आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलाशी ते डेक ऑफिसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकशिपिंग उद्योगात कार्यरत असलेल्या विविध पातळ्यांवरील कर्मचा-यांना त्यांच्या कामाचे कौशल्य वाढवता यावे यासाठी नवी मुंबईत पेंटॉगन मेरिटाइम ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात आली असून गेल्या आठ वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे. दरवर्षी येथे सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना शिपिंग उद्योगातील त्यांचे कौशल्य वाढवण्याचे अभ्यासक्रम शिकवले जातात. या संस्थेत आता केवळ देशातूनच नव्हे तर जगातून विद्यार्थी येतात, अशी माहिती या संस्थेचे संस्थापक संचालक कॅप्टन नलिन पांडे यांनी माहिती दिली.

सध्या जागतिक पातळीवर मंदीची स्थिती असल्याने शिपिंग उद्योगासही कठीण काळास सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत येथील अभ्यासक्रमांची फीदेखील सरासरी 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता कमी दरात आपले कौशल्य वाढवण्याची संधी या उद्योगातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्याची माहिती पांडे यांनी दिली. जगातील इतर संस्थांचा विचार करता भारतातील फी ही सुरुवातीपासूनच सुमारे 40 टक्के कमी असते. सिंगापूरमधील फीपेक्षा भारतातील फी 30 टक्क्यांनी कमी आहे. त्यात आता मंदीमुळे भारतातील फीदेखील कमी झाली आहे. पेंटॉगनमध्ये एक दिवसापासून ते आठ दिवसांचे विविध अभ्यासक्रम आहेत. देशात अशा प्रकारच्या शिक्षण देणा-या मोजक्या संस्था आहेत. नवी मुंबईतील या संस्थेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असताना प्रत्यक्ष समुद्रात असल्याचा अनुभव यावा यासाठी येथे अतिशय सुसज्ज असा स्टीम्युलेटर उभारण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना समुद्रातील प्रत्येक हवामानानुसार जहाज चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. जहाजात अनेक प्रकारची कामे असतात. या कामांचे स्वरूप, त्यांची माहिती, प्रशिक्षण असाही अभ्यासक्रम शिकवला जातो. स्टीम्युलेटरमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जहाजात असल्याचा अनुभव घेता येतो. अशा प्रकारचे स्टीम्युलेटर फार कमी संस्थांमध्ये आहेत, असे पांडे यांनी सांगितले. शिपिंग उद्योगातील खलाशापासून ते अधिका-यापर्यंत प्रत्येकाला येथे प्रशिक्षण घेण्याची व्यवस्था आहे. भारतीय वंशाचे सुमारे 70 हजार मरीन अधिकारी जगभरातील विविध जहाज कंपन्यांत कार्यरत आहेत. यातील सुमारे दहा टक्के लोक दरवर्षी आपल्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकत असतात. यात काही वेळा ते काम करीत असलेल्या कंपन्याच त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देतात. भारतात या प्रशिक्षणाची सुमारे 200 कोटी रुपयांची बाजारपेठ आहे. या अभ्यासक्रमांना डायरेक्टरेट जनरल ऑ फ शिपिंगने मान्यता दिली आहे.

कॅप्टन पांडे हे गेली तीस वर्षे बोटीवर विविध पदांवर कार्यरत होते. मात्र आठ वर्षांपूर्वी त्यांनी बोटीवरून निवृत्ती स्वीकारल्यावर ही संस्था स्थापन केली. सुरुवातीला यासाठी त्यांना एका इटालियन जहाज कंपनीने सहकार्य केले होते. मात्र त्यांना यात विशेष रस नसल्याने त्यांनी या संस्थेतून माघार घेतली. आता पेटॉगनचे प्रशिक्षण केंद्र नवी मुंबईत असून दिल्ली व मुंबईत कार्यालये आहेत.

prasadkerkar73@gmail.com