आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पक्ष्‍यांच्या रंगीबेरंगी जगाचा कानोसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिमणी, कावळा, कबुतर, साळुंकी या प्राण्यांच्या पलीकडेही पक्षिजगत आहे. नीट लक्ष देऊन पाहिले तर याव्यतिरिक्त अनेक पक्षी आपल्या आजूबाजूला असतात. डोळे, कान थोडे उघडे ठेवले आणि लक्ष देऊन पाहिले/ऐकले तर त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवते. मात्र कधी-कधी होते असे की एखादा वेगळा पक्षी दिसतो, पण तो कोणता तेच कळत नाही. अनेकदा याची फार हुरहुर लागून राहते. बरे, इंटरनेटवर पक्ष्याचे नाव टाकले की चित्र समोर दिसते. पण चित्र टाकून नाव येणे अजून थोडे कठीण आहे (अशक्य नाही). अशा वेळी एखादे संदर्भपुस्तक सहज हाताशी असावे असे वाटते. इंग्रजीत अशी बरीच पुस्तके आहेत. डॉ. सलीम अली यांची पुस्तकं यात सर्वात वरच्या स्थानावर आहेत. मराठी पक्षिप्रेमींचा हा प्रश्न ‘पक्षी आपले सख्खे शेजारी’ या किरण पुरंदरे लिखित पुस्तकाने सहज सोडवला आहे. ज्योत्स्ना प्रकाशनाचे हे पुस्तक अतिशय देखणे आहे. आर्टपेपरवर छापलेली पक्ष्यांची उत्तम छायाचित्रे आणि त्यांची सहज कळेल अशा शब्दांतली संपूर्ण माहिती यांमुळे हे पुस्तक आकर्षक झाले आहे. यात 35 ते 40 पक्ष्यांची सचित्र माहिती आहे, जे महाराष्‍ट्रात सहजी आढळून येतात. ते पाहायला खास रानात वा अभयारण्यात जाण्याची गरज नाही. ते आपल्या घराशेजारच्या झाडावर, येण्या-जाण्याच्या रस्त्यावर, छोट्या तळ्याच्या काठी मुंबईतसुद्धा दिसतात, तर बाकीच्या शहरांमध्ये नक्कीच दिसतील.


पुस्तकात अर्थातच फक्त पक्ष्यांची छायाचित्रे आणि माहिती नाही; त्यांची उत्पत्ती कशी झाली, याची रंजक गोष्टही यात आहे. ज्या ठिकाणी पुरेसं खाद्य उपलब्ध आहे अशा कोणत्याही प्रदेशात पक्षी राहू शकतात, म्हणूनच पक्षी हा पृथ्वीवरचा यशस्वी प्राणिगट आहे. कावळे, जे आणि मॅगपाय हे झाडांवर राहणा-या पक्ष्यांमधील सर्वात बुद्धिमान पक्षी. स्वत: मिळवलेलं खाद्य लपवून ठेवणं व गरज पडेल तेव्हा खाणं, एखाद्या हॅवरसॅकमध्ये ठेवलेल्या खाद्यपदार्थांसाठी सॅकची चेन उघडणं, अशा करामती कावळे सहज करतात. आफ्रिकन ग्रे पॅरट हा पोपट शेकडो पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आवाजाच्या हुबेहूब नकला करू शकतो. त्याचा शब्दसंग्रह चार वर्षं वयाच्या मुलाच्या शब्दसंग्रहाएवढा समृद्ध असतो. अशी पुस्तकी परंतु रंजक माहिती त्यात आहे.


नव्याने पक्ष्यांचे निरीक्षण सुरू करणा-यांसाठी यात उपयुक्त सूचना आहेत. नोंदी कशा ठेवायच्या, काय महत्त्वाच्या गोष्टी पाहायच्या, घरट्यांचे प्रकार, पक्ष्यांचे आवाज, ते कोणत्या ऋतूत दिसतात याचीही सविस्तर माहिती त्यात आहे. त्यामुळे पक्षिनिरीक्षण हा छंद जोपासणा-यांसाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. त्यांनी कोणती दुर्बीण वापरल्यास चांगले, हेही लेखकाने योग्य पद्धतीने नोंदवले आहे. तसेच यात पक्ष्यांची स्थानिक नावांबरोबरच इंग्रजी व शास्त्रीय नावेही आहेत. पुस्तकातील लक्ष वेधून घेणारा भाग आहे यातील छायाचित्रे. उत्तम प्रतीच्या कागदावर असलेली रंगीत छायाचित्रे पाहणेदेखील आनंद देणारे आहे, मग प्रत्यक्षात तो पक्षी पाहायला मिळायला (आणि ओळखताही आला) तर सोन्याहून पिवळेच ना? प्रत्येक पक्ष्याची किमान दोन उत्तम छायाचित्रे यात आहेत. त्यामुळे यापुढे ‘आमच्या इकडे ना काल एक वेगळाच पक्षी दिसला, पण तो कोणता होता हे कसं कळणार,’ असं म्हणायचा पर्याय आता नाही.

पक्षी आपले सख्खे शेजारी
किरण पुरंदरे, ज्योत्स्ना प्रकाशन
किंमत रु. 200, पाने 144