आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथार्थ: बदलत्या भारताची वास्तव कथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतिहासावर नांगर फिरवत श्रेय पदरी पाडून घेण्याची कला विद्यमान मोदी सरकारने चांगलीच अवगत केलीय. त्याचमुळे दरदिवशी जाहीर होणाऱ्या सुधारणावादी योजनांचे हक्कदार तेच आहेत, असा आभास निर्माण होऊ लागलाय. मात्र या आभासी जगातून जमिनीवर आणत वास्तवाचा चेहरा दाखवण्याची मोलाची भूमिका संपर्क क्रांतीचे प्रणेते सॅम पित्रोदा यांचं प्रस्तुत पुस्तक पार पाडतं.

‘ड्रिमिंग बिग - माय जर्नी टु कनेक्ट इंडिया’ नावाच्या गेल्या वर्षी प्रकाशित आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात सॅम पित्रोदा यांनी असे वक्तव्य केले होते की, आज चर्चेत असलेल्या ‘डिजिटल इंडिया’ची मूळ संकल्पना राजीव गांधी यांची होती. नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल श्रेय घेण्याचे काही कारण नाही. ही संकल्पना २५ वर्षांपूर्वीची आहे, आणि ती पूर्ण होण्यासाठी अजून २० वर्षे तरी लागतील.’ त्यानंतर काही टेलिव्हिजन मुलाखती किंवा काही वर्तमानपत्रातील मुलाखतींमुळे आणि मुख्यत: रिझर्व्ह-बँक गव्हर्नर रघुराम राजन यांना सरकारने अपमानित केले, त्यांच्या देशभक्तीवर काही लोकांनी संशय घेतला आणि त्यामुळे त्यांना पुढे काम करण्यात इच्छा राहिली नाही अशा अर्थाचा लेख लिहिल्याने ते चर्चेत राहिले...
१९८०मध्ये हेच पित्रोदा आई-वडिलांबरोबर दिल्लीला ताज हॉटेलमध्ये राहायला येतात. तिथे आल्यावर ते आपल्या बायकोला फोन करायचा प्रयत्न करतात, पण टेलिफोन लाईन खराब असल्यामुळे फोनवरचे बोलणे अर्धवट राहते. दुसऱ्या दिवशी ते आपल्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहात असताना, ते एका विलक्षण प्रसंगाला सामोरे जातात. ते पाहतात की, एक अंत्ययात्रा निघाली आहे, परंतु ही यात्रा कुण्या एका व्यक्तीची नसून ‘डेड’ झालेल्या टेलिफोनची आहे! तिथल्या एका हॉटेल कर्मचाऱ्याला याबद्दल विचारल्यावर त्यांना असे आढळते की, इथे (भारतात) टेलिफोन मिळायला दहा वर्षे लागतात आणि घरी आलेच तर ते बंद पडून राहतात!
२०१५ या वर्षी एक अब्ज मोबाइल ग्राहकांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारत देशात ८०च्या दशकात मात्र घरी टेलिफोन यायला १० वर्षे लागत होती, हे वाचून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. पण या प्रसंगाचा पित्रोदा यांच्यावर इतका खोलवर परिणाम होतो, की ते हा प्रश्न सोडविण्याचा निश्चय करतात! १९८४ नंतर सुरू झालेल्या क्रांतीला पुढे १९९१ या वर्षीच्या आर्थिक उदारीकरणाची जोड मिळते, आणि या साऱ्याचा परिपाक म्हणजे २०१६चा भारत, हे आपल्याला पुस्तक वाचताना लक्षात येते!
पित्रोदा यांचे नाव राजीव गांधी यांच्याबरोबर घेतले जात असले, तरीही त्यांनी टेलिकॉमचा हा प्रस्ताव सर्वप्रथम इंदिरा गांधी यांच्या समोर ठेवला. त्यांच्या कारकिर्दीत तो मान्यदेखील केला गेला. परंतु इंदिरा यांची हत्या झाल्यानंतर पंतप्रधानपद राजीव यांच्याकडे आलं आणि इथून राजीव गांधी-सॅम पित्रोदा यांची ‘पार्टनरशिप’ सुरू झाली. पित्रोदा लिहितात, की भारताला माहिती-तंत्रज्ञानाने जोडणे हे एक मोठे स्वप्न होते. असे करण्याने लोकं एकमेकांशी जोडली जातीलच, पण त्याचबरोबर लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होईल, आणि बऱ्याच गोष्टींचे विकेंद्रीकरणदेखील होईल, याचा त्यांना विश्वास होता. परंतु हे सारे फक्त चार महानगरांपुरते सीमित न ठेवता, त्यांना ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहात आणायचे होते आणि खरे आव्हान तिथेच होते!
पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली ‘सेंटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स’ अर्थात C-DOT ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण देणारी एक स्वायत्त, परंतु सरकारच्या अधिकारात असलेली संस्था सुरू झाली. संस्थेने सारे प्राधान्य काही विशिष्ट प्रकारचे ‘स्वीच’ बनवायला दिले, जे भारतातील परिस्थितीनुसार, विशिष्ट ग्रामीण परिस्थितीनुसार काम करतील आणि वारंवार त्यांची देखभाल करावी नाही लागणार. या सगळ्याचा उद्देश हा होता, की हे सारे तंत्रज्ञान भारतात बनेल, आणि आपल्याला अशा कोणत्याही तंत्रज्ञानाची आयात बाहेरच्या देशातून करावी नाही लागणार. हे खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ होते. या ‘स्वीच’मुळे गावागावात टेलिफोन पोहोचले आणि अनेक ठिकाणी एसटीडी-पीसीओ बूथ उभे राहिले. याचे आर्थिक परिणामदेखील दिसून आले. कारण बूथ सांभाळणाऱ्या अनेकांना याने रोजगार मिळाला. शिवाय देश जोडला गेला, हे वेगळेच. पुढे आधुनिक तंत्रज्ञान वापरून काही विशिष्ट क्षेत्रांना लक्ष्य केलं गेलं आणि ‘टेक्नॉलॉजी मिशन’ची स्थापना झाली. पित्रोदा म्हणतात की, ‘पंचवार्षिक योजना’ यांना आधार ठेवून, सहा क्षेत्रांमध्ये काम करायचे ठरविले- ग्रामीण जल पुरवठा, साक्षरता, लसीकरण, दूरसंचार, दुग्ध उत्पादन आणि खाद्यतेल. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १९८७ या वर्षी भारतात सर्वाधिक संख्येने पोलिओ रुग्ण होते. परंतु या मिशनद्वारे अनेक योजना राबविल्या गेल्या आणि २०१३ या वर्षी भारत पोलिओ-मुक्त घोषित झाला. दुर्दैव एवढे की, त्या वेळेस राजीव गांधी ते पाहायला हयात नव्हते, आणि कोणत्याही प्रसारमाध्यमांनी पित्रोदा किंवा या मिशनचा गौरवपूर्ण उल्लेख केला नाही.
राजीव यांच्या हत्येनंतर पित्रोदा पुन्हा अमेरिकेत गेले आणि ते परत आले ते २००४ या वर्षी. काँग्रेस पक्ष २००४ या वर्षी सत्तेत आल्यावर सोनिया गांधी यांनी National Advisory Councilमध्ये सहभागी होण्यासाठी पित्रोदा यांना आमंत्रित केले आणि इथून त्यांची भारतासाठी दुसरी ‘इनिंग’ सुरू झाली. Unique Identification Number अर्थात ‘आधार’, National Knowledge Commission, National Innovation Council आणि अशा अनेक योजना टप्प्याटप्प्याने मार्गी लागत गेल्या. आता प्रश्न असा पडतो, की आताच्या सरकारकडे असा कोणता ‘थिंक टँक’ आहे जो पुढील २० वर्षांनी परिणाम घडवून आणणारे निर्णय घेऊ शकेल? अजून एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, गेल्या पाच वर्षांमध्ये कोणत्याही मीडियाने या निर्णयांचा उल्लेख केला नाही. उलट, स्वातंत्र्यापासून देशात काहीच कसे झाले नाही, असा प्रचार अनेक लोक करताना दिसत होते, अजूनही दिसतात.
पुस्तकात या देशाची एक प्रमुख शोकांतिका मात्र ठसठशीतपणे अधोरेखित होते. देशासाठी एवढं थोर कार्य करणाऱ्या व्यक्तींची आपण समाज म्हणून काय किंमत ठेवतो? पित्रोदा सांगतात की, १९८९ या वर्षी जेव्हा राजीव गांधी निवडणुकीत पराभूत होऊन व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाले, तेव्हा पित्रोदा यांना त्रास द्यायची मोहीम सुरू झाली. व्ही. पी. सिंग सरकारच्या दूरसंचार मंत्र्यांनी पित्रोदा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायला सुरुवात केली. ते पुढे लिहितात की, सर्वांना त्यांच्या मार्फत राजीव गांधी यांना लक्ष्य करायचं होतं. शेवटी, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, हेच सिद्ध झाले. पण या सर्व घडामोडींमध्ये पित्रोदा यांच्या बायकोला आणि मुलांनादेखील धमक्यांना सामोरे जायला लागले. रघुराम राजन यांच्याबद्दल सहानुभूती दाखवताना पित्रोदा २०१२ पासून चर्चेत असलेल्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ खटल्याचेदेखील उदाहरण देतात. या वेळेस मात्र लक्ष्य सोनिया गांधी या आहेत. योगायोग असा की, हेरॉल्ड प्रकरणात पित्रोदा यांच्यावर आरोप करणारे सुब्रह्मण्यम स्वामी हेच रघुराम राजन यांच्यावर आरोप करण्यात आघाडीवर होते.
पुस्तक वाचून होतं, तेव्हा आपण आपल्यालाच काही प्रश्न विचारू लागतो. देशात एवढे बदल घडत असताना आपण भानावर होतो का? उघड्या डोळ्यांनी आपण बदललेला भारत अनुभवाला, की नकारार्थी प्रचारात वाहवत गेलो? पीसीओपासून स्मार्टफोनचा प्रवास आपल्याला आठवतो का? राजीव गांधी यांच्या काळात जेव्हा कॉम्प्युटर्स आले, तेव्हा ज्या पिढीने त्याला विरोध केला, त्यातील बहुतांश लोक साठीच्या उंबरठ्यावर आले आहेत. त्यामुळे सकाळी स्मार्टफोनवरून ‘गुड मॉर्निंग मेसेज’ पाठवताना त्यांना आपली आधीची भूमिका आठवते का? आणि म्हणून हे पुस्तक प्रकाशित होताना पित्रोदा जे म्हणाले, ते लक्षणीय आहे. ही एक प्रक्रिया आहे. २५ वर्षांपूर्वी सुरू झालेली. कदाचित पुढची २० वर्षे सुरू राहणारी.
आशय गुणे
gune.aashay@gmail.com
बातम्या आणखी आहेत...