आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निळे आकाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराजवळच्या दोन इमारतींमधील अंगण सायकल चालविण्यासाठी कोजागिरीला छोटे वाटायला लागले होते. इमारतीसमोरील रस्ता ओलांडला की त्यापलीकडे एक मोठे मैदान होते. शाळा सुटल्यावर घरी आल्यावर कधी एकदा सायकलवर बसते असे तिला व्हायचे. अहाऽहाऽ! काय मजा यायची! मोकळे मैदान, नुकताच पाऊस पडून गेल्याने तयार झालेले मातीचे लाल रस्ते, त्याच्या बाजूने हिरवे हिरवे गवत, त्यावर कोजागिरी आणि तिच्या दोन मैत्रिणी नसीम आणि पूर्वी यांच्या सायकली. बाकी कोणी नाही. सायकलच्या किणकिणणा-या घंटा आणि या तिघींची आनंदी खळखळ. सायकलच्या वेगामुळे कानात शिरणारे वारे. मधेच त्यांच्या गालाला गुदगुल्या करत गवतावरून उडणारी फुलपाखरे. तिच्या स्वप्नातील कितीतरी रंगछटा मोकळ्या निळ्या आकाशात उमटलेल्या कोजागिरीला दिसायच्या. ते बदलते रंग पाहात मैदानात सायकल चालविताना आपण जणू त्या रंगांना स्पर्श करू शकणार आहोत असे तिला वाटायचे. चक्कर खूप मोठी व्हावी म्हणून मैदानाशेजारील त्यांच्या इमारतीजवळूनही जायच्या.


‘किती वेळा सांगितले त्या मैदानात जायचे नाही म्हणून. चला इकडे या’, नसीमचा दादा जोरात सांगत होता. कोजागिरीचा साफ विरस झाला. कारण दादाने सांगितले म्हणजे नसीम येणार नाही हे तिला माहीत होते. तरी त्या तशाच पुढे गेल्या. ‘कितनी बार मम्मी ने कहा है, बिल्डिंग के सामने खेलना. याद नहीं? चलो, घुमावो. आगे मैदान में नहीं जाना.’ पूर्वीचा काका सांगत होता. काय करावे? नसीमचा दादा आणि पूर्वीचे आई, काका असे का करतात? मैदानात काय धोका आहे? तेथे वाहने नाहीत. त्यामुळे मजेत सायकल चालविता येते. ‘आपण इथेच चक्कर मारूया’, त्या दोघी म्हणाल्या आणि वळल्या. माघारी आल्या. कोजागिरी हिरमुसली होती. ‘पूर्वी आणि नसीम, तुम्ही तुमच्या आई-बाबाला नीट समजावून का सांगत नाही? मैदानात किती मजा येते. सुटीच्या दिवशी सकाळी लवकर या म्हटले तर अंधार असतो म्हणून तुम्ही येत नाही. काय हे?’ कोजागिरीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. ‘मोठ्या माणसांनी सांगितले की ऐकायचे असते. आई-बाबाला आम्ही सांगू शकत नाही. जाऊ दे गं. आपण आपलं इथेच खेळूया.’ कोजागिरी हुप्प होऊन घरी परत आली. स्वारीचा मूड गेलेला आहे हे शांताच्या लगेच लक्षात आले. ‘मला मोठी माणसे आवडत नाहीत. आमची मजा घालवतात,’ कोजागिरी रागावून बोलत होती. म्हणजे भांडण बरोबरींच्या मधले नव्हते. ‘मोठे कोण आणि ते काय करतात,’ असे म्हटल्यावर सांगू लागली. शांताच्या लक्षात आले. मैदान निर्मनुष्य असायचे. मैदानाच्या दुस-या टोकाला बांधकाम सुरू होते. बांधकाम मजूर तेथेच पत्रे टाकून राहिले होते. त्यांचे कुटुंबीय, बाया, पोरं-बाळं. एवढीच काय ती वर्दळ होती. वाढत्या वयाच्या अल्लड मुली आहेत म्हणून नको म्हणत असतील.
‘आई, उद्या चकरा मारायला मी एकटी जाणार आहे. नसीम आणि पूर्वीला नको म्हणतात. नाहीतर तुम्ही या माझ्याबरोबर. बाबाला मजा येईल.’ कोजागिरी आपले समाधान करून घेत होती. दुसरे दिवशी शांता, बाबा आणि कोजागिरी मैदानात गेले. कोजागिरी सायकलवर स्वार होऊन जोरात चकरा मारत होती. बाबा थोडे तिच्या मागे जात पाय मोकळे करून घेत होता. शांता बांधकाम मजुरांच्या घराजवळ गेली. बायांशी बोलली. ओळख करून घेत होती. कर्नाटकातून आलेली कुटुंबं होती ती. बायाही बांधकामावर काम करत होत्या. त्यांची कच्चीबच्ची आसपास खेळत होती. जराशी मोठी धाकट्यांना खेळवत होती. ‘मोबाइल क्रेश’ या बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी असलेल्या संघटनेत काम करणारी तिची मैत्रीण शांताला आठवली. आई काय करतेय हे पाहायला कोजागिरी आली. ‘हा शिवा, बसू. ती रेणुका’, शांता त्या मुलांची कोजागिरीला ओळख करून देत होती. कोजागिरीला मजा वाटत होती. ही मुलं सायकल चालविताना आधी त्यांना दिसली होती. पण त्यांची ओळख कोठे होती? शिवा, बसू आणि रेणुका कोजागिरीच्या सायकलीकडे उत्सुकतेने पाहात होती. शांता म्हणाली, ‘कोजागिरी, यांना चक्कर मारायला देऊया का?’ कोजागिरी आपल्या नवीन मित्रमैत्रिणींकडे पाहत होती. लगेच ‘हो’ म्हणाली. त्यांच्या चेह-यावर आश्चर्य आणि भीती दोन्ही होते.
बसूने सुरुवात केली, त्यहनं चक्कर मारून कोजागिरीकडे सायकल दिली. शिवा म्हणाला, ‘आता कोजागिरीची पाळी आहे. मग मी घेईन’. असे करत सर्वजण चकरा मारू लागले. दोन तीन दिवस सलग शांता जात राहिली. ‘आई, आता तू येऊ नकोस. माझी त्या सर्वांशी छान मैत्री झाली आहे.’ कोजागिरी म्हणाली. काही दिवसांनी नसीम आणि पूर्वी येऊ लागल्या. कोजागिरीची सायकल रंग बदलणा-या निळ्या आकाशाखाली मजेत फिरत राहिली. मोकळे मैदान, लाल मातीचे रस्ते, हिरवे गवत हे सारे शिवा, बसू, रेणुका, पूर्वी, नसीम आणि निळ्या आकाशासह कोजागिरीचे होते.