आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मॅन ऑफ स्टील’ या चित्रपटाचे स्वागत फारसे उत्साहाने झाले नाही, याला कारण गेल्या काही वर्षांत सुपरमॅनची लोकप्रियता कमी झाली आहे. त्याला ‘बॅटमॅन’सारख्या प्रतिस्पर्धी महानायकांनी चांगलाच शह दिला आहे. ‘सुपरमॅन’चा जन्म झाला तो कॉमिक्सच्या माध्यमातून अमेरिकेत! त्याची लोकप्रियता पहिल्या पाच-दहा वर्षांत तुफान वाढली, पण नंतर त्याला अनेक प्रतिस्पर्धी निर्माण झाले. भारतात मात्र सुपरमॅन कॉमिकऐवजी महाबली वेताळ ऊर्फ फँटम, जादूगार मॅड्रेक अशी मंडळी जास्त लोकप्रिय झाली. स्वस्त किंमत आणि आकर्षक चित्रे यामुळे त्यांची लोकप्रियता वाढतच राहिली. सुपरमॅन म्हणजे स्वप्नांचा प्रदेश. मानवी आवाक्यात नसलेल्या अनेक गोष्टी ‘सुपरमॅन’ करतोच, पण 1978 च्या सुपरमॅन चित्रपटात तो चक्क पृथ्वी उलटी फिरवतो आणि तोडलेले पूल वगैरे नव्याने सांधून देतो. मृत माणसांना जिवंत करतो. सुपरमॅनच्या लोकप्रियतेचे वैशिष्ट्य मानवी आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी करण्यात होतेच, पण आपल्या अंतर्मनाचा त्याच्याशी अधिक निकटचा संबंध होता. जगभरच्या मानवी समूहात जसे देव-देवस्की, उत्पत्तीविषयक कथा, चेटूक, विशिष्ट आदिबंध हे कायम दिसत राहतात, त्यामधील एक आहे अमानवी शक्ती असलेल्या हीरोचा. या हीरोविषयीच्या कथा जगभरच्या सा-या समूहात आहेत.

कधी परीकथांच्या रूपाने, तर कधी मौखिक परंपरेतून आलेल्या रॉबिनहूड ते संताजी-धनाजीपर्यंतच्या...या हीरोचा प्रवास साधारणपणे असा होतो. राजाने एखाद्या कामासाठी दवंडी पिटवलेली असते. (उदाहरणार्थ, सात समुद्रापलीकडचे जादूचे फूल आणणे, जे हुंगल्यावर राजकन्या जागी होईल वगैरे). ही दवंडी ऐकून आईबरोबर राहणारा, पित्याचे छत्र हरपलेला गरीब नायक दरबारात जातो. थोडक्यात, आव्हान स्वीकारतो. राजा त्याला एखादी तलवार वगैरे देतो. वाटेत त्याला अनेक अडचणी येतात. एखाद्या ठिकाणी तो थांबतो. आजारी साधूची शुश्रूषा करतो. त्यावर प्रसन्न होऊन साधू त्याला मुळी किंवा अंगठी देतो. तिच्या साहाय्याने त्याला अदृश्य होता येईल किंवा तत्सम अमानवी शक्ती मिळेल. प्रत्यक्षात तो पोहोचतो तेव्हा फुलाभोवती राक्षसाचा पहारा असतो. त्या राक्षसाचा जीव पोपटात असतो, अशी वेगळी माहिती त्याला मिळते. राक्षसाला संपवून त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. जोसेफ कॅम्पबेलसारख्या मायथॉलॉजी तज्ज्ञांनी याबद्दल ‘जर्नी ऑफ अ हीरो’ या नावाचे पुस्तकच लिहिले आहे.

स्क्रिप्ट रायटिंगच्या अनेक पुस्तकांत हा प्रवास आढळतो. (उदाहरणार्थ, रेमंड फ्रेन्शॅम यांचे ‘टीच युअरसेल्फ स्क्रीनरायटिंग’ हे पुस्तक). यामुळेच स्टार वॉर्स ही मालिका बनवताना दिग्दर्शक जॉर्ज लुकास याने जोसेफ कॅम्पबेलला पाचारण केले. 2001 मध्ये न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर कोसळल्यानंतर अमानवी शक्ती असलेल्या नायकांच्या चित्रपट रसिकांना धक्का बसला. कारण चित्रपट आणि वास्तव यातील फार सणसणीत फरक त्यांच्यावर येऊन आदळत होते! तरीही बॅटमॅन, स्पायडरमॅन यांचे पुनरुज्जीवन झालेच. हे सारे नायक जोसेफ कॅम्पबेलच्या नायकाप्रमाणेच आईचे छत्र हरवलेले, आव्हान स्वीकारणारे होतेच; पण 2001 नंतर नायकांची भेद्यता वाढली. जवळजवळ पराभूत होण्याच्या खाईत जाऊन ते परत येऊ लागले आणि खलनायक अधिक ताकदवान झाले...एकीकडे डिजिटल तंत्रज्ञानानेही हीरोंच्या चित्रणात फरक पडला. स्टुडिओत काचेवर उभा राहिलेला नायक आणि हेलिकॉप्टरमधून घेतलेली शहराची दृश्ये हे एकत्र करून दाखवलेले नायकाचे उड्डाण आता जुने झाले आहे. पण हे सुपरहीरो व्हिलनचा खात्मा करतात, तेही ठोसे मारूनच. कारण शेवटची हातघाई पाहिली नाही, तर प्रेक्षकाला पैसे वसूल झाल्याचे समाधान मिळत नाही. थ्रीडी आणि डिजिटल तंत्रज्ञानातून साकारलेले महाकाय सेट्स आणि ते उद्ध्वस्त करतानाचे चित्रण करताना रक्ताचा थेंबही उडत नाही. गाड्यांचा चुराडा होताना कोणाचेही अवयव तुटत नाहीत. संहार तर दाखवायचा, पण रक्तपात नाही! क्रौर्य तर दाखवायचे, पण हिंसा टाळायची. अशा काहीतरी विचित्र तडजोडी करत हे सुपरहीरो पडद्यावर येतात, पण जुन्या पिढीला कॉमिक्समध्ये ते आजही जास्त जवळचे वाटतात. त्यामुळे पडद्यावरचे महानायक गल्ला जमवत असले, तरी जुन्या कॉमिक्सची मागणी कायम आहे. त्यामुळे दुर्मिळ पुस्तकांच्या दुकानात जुनी कॉमिक्स विकणे, हा एक गल्लाभरू उद्योग बनला आहे.