आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पॉवर'फुल वाटचाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्यंत आक्रमक आणि सतत चर्चेच्या केंद्रस्थानी, बेधडकपणे अधिका-यांची झाडाझडती घेण्यात हातखंडा, पंचायत समितीपासून सुरुवात केल्यानंतर थेट खासदारकीपर्यंत धडक देण्याचा उद्देश व त्या दृष्टीने घरातून आव्हान असतानाही सुरू केलेली वाटचाल अशी दबंगगिरी कोणा पुरुष राजकारण्याची नाही तर एका महिलेची आहे. महिला आरक्षणानंतर लाल दिव्याचा मान मिळालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी घेतलेली भरारी म्हणजे इतर महिलांसाठी वस्तुपाठच जणू.
धुळ्यातील साक्री तालुक्यात माहेर असलेल्या जयश्री पवार यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. काका सुखलाल चौधरी जिल्हा परिषदेचे सदस्य होते. मात्र त्या वेळी वडिलांच्या नोकरीमुळे जयश्री यांना धुळ्यात राहावे लागले. पुढे 1994च्या सुमारास त्यांचे लग्न राष्‍ट्रवादीचे नेते ए.टी. पवार यांचे चिरंजीव नितीन पवार यांच्याशी झाले. जवळपास 15 वर्षे त्यांनी सास-यांचे राजकारण जवळून अनुभवले. कार्यकर्त्यांची वर्दळ, निवडणुकांची तयारी, रणनीती, विकासकामांच्या पद्धती, जनता दरबार व कधी वेळ पडली तर प्रचारासारखी किरकोळ कामेही केली. मात्र महिला आरक्षणाचे वारे वाहू लागल्यानंतर त्यांनी 2007मध्ये बापखेडा गणातून पंचायत समिती निवडणूक लढवली. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर फारसे काम करता येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. येथे स्कोप नाही, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्या पाहिजेत, असेही सांगितले गेले. मात्र पवार यांनी धीर न सोडता योजना समजून घेण्यास सुरुवात केली. योगायोगाने पती नितीन कळवण पंचायत समितीचे सभापती झाले. विकासकामे, पक्षाच्या बैठका, दौरे यांच्यात ते व्यग्र होऊ लागले. त्यामुळे त्यांची परवानगी घेऊन दुसरीकडे जयश्रीतार्इंनी पंचायत समितीची सूत्रे हाती घेतली. पुरुष राजकारण्यांच्या दालनात महिला जात नाही हे ओळखून त्यांनी स्वतंत्र केबिन तयार केली. पाहता पाहता महिला समस्या घेऊन येऊ लागल्या. महिलांचे राजकारण व समाजकारणातील योगदान, रोजगाराची सोपी साधने समजावून घेतली. त्यातून आदिवासी पाड्यात तीन मोठे बचत गट तयार करून मसाल्यांपासून तर अन्य घरगुती पदार्थांची विक्री नाशिक शहरात सुरू केली. एकीकडे महिला सक्षमीकरण व दुसरीकडे जवाहर विहिरी, रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाचा त्यांनी धडाका लावला. सुरगाण्यासारख्या दुर्गम आदिवासी भागात तीन प्राथमिक आरोग्य पथकेही त्यांच्याच प्रयत्नातून कार्यान्वित होणार आहेत. 2012 मध्ये जयश्रीताई जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. योगायोगाने अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होते. पती नितीन येथेही सदस्य म्हणून बरोबर होते. सर्वसाधारणपणे महिला पदाधिका-यांचा कार्यभार त्यांचे पतिराज सांभाळतात असा अनुभव असताना पवार यांनी परंपरा खंडित केली. स्वत: निर्णय घेणे, अधिका-यांना शिस्त लावणे, आक्रमकपणे लोकांची बाजू मांडण्यास सुरुवात केली. अधिका-यांना सभागृहातून बाहेर काढून देण्यापासून थेट त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापर्यंतच्या बेधडकपणामुळे ब-याच वेळा त्या वादातही राहिल्या. विकासकामे होत नसल्याचे बघून त्यांनी मंत्रालयातील अधिका-यांनाही सुनावण्यास कमी केले नाही. सद्य:स्थितीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्‍ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत त्यांची भावजय भारती पवार यांचे आव्हान त्यांना होते. आता खासदारकीच्या उमेदवारीसाठी सासरे ए.टी. पवार हेही स्पर्धेत आहेत. मात्र प्राधान्य सास-यांना देत त्यांनी उमेदवारी नाकारली तर स्वत: लढवण्याचा त्यांचा मनोदय अहे.