आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळा गं रंग तुझा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परवा माझी मैत्रीण सोनाली आली होती. एरवी आनंदात दिसणारी सोनाली आज खूप खिन्न व शांत दिसत होती. तिचा पडलेला चेहरा पाहून मी विचारले, ‘काय गं, काय झालंय?’ माझा प्रश्न ऐकताच तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू गळू लागले. ते पाहून मी थोडी घाबरले. मग तिला शांत केलं. प्यायला पाणी दिलं व विश्वासात घेऊन तिला पुन्हा एकदा विचारलं, काय झालंय? का रडतीयस? इतका वेळ नुसतं शांत बसून रडणारी सोनाली, हळूहळू बोलायला लागली. ती म्हणाली, अगं, चार दिवसांपूर्वी पाहुणे बघायला आले होते. मुलगाही चांगला होता. म्हणजे त्याचं शिक्षण, कौटुंबिक वातावरण हे सारं आम्हाला पसंत पडण्यासारखं होतं.


पाहण्याचा कार्यक्रम झाला. नेहमीसारखे कांदेपोहे पण झाले आणि ‘आम्ही दोनच दिवसांत आमचा निर्णय कळवतो,’ असे सांगून ते पाहुणे निघून गेले. पण बघता-बघता चार दिवस निघून गेले. त्या पाहुण्यांचा फोनच आला नाही. शेवटी वाट बघून बाबांनीच त्यांना फोन लावला. औपचारिकपणाचा आव आणून ते बाबांना म्हणाले, ‘सगळं चांगलं आहे हो, मुलगी पण चांगली एज्युकेटेड आहे. पत्रिका पण जमली आहे. छत्तीसपैकी सव्वीस गुण जमतात. पण...’ पण हा शब्द उच्चारताच बाबांना कसली तरी ओळखीचीच जाणीव झाली व बाबांनी दबकतच त्यांना विचारलं, ‘पण काय? काय झालं?’
‘मुलगा म्हणतोय की मुलगी सावळी आहे. अन् म्हणून तो होकार द्यायला नको म्हणतोय,’ असे बोलून त्या पाहुण्यांनी खाडकन फोन ठेवून दिला. ज्या गोष्टीची नेमकी भीती होती तेच झालं म्हणून घरात स्मशानशांतता पसरली.
हे सांगत असताना सोनालीचे डोळे भरून आले होते. ऐकल्यावर मला धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरते न सावरते तोच सोनालीने मला आणखीन एक धक्कादायक बातमी सांगितली. ‘आजवर मला वीस ते पंचवीस स्थळे येऊन गेली. पण त्यातील जवळजवळ सतरा ते अठरा स्थळांनी मला केवळ माझ्या ‘सावळ्या’ रंगाकडे पाहूनच नकार दिला आहे.’
सोनालीची ही कहाणी ऐकून मी खूप शांत झाले. समाजाची ही विकृत विचारसरणी पाहून मन खट्टू झाले. थोड्याच वेळात सोनाली निघून गेली, पण मी विचारांत बुडाले.


वास्तविक सोनालीसारख्या गोड, नाकीडोळी सुंदर, शिकलेली, संस्कारक्षम व सगळ्याच कामात हुशार असणा-या मुलीला पण केवळ तिच्या सावळ्या रंगामुळे इतके कटू अनुभव का यावेत?
सोनालीसारख्या अनेक मुली आपल्या समाजात आहेत, ज्यांना त्यांच्या सावळेपणाबद्दल हिणवलं जातं. त्यांना किती अपमान सहन करावा लागत असेल? असे कितीतरी लोक असतात, जे या सावळ्या लोकांना टोमणे मारतात व नंतर त्या टोमण्यांना चेष्टेचे स्वरूप देऊन मोकळे होतात. पण ज्यांना याचे वारंवार अनुभव आले असतील, त्यांना किती वाईट वाटत असेल याचा विचार किती करत असतील? शेवटी अशा मुलींच्या मनात न्यूनगंड तयार होतो व आपण इतरांपेक्षा कुणीतरी वेगळे आहोत की काय ही भावना त्यांच्या मनात जन्म घेते अन् असे ‘कांदेपोहे’च त्या मुलींना नकोसे होतात. त्यांच्या मनात या गोष्टीची इतकी भीती बसते की काही मुली चक्क ‘लग्नच नको’ हा टोकाचा निर्णय घेतात.


ब-याच वेळा जेव्हा लग्नासाठी मुलगी शोधण्याचे प्रसंग येतात तेव्हा मुलगा किंवा मुलाची आई अगदी सहजपणे म्हणून जाते की, ‘मुलगी जास्त शिकलेली नसेल तर चालेल, पण ती दिसायला सुंदर व गोरीपान हवी.’ गोरेपणाचा इतका अट्टहास कशासाठी? सौंदर्य या शब्दाची व्याख्या आपण किती संकुचित बनवून टाकली आहे ना? गोरी मुलगी म्हणजेच सुंदर मुलगी हा गैरसमज कितीतरी जणांच्या मनात घर करून आहे. खरं तर संसार करताना पती-पत्नींमधला एकमेकांवरचा विश्वास, ते एकमेकांना किती समजून घेतात, परिस्थितीनुरूप कशी तडजोड करतात या गोष्टीच जास्त महत्त्वाच्या असतात. पण आजकाल विवाह संस्थेतसुद्धा आपणास वेगळेच चित्र पाहावयास मिळते आहे. एखादी मुलगी संस्कारी पण सावळी असेल तर तिला नाकारणे हा कुठला सुज्ञपणा आहे? रंगापुढे संस्काराची किंमत इतकी शून्य करून टाकली आहे आपण!
पण कित्येक जणांना या घटना खूप क्षुल्लक वाटतात. ‘अगं, लग्न म्हटलं की या सगळ्या गोष्टी त्यात आल्याच,’ असं म्हणून माशी उडवावी तशी ही गोष्ट सहजपणे उडवून लावतात. पण प्रत्यक्षात या गोष्टींना सामोरे गेलेल्या मुलींनाच याचे दु:ख कळू शकते. आज सर्वच क्षेत्रांत मुली पुढे आहेत. मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तरीही या मुलींना अशी वागणूक का दिली जाते? या केवळ मुली असतात म्हणून त्यांना गृहीत धरलं जातं का?
बाह्यसौंदर्याला भुलून नकार देणा-या या पठ्ठ्यांना हे केव्हा समजणार की, आंतरिक सौंदर्य महत्त्वाचे असते. बाह्यसौंदर्य कालानुरूप नष्ट होत जाते. पण आंतरिक सौंदर्य चिरकाल टिकणारे असते. गो-या रंगाचा तोरा मिरवत सावळ्या रंगाच्या व्यक्तीचा अपमान करणा-यांना फक्त इतकचं सांगावसं वाटत की, ‘अपने सुंदर शरीर पर ज्यादा मत अकडिए, क्योंकि शरीर की हैसियत एक मुठ्ठी राख से ज्यादा नहीं है।’