आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धागे अरबांचे, वीण भारताची!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडच्या जगात अरबांच्या प्रश्नावर आपल्याला सर्वप्रथम केव्हा जाग आली, तर ती इराकनं जेव्हा कुवेतवर चाल केली तेव्हा. म्हणजे, तेव्हा विशेष असं काही घडलं होतं असं नाही, पण तेव्हा केबल टीव्हीच्या आगमनाचे ते सर्वात मोठे रणशिंग होते. सीएनएननं हे युद्ध घराघरात पोहोचवलं होतं. तोपर्यंत आमच्या लेखी गन्स ऑफ नॅव्हरॉन किंवा बॅटल ऑफ बल्ज किंवा व्हेअर इगल्स डेअर हे चित्रपट थरारक वाटायचे. जरा ब-यापैकी इंग्रजी कळणा-यांच्या घरात ‘आपल्याकडं असं काही होत नाही बुवा’ या प्रतिक्रियेपुरते ते मर्यादित होते. मात्र ‘धागे अरब जगाचे’ हे पुस्तक अशा एखाद-दुस-या युद्धापुरतंच मर्यादित ठेवलेलं नाही. सर्व अरब प्रदेशाचे वर्णन अतिशय उत्तमरीत्या आपल्या लेखनातून उभं करणारं हे प्रत्ययकारी चित्रण प्रा. विशाखा पाटील यांनी केलं आहे. विशाखा पाटील यांचा या जगाशी संबंध त्या जेव्हा बहारिनमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका बनल्या तेव्हापासून. त्यांनी संपूर्ण अरब जग आपल्यापुढे मोठ्या ताकदीनं उभं केलंय आणि ते पुण्याच्या राजहंस प्रकाशनानं अगदी अलीकडेच प्रसिद्ध केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘आयसिस’ या संघटनेबद्दल राग, द्वेष आणि अर्थातच कुतूहलही आहे. का ही मंडळी संतापली आहेत आणि सर्व जगाच्या विनाशापर्यंत टोकाची भाषा का करत आहेत, हा जरी वेगळा मुद्दा झाला तरी त्या निमित्ताने आपलं लक्ष अरब जगाकडे नव्याने वळलं आहे. अरब जगाविषयी वाचायची बुद्धी होते, ती प्रामुख्याने तेलाचे आंतरराष्ट्रीय भाव वाढले वा कमी झाले की! ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यानंतर आपण या अरब जगाला अधिक गांभीर्याने घ्यायला लागलो आणि त्या हल्ल्यामागे असलेल्या कारणांचाही शोध घेऊ लागलो. या सर्व गोष्टींची अगदी तपशिलात जाऊन चिकित्सा विशाखा पाटील यांनी केली आहे. या पुस्तकातून त्यांनी अरब-इस्रायल संघर्ष, त्याची पार्श्वभूमी यांची माहिती अगदी ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षे मागे जाऊन आपल्याला दिली आहे. त्यासाठी त्यांनी ज्यूंच्या जिद्दीला आणि अरबांच्या वृत्तीला सलाम केला आहे. पण महत्त्वाचे हे की, विषयाची मांडणी करताना त्यांनी कोणतीही एकारलेली भूमिका घेतलेली नाही. इथून तिथून इस्रायली समाज म्हणजे महान आणि अरब जग म्हणजे केवळ छळवादी, असे सांगणारा हा त्यांचा शाब्दिक संतापी प्रवासही नाही. त्या इतिहासात निष्पक्ष पद्धतीने जातात आणि आपल्याला तो पट व्यवस्थितपणे उलगडून दाखवतात. मक्केवर इस्लामचा ध्वज फडकायला लागल्यानंतर प्रेषित महंमद यांची भूमिका आणि मक्का तसेच मदिना यांच्यात झालेला सत्तासंघर्ष याविषयी अतिशय सखोल माहिती आपल्याला त्यातून दिली जाते. इराकचाही संघर्ष त्याच सुमारास कसा सुरू होतो, ते त्यातून आपल्याला कळते.

२२ मार्च १९४५ रोजी कैरोला सर्व अरब देश एकत्र आले आणि त्यांनी एकजुटीनं या पॅलेस्टिनी अरब प्रश्नाला सामोरे जाण्याची शपथ घेतली. त्यातूनच ‘अरब लीग’चा जन्म झाला. अरब म्हणवून घेणारे हे १७ देश (सध्या २२) आफ्रिका आणि आशिया या दोन्ही खंडांना स्पर्शून जाणारे. मैलोन‌्मैल वाळवंट आणि दगडधोंडे तसेच टेकड्यांचा हा प्रदेश नेमका कसा आहे, तेही आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. मुळात या प्रदेशात बदायुनी टोळ्या उत्तर आफ्रिकेपासून कशा येत राहिल्या, त्यांचे प्रत्येकाचे कसे स्वतंत्र व्यवहार होते आणि बर्बर टोळ्याही कशा येत राहिल्या आणि त्यांना अरब हे नाव कसे पडले, तेही आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळते.

एक काळ असा होता की, अमेरिका सौदी अरेबियाच्या तेलसाठ्यांवर कब्जा करायला निघाली होती, पण मग अमेरिका आखातात आली असती तर तेलसाठ्यांना आगी लागल्या असत्या आणि तिचेच काय सगळ्यांचेच हात त्या आगीत पोळून निघाले असते. वॉशिंग्टनमध्ये रिचर्ड निक्सन अध्यक्षपदी असताना हा विचार बोलून दाखवला गेला होता. लेखिकेनं त्याची नोंद व्यवस्थित घेतली आहे. त्या काळचा थेट संवादही विशाखा पाटील यांनी दिला आहे. इराकच्या राजकारणाचाही संदर्भ या प्रकरणात येतो.

अरब-इस्रायल संघर्ष, त्याची पार्श्वभूमी, याच प्रश्नावर झालेले शांतताविषयक चर्चेचे गुऱ्हाळ असे अनेक प्रश्न या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतात. अरब प्रश्नावर मराठीत लिहिला गेलेला एकमेव संदर्भग्रंथ म्हणून या पुस्तकाकडे पाहिले गेले पाहिजे. ज्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचे असते त्यांना आणि ज्यांना अरब जगताविषयी विशेष ममत्व आहे त्यांना वाचण्यासाठी हा एक उत्तम लेखाजोखा आहे. इराण-इराक संघर्ष, इराण-सौदी अरेबिया यांच्यात असलेले प्रश्न आणि त्यामागे असलेली शिया-सुन्नी वादाची किनार हे सगळे आपल्याला याच एका ग्रंथात वाचायला मिळते. लेखिकेनं ‘नंदनवनाच्या नाशाचा पहिला अध्याय’ व्यवस्थित मांडला आहे. आज जे आपल्याला लेबनॉन, सिरीया, लिबिया, इराक, कुवेत, इतकेच काय पण ट्युनिशिया यांसारख्या देशांमध्ये पाहायला मिळते आहे, ते त्यांना आणि जगाला कोठे घेऊन जाणारे आहे, ते या घडीला समजून घेता येईल असे नाही; पण या वादांचे मूळ कुठे आहे, ते आपल्याला शोधायचे असेल तर हे पुस्तक वाचण्याची आवश्यकता नक्कीच आहे. ट्युनिशिया, कुवेत या देशांमधल्या नरसंहाराने आपल्याला हादरवून सोडले आहे. नव्या पिढीला त्याच पिढीच्या प्रतिनिधी असलेल्या लेखिकेनं एक अतिशय दर्जेदार आणि अनुभवसिद्ध परिपूर्ण असा ग्रंथ हाती दिला आहे.

त्या दृष्टीनेही हे पुस्तक परिपूर्ण आहे. अलिबागमध्ये १३ वर्षे वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापन आणि इंग्रजी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम सांभाळले आहे. प्रा. विशाखा पाटील या बहारिनमध्ये इंग्रजीचे अध्यापन करू लागल्या, तेव्हापासून त्यांचा अरबांविषयीचा अभ्यास वाढलेला आहे. त्याचेच प्रत्यंतर या पुस्तकात आपल्याला येते. अरबी शब्दांचे अतिशय योग्य उच्चारही त्यांच्या लेखनातून कळतात. (थोडक्यात, आपले चुकीचे उच्चारही कळतात.) मुख्य म्हणजे, त्यांनी पुस्तकाच्या मागे जे परिशिष्ट दिले आहे त्यात अगलपासून हेजबुल्लापर्यंत सर्व शब्दांचे अर्थ स्पष्ट केले आहेत. हे पुस्तक म्हणजे राजहंस प्रकाशनाच्या आजवरच्या दर्जेदारपणामध्ये शोभून दिसणारे मोरपीस आहे. लेखक शोधून काढायच्या आणि त्याच्याकडून मराठी साहित्यक्षेत्रात ज्याचा बोलबाला होईल, असे लेखन करवून घ्यायच्या दिलीप माजगावकर यांच्या दृष्टीलाही अरब धाग्यांनी दिलेली ही दाद आहे. अरब जगाचे हे धागे असले तरी, त्याची वीण ही भारताशीही बांधली गेली आहे आणि या कामाच्या संपादनात डॉ. सदानंद बोरसे यांचे साह्य झाले आहे.
>धागे अरब जगाचे
>प्रा. विशाखा पाटील
>राजहंस प्रकाशन, पुणे
>पृष्ठे : ४२४
>किंमत : रु. ४००/-

arvindgokhale@gmail.com
बातम्या आणखी आहेत...