आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजा: दहशतवादाला आव्हान सावित्रीचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजा ही केरळच्या एका गावातली निरागस मुलगी. अचानक लग्न होऊन नवर्‍याबरोबर काश्मीरमध्ये पोहोचते आणि तिचा थेट दहशतवादाशी सामना होतो. मल्याळमशिवाय भारतातली इतर कोणतीच भाषा न समजणार्‍या, इंग्रजीही फारसे न बोलता येणार्‍या या मुलीसमोर नवर्‍याची दहशतवादी पंजातून सुटका करताना भाषेचा अडसर नव्हे, हिमालयच उभा राहतो. ऋषिकुमार (अरविंद) हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि क्रिप्टोलॉजिस्ट (सांकेतिक भाषा उलगडणारा तज्ज्ञ- लष्कराला तसेच गुप्तहेर कारवायांमध्ये अशा तज्ज्ञांची गरज भासते.) आहे. लग्न झाल्या-झाल्याच त्याला काश्मीरमध्ये आठएक दिवसांच्या कामासाठी जावे लागते. वसीमखान या दहशतवाद्याला सरकारने पकडलेले असते. त्याच्या सुटकेसाठी फुटीरतावादी काश्मिरी दहशतवादी ऋषीचे अपहरण करून त्याला ओलीस धरतात. काश्मीरमधील परिस्थिती पाहता आणि ऋषी तिथे कामगिरीवर चाललेला असताना नवपरिणीत पत्नीबरोबर हनीमूनही साजरा करायला कसा काय जातो, त्याचे उत्तर मणिरत्नमने कथेच्या पूर्वार्धाच्या सुरुवातीला रोजाची व्यक्तिरेखा उलगडता उलगडताच दिले आहे.
मुळात, ऋषी आला होता रोजाच्या मोठ्या बहिणीला पाहायला. खट्याळ, खोडकर, गावा-शेतात, नदीकाठी वारा प्यायल्यासारख्या बागडणार्‍या रोजाने खरं तर ऋषीने आपल्या दीदीला होकार द्यावा म्हणून, देवाला नवसही केलेला असतो. पण दीदीच या पाहायला आलेल्या मुलाला साकडे घालते, मला नकार दे म्हणून! तिने आधीच आपल्या लहानपणापासूनच्या मित्राला पती मानले आहे.

काहीसा दुखावलेला, पण तिची बाजूही समजून घेणारा ऋषी नकार कोणत्या शब्दात कळवायचा, याचा विचार करता करता समोर खांबाआडून मनोमन दीदीला होकार मिळावा म्हणून प्रार्थना करणार्‍या रोजाकडेच बोट दाखवून म्हणतो, ‘मला हिच्याशी लग्न करायचंय.’ दीदीचा अपमान करून या मुलानं आपल्याशी लग्न केलं, याचा रोजाला संताप येतो. त्यातच गावात, कुटुंबात मोठ्या मुलीला पाहायला आलेल्या मुलाच्या दृष्टीला पडण्याची अक्षम्य चूक केल्याचे पापही बिचारीच्या पदरात टाकले जाते, तेही मनाला लागते. पदरी पडले आणि पवित्र झाले असे मानण्याची, हार मानण्याची या मनस्वी मुलीची वृत्तीच नाही. नेमक्या याच स्वभाव-वैशिष्ट्याचा आविष्कार पुढे दहशतवाद्यांशी लढताना, सरकारी यंत्रणांपुढे आकांत करत दाद मिळवताना होतो.
लग्न ठरताना होकार-नकाराच्या नाट्याचे स्पष्टीकरण ऋषीकडून मिळूनही तिचे समाधान होत नाही. दीदीला फोन करून ती जेव्हा खातरजमा करते, तेव्हा मात्र ऋषीचा मोठेपणा जाणून त्याच्यावर सर्वस्व उधळायला ती तयार होते, त्याची पत्नी होते, प्रेमिका होते. ऋषी कामासाठी काश्मीरला निघालेला असताना ती हट्ट करून त्याच्याबरोबर जाते.

मणिरत्नमच्या चित्रपटांची स्वत:ची एक शैली आहे. निसर्गाच्या वापरात, गाण्याच्या आणि समूहनृत्यांच्या रूपात ती नेहमी ठसते. तिथे तो वास्तवाला धाब्यावर बसवून ठेवतो. ‘रोजा’ याला अपवाद नाही. केरळ आणि काश्मीरची लोकेशन्स, संतोष सिवनचे छायाचित्रण आणि ए. आर. रहमानची नव्यानेच प्रस्थापित झालेली आगळीवेगळी संगीतशैली यांनी आशय झाकोळून जाण्याचा मोठा धोका होता. तो बर्‍याच अंशी टळला आहे, तो नायिकेच्या व्यक्तिरेखेवरचा झोत कायम राखल्यामुळे. कथेच्या बांधणीतही कथा-पटकथा-लेखक-दिग्दर्शक मणिरत्नमने अवास्तव आणि अतार्किक अशी अनेक वळणे या चित्रपटात घेतली आहेत.

ऋषी सोबत असतो, तेव्हा रोजाला इतर कुणाशी संपर्क करण्याची गरज पडत नाही. परंतु ऋषीच्या अपहरणानंतर तिला बाहेरच्या जगाशी संपर्क करावा लागतो, भांडावे लागते, दाद मागावी लागते. परंतु तिथल्या लोकांना समजेल, अशी भाषा तिला येत नसते. तिची भाषा त्यांना कळत नसते. देवळात भेटलेला आणि अनेक भाषा येणारा टुरिस्ट गाइड छज्जू हादेखील पटकथेतली गणिते सोडवण्यासाठी केलेली एक सोय म्हणूनच येतो. आपल्या पतीचे अपहरण झाल्याचे कळल्यानंतर रोजा पोलिसांकडे जाते, लष्कराकडे जाते, संरक्षण मंत्र्याला भेटते. कर्नल तिला सरकारपुढची, देशापुढची समस्या समजावून सांगतो. परंतु रोजा म्हणते, ‘मुझे देश की परवाह नहीं। मुझे मेरा पति चाहिए।’ तेव्हा ती अशा कठीण परिस्थितीत सापडलेल्या कोणत्याही सामान्य स्त्रीचेच प्रतिनिधित्व करते. देश ही संकल्पनादेखील अशा व्यक्तीपुढे अमूर्त राहते. त्यातून जिथे भाषा आणि संस्कृतीचेच अंतर असेल तिथे तर ती संकल्पना जगणे आणखी कठीण होऊन बसते.

कर्नल तिची कानउघडणी करण्याचा प्रयत्न करतो, की ‘इथे पाच हजार जवान आपापल्या कुटुंबापासून दूर, थंडी-वार्‍यात, प्राण तळहाती घेऊन झुंजत आहेत. तुझ्यासारखा विचार त्यांनी केला, तर या देशाचे काय होईल?’ तसे रोजाला निरुत्तर करणारे हे विधान. परंतु 1989मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या रुख्साना (मेहबूबा मुफ्ती यांची बहीण) या मुलीचे अपहरण झाल्यानंतर तिला सोडवण्यासाठी सरकारी पातळीवर जी लगबग झाली होती, त्या सत्यघटनेचा संदर्भ आठवेल, अशा प्रकारे ‘रोजा’च्या माध्यमातून दिग्दर्शक सामान्य माणसाच्या वतीने सरकारला सुनावतो. रोजा म्हणते, ‘इस मुसीबत में मेरे पति के बदले कोई मंत्री का बेटा होता, बेटी होती, तो आप यही कहते?’

संपूर्ण चित्रपटातल्या संघर्षात एकीकडे अपहृत नायक दहशतवाद्यांच्या दबावाला भीक न घालता देशप्रेमाचा आदर्श (बराचसा फिल्मी म्हणूनच परिचयाचा) घालून देतो, दहशतवाद्यांच्या म्होरक्याचे हृदयपरिवर्तन करू पाहतो, तर नायिका रोजा ‘मी एक सामान्य व्यक्ती आहे, पण या देशाची नागरिक आहे, तेव्हा माझ्या गाºहाण्याची किंमतदेखील सरकारने मोजलीच पाहिजे’, या हट्टावर ठाम आहे. त्यामुळे तिचा तो हट्ट प्रेक्षकासाठी नवा आणि त्याच्या प्रामाणिक भावनेशी अधिक जवळचा ठरतो.

‘तुम्ही जोपर्यंत माझ्या नवर्‍याला सोडवून आणत नाही, तोपर्यंत मी काश्मीर सोडून जाणार नाही’, हा निर्धार ती व्यक्त करते. तिच्या निर्धारापुढे सरकार नमते, हालचाली सुरू होतात, बर्‍याच अंशी त्याची परिणती ऋषीच्या सुटकेत होते. (परंतु दहशतवाद्यांच्या अंतरात्म्याला हात घालण्याची ऋषीची फिल्मी हीरोगिरीदेखील त्या कामी वापरावी लागली आहेच.)

एकूणच, रोजा निराश व्हायलाच नकार देते. माझा पती जिवंतच आहे आणि त्याला मी इथून जिवंत घेऊन जाणार, हा तिचा विलक्षण सकारात्मक आत्मविश्वास म्हणजे पुराणात सत्यवानाचे यमाने हरण केलेले प्राण सावित्रीने परत आणले, त्या कविकल्पनेचा आधुनिक आविष्कार आहे. सावित्री ही भारतीय चित्रपटसृष्टीची फार लाडकी कल्पना आहे. पौराणिक, काल्पनिक कथा सादर करणार्‍या चित्रपटांत, साचेबद्ध कथानकांच्या सामाजिक चित्रपटांतही या कल्पनेच्या गुळगुळीत आवृत्त्या सादर होत राहिल्या आहेत. रोजा ही त्यातली सर्वात नवी. तिला समकालीन राजकीय-सामाजिक संदर्भांचे प्रत्ययकारी कोंदण लाभल्यामुळे सगळ्या फिल्मी शोमनशिपमधूनही ती उठून दिसते.
(deshrekha@yahoo.com)