आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका लोकनेत्याचा राजीनामा ...अर्थात तिस-या काकांची शोकांतिका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा सध्या मोठा खडतर काळ चालू आहे. प्रमोद महाजनांची हत्या झाल्यापासून आजपर्यंत त्यांचे गाडे काही रुळावर यायला तयार नाही. एकेकाळी महाजन-मुंडे हे मेव्हणे म्हणजे भाजपचे कृष्णार्जुन होते; पण आता हा अर्जुन एकटा पडला आहे.
अलीकडे घरातल्या धनंजयानेच या अर्जुनावर वार केला. परळी नगराध्यक्ष निवडणुकीवरून पुतण्याने थेट आव्हान दिले. पक्षादेशसुद्धा धुडकावून लावून स्वत:चा उमेदवार निवडून आणला. आता-आतापर्यंत बीड जिल्ह्यातल्या, भाजपच्याच नव्हे, तर सर्वपक्षीय लोकांना आपल्या खिशात ठेवणा-या गोपीनाथरावांची स्वत:च्या गावात मोठी केविलवाणी स्थिती झाली. खरे तर, संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचा प्रभाव पडू शकेल असे भाजपमधले लोकनेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. बाकीचे नेते म्हणजे गडकरी, तावडे, फुंडकर, खडसे वगैरे हे एकतर एखाद्या भागाचे नेते किंवा त्यांना मिळालेल्या पदांमुळे आणि वर्तमानपत्रांमध्ये सतत नाव येऊन येऊन तयार झालेले नेते. उलट मुंडे हे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून आणि शेतकरी ओबीसी कुटुंबातून आले. बेरजेचे राजकारण त्यांना उत्तम कळले आणि जमले. शिवाय, भाजपमध्ये राहूनही ते आक्रमक जातीयवादी झाले नाहीत. ऐन रामजन्मभूमी-बाबरी वादामुळे झालेल्या अयोध्या आंदोलनातसुद्धा यांनी कधी आगखाऊ भाषणे केली नाहीत. एकेकाळी आणीबाणीला विरोध करून हे तुरुंगात गेले. नंतर आमदार झाले. विचाराने हे संघवाले असले तरी आजूबाजूच्या मराठवाडा नामांतर, विषमता निर्मूलन यांच्यासारख्या चळवळींचा प्रभाव होताच. त्यामुळे यांचे राजकारण तसे बहुजनवादी राहिले.


1992नंतर यांनी थेट शरद पवारांशी टक्कर घेतली. हे मोठे हीरो झाले. 1995मध्ये सत्ता आली. सत्तेत गेल्यानंतर यांची झाकली मूठ उघडत गेली खरी. तरीही पूर्वीच्या हीरोगिरीचं वलय अजूनही थोडंबहुत कायम आहे. गेल्या दहा वर्षांत मात्र मुंडे यांचा आदर्शवाद कोसळलेला दिसतो. बहुधा, सत्तेच्या बाहेर राहावे लागले त्याचाही परिणाम असेल. पूर्वी, महाराष्ट्रातली काँग्रेसच्या सत्तेची व्यवस्था उलथून टाकण्याचे त्यांचे स्वप्न होते. म्हणूनच तर राज्यभरातले तरुण त्यांच्याभोवती गोळा झाले; पण आज ती उमेद राहिलेली दिसत नाही. आता असेल नसेल तेवढी सत्ता स्वत: आणि स्वत:चे कुटुंब याकडे ओढण्यासाठी त्यांची सगळी तगमग चालू आहे.
अलीकडे सत्तारूढ आणि विरोधी असा भेदही कमी होत चालला आहे. सत्तेतल्या मोक्याच्या मंत्र्यांशी आणि नेत्यांशी तुमचे संबंध असतील तर आज विरोधी पक्षात राहूनही सत्ताधीशांचे फायदे मिळवता येतात. थोडक्यात काँग्रेसी सत्ता उलथण्यापेक्षा बाहेर राहूनही त्या सत्तेत वाटा मिळवणे हे महत्त्वाचे कसब झाले आहे. मुंडे यांचेच पाहा. आज भाजपमध्ये त्यांना जवळचे असे कोणी नसेल; पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे विलासराव देशमुख, छगन भुजबळ, नारायण राणे हे यांचे खास मित्र! आज काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या एखाद्या सामान्य आमदाराला या मंत्र्यांची भेट मिळणार नाही; पण मुंड्यांचे काम एका फोनवरही होईल. रस्त्यावर उतरून आंदोलने करीत बसण्यापेक्षा अशा परात्पर सत्तेत मुंड्यांचा जीव फारच रमलेला दिसतो. खरा, खोटा, बरोबर, चूक कसाही असला तरी आदर्शवाद हा मोठ्या समूहाच्या संदर्भातला असतो. वैयक्तिक लाभाच्या पलीकडे जाणारा असतो. त्याचा झेंडा घेऊन जाणा-याच्या मागे लोक उभे राहतात. तो संपला की व्यवहारवादी तडजोडी सुरू होतात. त्यांना अंत उरत नाहीत. कोणत्याही गोष्टीचे कसेही समर्थन करता येते. नेत्याचा वैयक्तिक स्वार्थ हाच काहीतरी सामूहिक लाभ आहे अशी गल्लतशीर मांडणी सुरू होते. समजा, ज्वारीपासून दारू करण्याचा परवाना नेत्याने पदरात पाडून घेतला आहे, तर अशाच कारखान्यांमधून मागास भागाचा कसा विकास होणार आहे किंवा ज्वारीला जादा भाव मिळणार आहे, असे समर्थन पुढे केले जाते.
एकेकाळी इंदिरा गांधींच्या सत्ता राबवण्याच्या पद्धतीला आणि घराणेशाहीला मुंड्यांनी विरोध केला; पण युतीची सत्ता आली तेव्हा थोरले बंधू पंडितअण्णा हे मुख्य कारभारी झाले. गृह खात्यात बदल्या आणि बढत्यांचा व्यापार तेज झाल्याचे आरोप झाले. (शिवाय, पंडितअण्णांची बंदूक तेव्हा फार चर्चेत होती.) त्यांचे चिरंजीव धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे युवराज झाले.
आता याच सख्ख्या भावावर आणि पुतण्यावरही त्यांचा भरवसा राहिला नाही. उद्या मुख्यमंत्रिपदाची संधी आली तर धनंजय राजीनामा देईल, याची खात्री नसल्याने पंकजाला आमदार केले, असे परवा गोपीनाथराव म्हणाले. म्हणजे एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रात भाजपवाल्यांचे जे लाडके नेते होते, त्यांना आपल्यासाठी बाहेरचा आमदार तर सोडाच, सख्खा पुतण्याही त्याग करील की नाही, याची खात्री देता येत नाही अशी अवस्था झाली.
राज्याचा किंवा देशाचा विचार करणा-या लोकनेत्यांचा आलेख दहा-वीस वर्षांत असा खाली यावा आणि त्यांच्या विचारांचा परीघ सख्ख्या मुलाबाळांपुरता मर्यादित व्हावा, ही महाराष्ट्राला चांगलीच परिचित सर्वपक्षीय शोकांतिका आहे. अशा शोकांत नायकांमध्ये आता मुंड्यांची भर पडली आहे...
satherajendra@gmail.com