीवर चालणारा ग्रामोफोन आणि जुन्या काळातील गायकांच्या गाण्यांच्या असंख्य तबकड्या त्यांच्याकडे आहेत. काही वर्षांपूर्वी नगरच्या स्थापना दिनी (28 मे) भरलेल्या प्रदर्शनात या ग्रामोफोनवरची गाणी ऐकण्याची संधी नगरच्या रसिकांना मिळाली होती. लवकरच हे सर्व वर्षभर बघता येणार आहे. अबुबकर आता निवृत्त झाले असून दमडी
  मशिदीपासून थोडे पुढे नागरदेवळे फाटा येथे स्वत:चे संग्रहालय उभारण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
  छोटे हस्तलिखित कुराण शरीफ - काडेपेटीपेक्षा छोट्या आकाराचे हाताने लिहिलेले ‘कुराण शरीफ’ अबुबकर पठाण यांच्याकडे आहे. चांदीच्या लहानशा पेटीवजा ताईतमध्ये ते ठेवलेले होते. औरंगाबादमध्ये ही मूल्यवान भेट त्यांना गवसली.
  de.bhush@yahoo.co.in

Trending