आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिशर दि ग्रेट!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केल्यानंतर माणसाला दोन शोध लागतात, एक अर्थात बुद्धिबळातील सौंदर्याचा आणि दुसरा बॉबी फिशरच्या खेळातील सौंदर्याचा! 1972 मध्ये फिशरने पहिल्यांदा बुद्धिबळाचे जगज्जेतेपद मिळवले. बोरिस स्पास्कीला हरवून! त्याच्याआधी बोरिस स्पास्की जगज्जेता बनला, तेव्हा त्याला मिळालेली रक्कम होती 1400 डॉलर्स. उलट फिशरविरुद्ध स्पास्की स्पर्धेत फिशरने जिंकलेली रक्कम होती 2.50 लाख डॉलर्स!

या स्पर्धेनंतर अमेरिकेत व जगभर बुद्धिबळाला अफाट प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. स्पर्धेचा पहिला डाव 40 खेळांनंतर समाप्त झाला, तेव्हा पटावरील स्थिती दाखवणारे छायाचित्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने पहिल्या पानावर प्रसिद्ध केले, तर सामन्याचा दैनंदिन वृत्तांत अमेरिकन टीव्हीवर फुटबॉल किंवा बेसबॉलच्या मॅचप्रमाणे ज्याला लाइव्ह म्हणता येईल, असा सादर केला गेला... बॉबी फिशरमध्ये अशी काय जादू होती, की त्याने बुद्धिबळासारख्या मूठभरांच्या खेळाला लोकप्रिय बनवून टाकले?

फिशर बुद्धिबळ स्पर्धेत पदार्पण करेपर्यंत रशियन बुद्धिबळपटूंची यात सद्दी होती. तब्बल चार दशके केवळ रशियन बुद्धिबळपटूच जगज्जेतेपदावर हक्क सांगत होते. त्यांची सद्दी मोडून काढणे सोपे नव्हते. पूर्ण रशियात बुद्धिबळ हा सर्वांचा आवडता खेळ होता. अनेक शाळांमधून, संस्थांमधून बुद्धिबळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात होते. या खेळात इतर खेळांसारखे प्रशिक्षण महत्त्वाचे होते आणि ते देणारे उत्तम प्रशिक्षक रशियात उपलब्ध होते. 40 खेळ्यांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर डाव स्थगित होत असे. साहजिकच उरलेल्या डावाचे विश्लेषण करण्यास रशियन खेळाडू मदत करत. परिणामी दुसर्‍या दिवशी खेळ खेळणे सोपे जात असे...

बॉबी फिशरचा जन्म 9 मार्च 1943 ला झाला. तो अमेरिकेत जन्मला, पण त्याची 70 वी जन्मशताब्दी साजरी झाली आइसलँडमध्ये; तीही अतिशय धूमधडाक्यात! कारण चमत्कारी व लहरी वागणार्‍या बॉबी फिशरने जगभरच्या रसिकांची मने जिंकली होती. बुद्धिबळ खरे तर तर्कशुद्ध खेळ. अगदी गणितासारखा. फिशर अनेकदा अशा खेळ्या करत असे, ज्याचे तार्किक कारणच देता येत नसे. याबाबतीत त्याचे साम्य रामानुजनशी होते. रामानुजन अनेकदा मधल्या पायर्‍या ओलांडून गणिती सिद्धांत मांडायचे. जी. एच. हार्डीसारखे जगविख्यात गणितज्ञही त्यामुळे चक्रावून जात असत. तसेच फिशरच्या बाबतीत घडायचे. उदाहरणार्थ, वयाच्या तेराव्या वर्षी फिशरने डोनाल्ड बायनशी खेळलेल्या खेळाला ‘गेम ऑफ द सेंच्युरी’ म्हटले जाते, कारण त्यामागची तार्किक संगती भल्याभल्यांना लागत नाही. त्या डावात त्याने 18व्या खेळीत आपला वजीर बळी दिला आणि पुढे 41 खेळ्यांचा हा डाव जिंकला! खरे तर मात दृष्टिक्षेपात असताना किंवा हत्ती, घोडे, उंट यासारख्या दोन-तीन सोंगट्या मिळत असतील, तरच वजीर दिला जातो. इथे असे काहीही घडत नव्हते. केवळ अंत:प्रेरणेने त्याने ही खेळी केली होती. नंतर हा डाव संपला तो तब्बल 22 खेळ्यांनंतर!

इतका पुढचा विचार खरे तर संगणकालाही जमत नाही. त्या काळात बुद्धिबळ संगणक अस्तित्वातच नव्हते. हा डाव ‘चेस रिव्ह्यू’ या मासिकात छापण्यात आला. त्यानेच मुखपृष्ठावर ‘गेम ऑफ द सेंच्युरी’ असे या डावाला म्हटले आहे. मुखपृष्ठावर एकाग्रचित्त छोट्या बॉबीचे छायाचित्र होते. बॉबीचे व्यक्तिमत्त्व चमत्कारिक होते. ‘मॅडनेस’ त्याच्या नसानसांत भिनलेला होता. आई धर्माने ज्यू होती. वडील त्याच्या लहानपणीच परागंदा झाले होते. उद्ध्वस्त भावविश्वात वावरणारा बॉबी दिवसरात्र बुद्धिबळ खेळत असे.

रात्रीही अगदीच नाइलाजाने तीन बिछान्यांवर तो आलटून-पालटून झोपण्याचा प्रयत्न करत असे. लहान वयातच पैशांसाठी क्लब्जमध्ये एकट्याने अनेक खेळाडूंविरुद्ध प्रदर्शनीय सामने खेळत असे. जगज्जेतेपदासाठी आव्हानवीर ठरवण्यासाठी जी स्पर्धा झाली, त्यात त्याने 22 डावांत साडेसतरा गुण मिळवले. अनेक रशियन बुद्धिबळपटूंना त्याने चकित केले. अगदी लहान वयात तो ‘ग्रँडमास्टर’ बनला. पण तो अत्यंत लहरी होता. जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत पहिल्या डावात, तो आलाच नाही. त्या वेळी रशिया व अमेरिकेचे शीतयुद्ध जोरात होते. सारे जग बोरिस स्पास्कीविरुद्धच्या सामन्याला रशिया विरुद्ध अमेरिका तसेच लोकशाही विरुद्ध कम्युनिझमचा रंग देत होते. फिशर पुढे सामने खेळेल की नाही, हे सांगणे अवघड होते; तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांचे बुद्धिबळप्रेमी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी फोन करून सामना खेळणे हा अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, असे फिशरला सांगितले. पारितोषिकाची रक्कम केवळ काही हजारांत होती, ती फिशरने वाढवून मागितली आणि पहिल्यांदाच अशा स्पर्धेला प्रायोजक लाभला. त्या वेळी जिम स्लेटर नावाच्या वादग्रस्त ब्रिटिश उद्योगपतीने एक लाख 25 हजार डॉलर्सपर्यंत ही रक्कम वाढवायला मदत केली. अशा स्पर्धेत, तुम्ही उशिरा आल्यास वेळ वजा करत अडीच तासांत 40 खेळ्या करायच्या असतात.

बॉबी अनेकदा उशिराच यायचा. वाट्टेल ते आरोप करायचा. याच विचित्र स्वभावामुळे त्याला पुढे अमेरिकेतून परागंदा व्हावे लागले. एका मोठ्या हीरोचे पतन जगाला पाहावे लागले. पण आइसलँड येथे त्याचा मरणोत्तर वाढदिवस साजरा होत आहे. बॉबीचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी बोरिस स्पास्की त्याला पाठवलेल्या संदेशात म्हणतो, ‘बॉबी म्हणजे माझा भाऊच होता. बुद्धिबळ लोकप्रिय करणे आणि बुद्धिबळात पैसा आणणे या दोन गोष्टी त्याने केल्याच, पण आपल्या प्रतिभेने मूठभरांच्या बुद्धिबळाला सर्वसामान्य लोकांमध्ये आभाळाएवढी लोकप्रियतासुद्धा मिळवून दिली.’