आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचा नवा तारणहार ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट पुरस्कारांचा मोसम सध्या जोरात आहे. या निमित्ताने सबंध बॉलीवूड छोट्या पडद्यावर अवतरताना दिसत आहे. एरवी जाहिराती, रिअ‍ॅलिटी शो, चित्रपटांचे प्रमोशन - प्रीमियर आदींचे निमित्त करून चित्रपटसृष्टी छोट्या पडद्यावर दर्शन देत असते, मोठी कमाईसुद्धा करत असते. थोडक्यात, एकेकाळी ज्याला नाके मुरडली तोच छोटा पडदा आज बॉलिवूडचा नवा तारणहार बनू पाहतोय का?

घटना पहिली
छोट्या पडद्याची वाढती ताकद आणि त्यातून मिळणारा अमाप पैसा ध्यानात घेऊन कमल हसनने आगामी ‘विश्वरूपम’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर चित्रपटगृहांत नव्हे, तर छोट्या पडद्यावर करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली. त्याच्या योजनेनुसार हिंदी भाषक प्रेक्षकांना 500, तर दक्षिण भारतीय प्रेक्षकांना 1000 रुपये मोजून घरबसल्या ‘डीटीएच’वर हा चित्रपट पाहता येणार होता. ही योजना सफल झाली असती तर कमल हसनला एका दिवसात तब्बल 25 ते 30 कोटी रुपयांची कमाई होणार होती, परंतु वितरकांनी हा बेत हाणून पाडला...

घटना दुसरी
स्टार नेटवर्कने सलमान खानबरोबर दहा वर्षांचा करार करून त्याच्या सर्व चित्रपटांचे उपग्रह प्रक्षेपण (सॅटेलाइट राइट्स) अधिकार 400 कोटी रुपयांना घेतले. एखाद्या कलाकाराला त्याच्या चित्रपटांसाठी एखाद्या वाहिनीने मोजलेली आजवरची ही सगळ्यात मोठी रक्कम आहे. अर्थातच ‘स्टार’मधून या व्यवहाराचा नक्की आकडा उघड करण्यात आलेला नाही...
या दोन घटनांचा उल्लेख छोटा पडदा मोठ्या पडद्याला कसा आकृष्ट करून घेत आहे, त्याची प्रचिती देण्यासाठी केला आहे. खरे तर मोठा मासा छोट्या माशाला गिळतो, परंतु मनोरंजनाच्या क्षेत्रात उलटे चित्र दिसू लागले आहे. छोटा पडदा मोठ्या पडद्याला फक्त आपल्या कवेतच घेऊ लागला असे नव्हे, तर पोहण्यास म्हणजेच अस्तित्व टिकवून ठेवण्यासही मोलाची मदत करू लागला आहे...

मात्र, अगदी कालपरवापर्यंत बॉलीवूडचे नायक-नायिका छोट्या पडद्यावर येणे कमीपणाचे समजत. आम्ही मोठे आहोत, आमच्यामुळे छोट्या पडद्याचे अस्तित्व टिकून आहे, असा त्यांचा तोरा असे. म्हणूनच 1990च्या दशकात जॅकी श्रॉफने जेव्हा पहिल्यांदा सोनी टीव्हीचे शेअर्स घेतले आणि मालिकांची निर्मिती सुरू केली, तेव्हा सगळ्यांनी त्याला मूर्ख ठरवले. छोट्या पडद्याकडे जॅकी वळला म्हणजेच त्याची बॉलीवूडमधील सद्दी संपल्याने त्याने हा ‘घाटे का सौदा’ केला, असे म्हटले गेले. परंतु आज अमिताभ, शाहरुख, सलमान, आमिरपासून अनिल कपूर, रणबीर कपूरपर्यंतचे तमाम बडे कलाकार छोट्या पडद्यावर चमकण्यासाठी कमालीचे उत्सुक दिसत आहेत.

याबाबत बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाला, ‘मी जेव्हा छोट्या पडद्यावर आलो आणि मालिकांची निर्मिती सुरू केली, तेव्हा सगळ्यांनी मला वेड्यात काढले होते. चुकीच्या जागी पैसे घालवतो, असे म्हटले होते. मात्र, मला तेव्हा वेड्यात काढणारे आज स्वत:च छोट्या पडद्याच्या पैशाच्या मागे धावताना दिसत आहेत.’ जॅकीचे म्हणणे खोटे ठरण्याची सध्या तरी परिस्थिती नाही, इतक्या बॉलीवूडमधील आघाडीच्या बहुसंख्य नट-नट्या आणि निर्मिती संस्था छोट्या पडद्याला आपापले योगदान देण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र दिसत आहे.

एका अर्थाने छोट्या पडद्याने बॉलीवूडला व्यवसायाची नवी गणिते मांडायला प्रवृत्त केले आहे. आज एखाद्या कलाकाराचा चित्रपट जाहीर झाला की, निर्मात्याला याच्या एकूण बजेटच्या 30 ते 35 टक्के रक्कम सॅटेलाइट राइट्सच्या रूपात आगाऊ मिळते. त्याच धर्तीवर सलमान खानचा ‘एक था टायगर’ 75 कोटी रुपयांना विकला गेला होता, तर ऋतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘क्रिश 3’साठी एका वाहिनीने तब्बल 37 कोटी रुपये मोजले आहेत. सलमान खानच्याच ‘दबंग 2’साठी 50 कोटी रुपये एका वाहिनीने मोजले आहेत. आमिरचा ‘तलाश’ आणि करण जोहरचा ‘अग्निपथ’ 40 कोटी रुपयांना वाहिन्यांनी विकत घेतला होता. सध्या ‘सहारा’ चॅनेलचा संचालक असलेला प्रसिद्ध निर्माता बोनी कपूरने करण जोहरला ‘अग्निपथ’, ‘शॉर्ट टर्म शादी’ आणि अयान मुखर्जी द्वारा दिग्दर्शित रणबीर कपूर द्वारा अभिनीत आगामी चित्रपटासाठी 150 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. परंतु झी टीव्हीने केवळ एका ‘अग्निपथ’लाच 40 कोटी रुपये देऊ केल्याने करण जोहरने बोनी कपूरची ऑफर नाकारली. याच सर्व व्यवहारांनी छोट्या पडद्याचे आगामी काळातले महत्त्वही अधोरेखित केले.

तत्पूर्वी याच छोट्या पडद्याने (‘कौन बनेगा करोडपती’) अमिताभला कर्जातून बाहेर काढले. ‘केबीसी’ने अमिताभचे असे काही भाग्य फळफळवले की ‘सोनी’बरोबर अमिताभने केबीच्या तीन सिझनसाठी 100 कोटींचा करार केला आहे. सलमान खान बिग बॉससाठी 3 ते 4 कोटी रुपये प्रति एपिसोड घेऊ लागला आहे. मागील सिझनमध्ये सलमान 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेत होता. आमिर खानने ‘सत्यमेव जयते’साठी प्रति एपिसोड 3 कोटी रुपये मानधन घेतले होते.

शाहरुख खानने ‘टोटल वाइपआऊट’ आणि ‘जोर का झटका’साठी प्रति एपिसोड 2 कोटी रुपये घेतले होते. अक्षयकुमार, ऋतिक रोशन दीड ते दोन कोटी रुपये प्रति एपिसोड मानधन घेतात. याचबरोबर छोट्या पडद्यावरील जाहिरातींसाठीही प्रति दिवस दीड कोटीपासून पाच कोटी रुपयांपर्यंत रक्कम मोठे कलाकार घेत आहेत. थोडक्यात, प्रेक्षकसंख्या आणि प्रभावाच्या बळावर छोटा पडदा बॉलीवूडला खो-याने कमाई करून देत आहे. या संदर्भात बोलताना चित्रपट व्यवसायाचे विश्लेषक कोमल नाहटा यांनी सांगितले की, सध्या सॅटेलाइट राइट्स ही निर्मात्यांसाठी एक मोठीच टेरिटरी बनली आहे. धर्मेंद्रचा ‘यमला पगला दीवाना’ याचे चांगले उदाहरण आहे. चित्रपट निर्माण होत असताना 17 कोटी रुपयांना सॅटेलाइट राइट्स विकण्यात आले. प्रत्यक्षात चित्रपटगृहांत हा चित्रपट चांगलाच चालला. त्याचा फायदा घेत एका वाहिनीने हा चित्रपट दाखवून 17 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळवली.

चित्रपट अभ्यासक आणि ट्रेड मॅगझिनचे संपादक वजीर सिंह यांनी याबाबत बोलताना सांगितले की, छोट्या पडद्याने मोठ्या पडद्याला व्यापले आहे, असे बोलले जाते; परंतु मला ते योग्य वाटत नाही. याचे कारण एवढेच की, मोठा पडदा जिकडे जास्त पैसा मिळतो तिकडेच जातो. छोट्या पडद्यामुळे जास्त पैसे मिळत असल्यानेच मोठ्या चित्रपटांचे प्रीमियर आणि कलाकार छोट्या पडद्याकडे जात आहेत. अ‍ॅडगुरू प्रल्हाद कक्कड म्हणतात की, आमिर आणि शाहरुखने सर्वप्रथम छोट्या पडद्याचे महत्त्व जोखले. आता सगळेच छोट्या पडद्यावर येऊन आपल्या चित्रपटाचा प्रचार करू लागले आहेत. त्याचा फायदा त्यांना व्यवसायिक यश मिळवताना होत आहे. चित्रपट अभ्यासक तरण आदर्शने सांगितले की, छोट्या पडद्यावर चित्रपटाचे प्रमोशन केल्याने देशभर चित्रपट पोहोचतो. चित्रपटाचे सॅटेलाइट राइट्सही चित्रपट मोठ्या बॅनरचा आणि रंजनमूल्य असेल तरच मोठ्या किमतीला विकले जातात. मात्र, छोट्या चित्रपटांना हे यश मिळत नाही. छोट्या बजेटच्या चित्रपटांना दोन ते पाच कोटी रुपयेच सॅटेलाइट राइट्सच्या माध्यमातून मिळतात. काही चित्रपटांना तर हे भाग्यसुद्धा लाभत नाही. कारण, आज अनेक चित्रपट असे आहेत, जे छोट्या पडद्यावरही आलेले नाहीत. निर्माता विपुल शाहने छोट्या पडद्याच्या प्रभावाबाबत आपले म्हणणे मांडताना सांगितले की, छोट्या पडद्यावर प्रमोशन करून चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतो. ‘केबीसी’मध्ये आम्ही आमच्या चित्रपटांचे प्रमोशन केले त्याचा चांगलाच उपयोग झाला. छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आज लोकप्रिय आहेत. अशा मालिकांचा उपयोग आम्ही प्रमोशनसाठी करतो. एकूणच छोट्या पडद्याने मोठ्या पडद्याला आधार देत तात्पुरती का होईना, तारणहाराची भूमिका स्वीकारलेली दिसत आहे. मात्र, हा सुगीचा काळ किती टिकतो, हाच रंजक मुद्दा आहे...
shindeckant@gmail.com