आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावाला जागणारा ‘बोलबच्चन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जास्त बडबड करणा अति हुश्शार माणसाला आपण बोलबच्चन बोलतो. रोहित शेट्टीचा ‘बोलबच्चन’ही नावाला जागणारा चित्रपट आहे. ‘बोलबच्चन’ पाहण्याऐवजी रोहितचेच जुने चित्रपट वा जुना ‘गोलमाल’ पाहणेच योग्य ठरेल.

हैदराबादी बिर्याणी चांगली असते आणि ती बनवण्यात एखादा शेफ तरबेज असतो. आपण आशेने त्याच्याकडे बिर्याणी खायला जातो. प्लेटमध्ये अत्यंत सजवून बिर्याणी दिली जाते. आपण खायला सुरुवात करतो आणि लगेचच आपणाला ती बिर्याणी नकोशी वाटते. असे का झाले असे आपण शेफला विचारता तो सांगतो की, नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मी ही बनवली आहे. त्यात काही मसाले ज्यादा टाकलेले आहेत. त्यामुळे मूळची बिर्याणी वेगळे रूप घेऊन आली खरी; परंतु स्वाद हरवून बसली. अगदी असेच ‘बोलबच्चन’चे झाले आहे.
हृषिकेश मुखर्जी यांच्या यशस्वी ‘गोलमाल’ चित्रपटाची अधिकृत रिमेक म्हणून अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी ‘बोलबच्चन’ला सुरुवात केली; परंतु रिमेक करताना रोहितने आपल्या जुन्याच चित्रपटातील क्लृप्त्या वापरून ओरिजनलची मजा घालवून टाकली आहे. या चित्रपटात निखळ विनोदही नाहीत आणि स्क्रिप्टचीही वानवा दिसून आली. रिमेकसाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितकडून चांगल्या चित्रपटाची अपेक्षा होती. या चित्रपटाची त्याने तोंड फाटेस्तोवर नेहमीप्रमाणे स्तुतीही केली होती. परंतु या वेळी तो अयशस्वी ठरला. ‘गोलमाल 3’ मध्ये अजय देवगणने साकारलेली भूमिकाच येथे रूप बदलून येते. त्यात बोट दाखवल्यास त्याला राग येतो तर या चित्रपटात खोटे बोलल्यावर त्याला राग येतो आणि तो समोरच्याला मारतो. रणकपूरमधील आखाड्यातील पैलवानाची, पृथ्वीराज रघुवंशीची भूमिका अजय देवगणने साकारली आहे, तर अभिषेक बच्चन अमोल पालेकरच्या धर्तीवर अब्बास अली आणि अभिषेक बच्चन अशा दोन वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतो. अजय आणि अभिषेक दोघांचाही अभिनय उल्लेखनीय नाही. कॉमेडी सर्कसची जोडी अर्चना पूरण सिंह आणि कृष्णा थोडी फार गंमत आणतात. चित्रपटात असीन आणि प्राची देसाई अशा दोन नायिका आहेत. त्यांच्याबाबत एवढेच सांगितले तरी पुरेसे आहे. लेखकद्वयी युनूस सजावल आणि फरहाद यांना मूळ कथा नव्या ढंगात ना फुलवता आली आणि ना त्यांना त्यात गंमत निर्माण करता आली. रोहितनेही आपल्याच जुन्या चित्रपटातील दृश्ये नजरेसमोर ठेवून आणि अ‍ॅक्शनचा तडका देऊन चित्रपट सादर केला आहे. हिमेश रेशमिया आणि अजय-अतुल या दोन संगीतकारांनी संगीत दिलेले असूनही गाणी विशेष लक्षात राहत नाहीत. एकूणच रोहित शेट्टीच्या बोलबच्चनच्या वाटेला जाण्याऐवजी जुना गोलमाल पुन्हा एकदा पाहिला तर जास्त मनोरंजन होईल, एवढेच सांगावेसे वाटते. 90 दिवसांत ‘बोलबच्चन’ चित्रपट छोट्या पडद्यावर येईलच, तेव्हा पाहिला तरी चालेल.
निर्माता - अजय देवगण
दिग्दर्शक - रोहित शेट्टी
कलाकार - अजय देवगण, अभिषेक बच्चन, असीन, प्राची देसाई, असरानी, कृष्णा, अर्चना पूरण सिंह