आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्दचित्रः साधा माणूस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तब्बल ६१ वर्षांची अभिनय कारकिर्द. नाटक-सिनेमा-मालिका असा चौफेर संचार. या प्रवासात जे वाट्याला आलं त्याचं त्यांच्यातल्या साध्या नि संवेदनशील माणसाने सोनं केलं... ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या ‘मी एक छोटा माणूस’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त त्यांचे पुत्र कौस्तुभ सावरकर यांनी रेखाटलेले हे व्यक्तिचित्र...
बरेच दिवस माझे वडील जयंत सावरकर म्हणजे आमचे अण्णा स्वतःच्या विचारात होते. मी त्यांना विचारलं, त्या वेळी त्यांनी मला त्यांच्या आठवणी लिहिण्याविषयी सांगितलं. मला खूप आवडलं ते. मी त्यांना म्हटलं की, तुमचं पुस्तक हे दस्तऐवज झालं पाहिजे. त्यावर ते एवढंच म्हणाले, ‘दस्तऐवज होईल की नाही ते नाही मला माहीत, पण आठवणी खूप असतील ह्यात. आत्मचरित्र नाही लिहायचंय मला, माझ्या आठवणींचा प्रवास लिहायचाय.’ हाच भन्नाट प्रवास ‘मी एक छोटा माणूस’ या त्यांच्या आठवणीरूपी पुस्तकामध्ये शब्दबद्ध झाला आहे.

सगळंच विलक्षण आहे हे. प्रत्यक्षात अण्णा जितके साधे आहेत, तितकंच त्यांचं हे पुस्तक साधं आहे. त्यांच्या या पुस्तकाचं शब्दांकन चैत्राली ओक हीने केलंय. ते वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की, किती साधे पण हृदयाला भिडणारे शब्द आहेत. मला अनेकांनी विचारलं, तू का नाही लिहिलंस? पण कदाचित इतक्या सहज-सोप्या शब्दांत मला लिहिता आलं नसतं.

अण्णांनी तरुणपणी नोकरी सोडून नाटकात प्रवेश केला. नोकरी होती, त्या वेळी गोडगोड वागणारे लोक वडिलांनी नोकरी सोडल्यावर दयेच्या नजरेने बघू लागले. प्रारंभीचे काही दिवस आमच्यावर गरिबीत राहण्याची वेळ आली. आईने अण्णांच्या मागे खंबीरपणे उभे राहून, प्रसंगी जेवणाचे डबे करून दे, कुठे दारोदारी जाऊन फिनेल विक, असं करून त्यांच्या संसाराला हातभार लावला. पण त्या कठीण परिस्थितीतही अण्णांनी नकारात्मक विचार केला नाही.

अण्णा मागील पाच पिढ्या रंगभूमीवर विविध भूमिका स्वीकारून काम करत आहेत. अण्णा आम्हाला नेहमी सांगतात, ‘मी रंगभूमी गाजवून एखादं पान सोनेरी अक्षरांनी इतिहासात लिहावं, असं काही माझ्या हातून घडलं नाही. रंगभूमीच्या वाटचालीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या कलावंतांच्या तुलनेनं मी खरंच एक छोटा माणूस आहे. त्यामुळे आत्मचरित्र लिहावं, असं मला कधीच वाटलं नाही. मात्र, माझ्या घरातल्या पुढच्या पिढीला मी काय केलं, हे कळावं आणि या व्यवसायात येण्याविषयी कुणाच्या इच्छेला बळी न पडता स्वतंत्रपणे विचार करून त्यांना निर्णय घेता यावा, यासाठी मी पुस्तक लिहिण्याचा हा खटाटोप केला.’ नाटकात येण्यापूर्वी अण्णा कमानी इंजिनिअरिंग कंपनीमध्ये स्टेनोग्राफर होते. नोकरीमध्ये असल्यापासून आपण जे करू त्यात प्रावीण्य मिळालंच पाहिजे, हा त्यांचा शिरस्ता होता. नाट्यव्यवसायातही प्रावीण्य मिळवण्याचा अण्णांनी सर्वतोपरी प्रयत्न केला. आम्हाला नकारात्मक विचारांना सकारात्मकतेने घेऊन त्याप्रमाणे अभिमानाने जगायला शिकवलं. अर्थात हा जो सकारात्मक दृष्टिकोन वडलांनी दिला, त्या विचारांवर चालायचं मी ठरवलं; पण वास्तव आयुष्यात ते इतकं कठीण होतं की, माझ्या वडिलांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहून कधी कधी तो खोटा आणि अप्रस्तुतही वाटायचा. पण आता कळतंय की, तोच मानसिक स्वास्थ्य राखण्याचा खात्रीचा मार्ग आहे.

आपण जे बोलतो तसंच वागलं पाहिजे, हे दुसऱ्यांना शिकवणं फार सोप्पं आहे. पण ते आचरणात आणणं खूप अवघड. गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका तालुक्यातून मोठ्या भावाबरोबर मुंबईत आलेला जयंता ते प्रथितयश नाट्यकर्मी जयंत सावरकर हा प्रवास खूप खडतर, खूप मोठा आहे. यात कठोर परिश्रमांशिवाय काहीही नाही. ‘आपण कला क्षेत्रात आहोत आणि आपण आपल्या मेहनतीने यश मिळवतो, इतर लोकसुद्धा त्यांच्या क्षेत्रात मेहनतीने यश मिळवतात. आपल्या क्षेत्राचं यश माध्यमांमुळे दिसतं, इतरांचं दिसत नाही. म्हणजे आपण कुणी जगावेगळे नाही, हे लक्षात ठेव.’ हे अण्णांचं वाक्य माझ्या मनात पक्कं बसलंय. अण्णा नट म्हणून चतुरस्र आहेतच. माझ्या पाहण्यातले फारच थोडे नट असे आहेत, जे कुठलीही भूमिका करताना गरजेनुसार आपल्या चेहऱ्याचेच मास्क बनवतात. अर्थातच त्यांचा चेहरा तोच असतो, मात्र बदलतात त्या चेहऱ्यावरच्या रेषा, प्रतिक्रिया देण्याच्या पद्धती. असं सामर्थ्य असलेले माझ्या पाहण्यात एक म्हणजे, ओम पुरी आणि दुसरे म्हणजे, अण्णा अर्थात, जयंत सावरकर. त्यांना कधीही वेगवेगळ्या बाह्य गेटअप्स करून भूमिका करण्याची गरज नाही भासली किंवा भूमिकेत घुसणं वगैरे असल्या भाकड गोष्टीसुद्धा अण्णांनी कधी सांगितल्या नाहीत. त्यांनी त्या त्या भूमिकेच्या मानसिकतेचा अभ्यास केला. त्या पात्राची विचार करण्याची पद्धत आत्मसात केली आणि त्याच्या प्रतिक्रियेची पद्धत निश्चित केली.

अण्णा अजूनही नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये नट म्हणून काम करतात. पैकी नाटकांमध्ये त्यांची कारकिर्द तब्बल ५८ वर्षांची आहे. आणि ती नुसतीच आहे असं नाही; तर त्याला लोकाश्रयही मिळालाय. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. पैकी ‘गायकवाड’ (नाटक : सूर्यास्त), ‘अंतू बर्वा’ (नाटक : व्यक्ती आणि वल्ली), ‘श्याम’ (नाटक : तुझे आहे तुझपाशी), ‘मंडलेकर’ (नाटक : सौजन्याची ऐशी तैशी) ‘विदूषक’ (नाटक : सम्राट सिंह. हे नाटक ‘किंग लिअर’चे आचार्य अत्रेंनी केलेले रूपांतरण आहे.), गोपाळराव जोशी (नाटक : टिळक आणि आगरकर)... या आणि अशा अनेक भूमिका त्यांनी आपल्या सहज अभिनय कौशल्याने गाजवल्या. मुख्य म्हणजे, एक मुलगा म्हणून, एक प्रेक्षक म्हणूनही मला भावल्या. “कलाकार हा उत्तम माणूस असेल तर तो उत्तम कलाकार होऊ शकतो”, हे त्यांच्यातल्या नटाच्या यशस्वीतेचं गमक आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. ज्या खिलाडू वृत्तीने त्यांनी टक्केटोणपे सोसले, त्याकडे पाहताना मला एक गाणं आठवतं, मै जिंदगी का साथ निभाता चला गया... ‘accept the life as it comes’ ही त्यांनी स्वतःच्या बाबतीत कायम आचरणात आणलेली शिकवण मीसुद्धा आचरणात आणण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतोय. मला वाटतं, हेच त्यांचं महत्त्व अधोरेखित करण्यासही पुरेसं आहे.

बाह्य गेटअप्स करून भूमिका करण्याची गरज नाही भासली किंवा भूमिकेत घुसणं वगैरे असल्या भाकड गोष्टीसुद्धा अण्णांनी कधी सांगितल्या नाहीत. त्यांनी त्या- त्या भूमिकेच्या मानसिकतेचा मात्र अत्यंत काटेकोरपणे अभ्यास केला...
kaustubhjg@gmail.com
बातम्या आणखी आहेत...