आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhushan Deshmukh Article About Sachidananda Baba, Divya Marathi

ज्ञानेश्वरीचे लेखनिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानदेवांच्या मुखातून निघणारे ओजस्वी, प्रासादिक शब्द लिहून ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ सिद्ध करणारे सच्चिदानंदबाबा हे नगर जिल्ह्यातील नेवाशाचे रहिवासी. या गावात आजही त्यांचे वंशज राहतात. प्रवरामायीच्या काठी सच्चिदानंद यांचे मंदिरही आहे. जवळच त्यांच्या पत्नीची आठवण जपणारे तुळशी वृंदावन आहे. नेवासे तीर्थक्षेत्र विकास योजनेत सच्चिदानंदांची स्मृतीही जतन करायला हवी...

मराठी सारस्वताला ललामभूत ठरलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती तेराव्या शतकात अमृतवाहिनी प्रवरेकाठी झाली. संत ज्ञानेश्वरांनी करविरेश्वराच्या मंदिरातील ज्या खांबाला टेकून श्रीमद्भगवतगीतेवर रसाळ मराठीत प्रवचने दिली, तो ‘पैस’ खांब आज कोट्यवधी मराठी माणसांचे श्रद्धास्थान बनला आहे.

‘पैस’वर डोकं ठेवलं, की मन शांत होतं. ज्या परिसरात ज्ञानेश्वरांच्या मुखातून गीताक्षरं वदली, ओव्या निनादल्या ते वातावरण आजही आपल्याला भारून टाकतं. ज्ञानदेवांनी जे सांगितलं, ते त्यांचे लेखकू झालेल्या सच्चिदानंद थावरे यांनी लिहून घेतलं. ज्ञानदेव आणि सच्चिदानंदांची भेट .+झाली नसती, तर कदाचित या महान ग्रंथाची निर्मिती नेवाशात झाली नसती. सच्चिदानंद हे रूढार्थाने साहित्यिक नव्हते. गावाचे ते कुलकर्णी. त्यांचे हस्ताक्षर सुवाच्च. शिवाय अध्यात्माची आवड. त्या काळात वाचणारे-लिहिणारे बोटावर मोजण्याइतकेच असायचे. पोटदुखीमुळे आजारी पडलेले सच्चिदानंद मृत्यूपंथाला लागले होते. ते गेले असे समजून अंत्यविधीची आणि त्यांच्या पत्नीची सती जाण्याची तयारी सुरू झालेली. पण ज्ञानदेवांमुळे त्यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर उर्वरित सगळं आयुष्य सरकारी चाकरीऐवजी ज्ञानियांच्या चरणी व्यतित करण्याचा संकल्प त्यांनी केला. ज्ञानेश्वर मंदिरात ‘पैस’च्या गाभार्‍याबाहेर सच्चिदानंदांची मूर्ती आहे. अर्थात ती अलीकडच्या काळात बसवलेली आहे. पण सच्चिदानंदांचे मंदिरच प्रवरेच्या पलीकडच्या काठावर असलेल्या नेवासे बुद्रूक गावात आहे.

या मंदिरात सच्चिदानंद यांची लेखनसाधना करणारी मूर्ती आणि शिवलिंग आहे. जवळच म्हळसा-खंडोबा मंदिर आहे. या मंदिरासमोर सच्चिदानंद यांच्या पत्नी सौदामिनी माता यांच्या समाधीस्थानी उभारलेले तुळसी वृंदावन आहे. भावार्थदीपिकेचे 18 अध्याय पूर्ण झाल्यानंतर ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे आळंदीकडे निघाली. त्यांच्यासोबत पैठणहून आणलेला रेडाही होता. ग्रंथाची सुवाच्च अक्षरांतील प्रत तयार करण्याचं काम ज्ञानदेवांनी सच्चिदानंदबाबांवर सोपवले. त्यामुळे ते नेवाशातच थांबले. ही प्रत त्यांनी नंतर आळंदीला नेऊन दिली. तुम्ही कधी नेवाशाला ‘पैस’चं दर्शन घेण्यासाठी गेलात, तर सच्चिदानंदबाबांच्या मंदिराकडेही जाऊन या..