आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलंदराचा कॅन्व्हास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोपाळ देऊसकर हे आपल्या कार्यामुळे आणि वादळी वागण्यामुळे जिवंत असतानाच एक आख्यायिका झालेले होते. मराठी मध्यमवर्गीय मानसिकतेमध्ये धक्कादायक म्हणता येतील, अशा अनेक गोष्टी त्यांच्या अवतीभवती नेहमी फिरत. गोपाळ देऊसकरांना ‘बापू’ म्हणत असत. जे.जे.मध्ये प्रात्यक्षिक देण्यासाठी आलेल्या आणि त्यांना प्रथम पाहणा-या सुहासने त्या घटनेचे वर्णनही छान केले आहे, अगदी खास जे. जे.मधील बिनधास्त मोकळेपणाने. आपल्या डाव्या-उजव्या बाजूला दोन सुंदर मुलींना घेऊन रुबाबात येणा-या या बापूंची तुलना सुहासने ‘त्या’ बापूं शी सहज केली आहे.

याच सहजतेने पुढील सर्व प्रकरणांमध्ये येणा-या वाक्यांमुळे हे सर्व पुस्तकच वाचनीय झाले आहे. मला तर मी स्वत: पुन्हा आमच्या कॉलेजात गेल्याप्रमाणे क्षणोक्षणी वाटत होते. आमच्या त्या काळच्या या प्रतिभावान शिक्षकाची मर्जी सांभाळून काही शिकता आले तर उत्तम, म्हणून आम्ही सर्व जण त्यांच्या विक्षिप्त वागण्याकडे कानाडोळा करतच पुढे-मागे करीत असू. त्याप्रमाणे देऊसकरांकडून काही शिकता येईल, म्हणून त्यांच्या घरी पाेहोचणा-या सुहास आणि त्याचा मित्र श्रीकांत जाधव यांना उशिराचं कारण न ऐकून घेता The world is not intrested in your excuses म्हणून हाकलून देणा-या देऊसकरांनी आपल्या वेळ पाळण्याच्या खास ब्रिटिश खाक्याचा प्रथम धडा दिला होता.

पुढे शिकणे वगैरे विद्यार्थ्याने आपले आपण करायचे. मास्तर हात धरून काही शिकविणार नव्हते. टिळक मंदिरातील म्युरल रंगवताना तट्ट्याच्या पार्टिशनच्या आत गुप्तपणे रंगवणे चालत असे, आणि साहाय्यक म्हणून घेतलेल्या विद्यार्थ्यानेसुद्धा चित्राकडे पाठ करून पुस्तकांमध्ये तोंड घालून बसायचे, देऊसकर रंगलेपन कसे करतात, काय खुब्या वापरतात, आदी गोष्टी बघायच्या नाहीत, असे हे दिव्य साकारत एकलव्याप्रमाणे स्वत:च स्वत:ला शहाणे करून घ्यायचे, ही त्या जमान्यातली रीतच होती. आणि तरीसुद्धा अशा तिखट आणि शिवराळ गुरुबद्दल चाळीस-पन्नास वर्षांनंतर पुस्तक लिहिण्याची ऊर्मी असावी, हे सारे केवळ प्रेमापोटी आणि आदरापोटीच शक्य आहे.

रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांचे चित्र करते वेळी त्यांना स्टुडिओत येणे शक्य नाही, आॅफिसात येऊन चित्र करावे लागेल, असे सांगितल्यावर ‘आॅपरेशन’ हे आॅपरेशन थिएटरमध्येच आणि डॉक्टरच्या दवाखान्यातच होते ना? मग तसे चित्रही चित्रकाराच्या स्टुडिओमध्येच होईल, हे त्यांनी ठणकावून सांगितले होते. आपल्या कामावरील विश्वास आणि त्याबद्दलचा रास्त अभिमान देऊसकरांना आयुष्यभर होता.

शरीरसौष्ठ‌वाचा अभ्यास करताना कपडे बघू नका. कपड्याआतील शरीर बघा. एक्स -रे व्हिजन असली पाहिजे. धोतर असो नाही तर साडी, स्कर्ट असो वा ब्लाऊज, ते शरीराभोवती असते. त्यातून शरीराचा आकार जाणवला पाहिजे, अशा अनेक टीपा ते सहज देऊन जात असत.
अनाथ मुलांचे जगणे वाट्याला आलेल्या गोपाळ देऊसकरांच्या बालपणीच्या त्रिस्थळी जगण्याच्या घटनांपासून सुरू झालेली ही यात्रा ब्रिटनची इंग्रजीचा गंध नसतानाची वारी, भारतामधील राजघराण्याचा चित्रकार म्हणून झालेली ख्याती, हैदराबादच्या निजामाकडील कामे, ‘सालारजंग म्युझियम’ची जुळवाजुळव आदी गोष्टी सांगत आपल्याला गुंतवून ठेवते.
राजघराण्याचा चित्रकार म्हणून देऊसकरांची आेळख निर्माण होण्याच्या कालखंडामध्ये अनेक गमतीदार घटना घडत होत्या. आठ कोटीचे दागिने घालून बसलेल्या सीतादेवी ‘राणीचे चित्र साकारताना’ देऊसकरांच्या दोन्ही बाजूस बंदुका घेऊन शिपाई उभे असत. हे कामात व्यत्यय आणणारे होते. तेव्हा त्यांनी महाराणींना सरळ सांगितले, ‘मी काही चोर नाही. एक सन्मान्य चित्रकार आहे. आणि समजा, एखाद्या शिपायाला डुलकी लागली आणि त्याची संगीन माझ्या पाठीत घुसली तर काय? तुमचे दागिने आणि मौल्यवान हिरे माझ्यासाठी रंगाचे साधे ठिपके आहेत.’

तेव्हा ते पहारेकरी तेथून काढले गेले. राजे-महाराजे असोत किंवा जे. आर. डी. टाटांसारखा उद्योगपती, त्यांना आपल्या अटीवरच काम करून देण्यावर देऊसकर ठाम असत.
प्रथम पत्नी आणि देऊसकर विभक्त झाल्यावर त्यांच्या आयुष्यात आलेल्या जुईली देऊसकर किंवा चिऊ यांच्या वयात ३४ वर्षांचे अंतर होते. हा एक नवाच अध्याय आणि चर्चेचा विषय होता, पण सुहासने हे प्रकरण अत्यंत संयमाने हाताळले आहे.

टिळक स्मारकामधील काम असो किंवा बालगंधर्व मंदिरातील दोन मोठी चित्रे, यांच्या आठवणी नक्कीच वाचनीय आहेत. शासकीय नियमांनी कलावंतांना बांधणे कधीच शक्य नाही, हे समजणारे अधिकारीही आजकाल दुर्मीळ झाले आहेत. न. चिं. केळकरांचे चित्र करताना चित्रातील खटकणारा हात खरवडून काढून पुन्हा रंगवताना दाखवलेला ‘सर्जन’सारखा ठामपणा किंवा मंडईमध्ये बाजारहाट करताना साध्या साध्या गोष्टींतील ‘व्हारायटी’चा आनंद आदी गोष्टी या ‘रंगीन’ माणसाचे चित्र अधिकच रंगीत करतात.

पुस्तकाच्या शेवटी देऊसकराची विविध पत्रे आणि दामू केंक-यांनी घेतलेली एकमेव दीर्घ मुलाखत मार्मिक आहेत. ही मुलाखत या जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची आेळख पटवतानाच त्यांच्या स्वत:च्या बोलण्यातूनच अनेक विवादास्पद मुद्द्यांचा उहापोह करते. त्यामुळे हे वादग्रस्त, प्रसंगी रंगेल व्यक्तिमत्त्व त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा पुरावा म्हणून ठामपणे हे जसे घडले तसे आपल्या समोर सादर करते. कारण, सामान्य वाचकांच्या नेहमीच्या जगण्यात, अनुभवात न येणा-या घटना कलावंताबद्दल वदंताच अधिक निर्माण करतात.
एका मनस्वी, स्वच्छंदी, कर्तबगार थोर चित्रकाराचे आयुष्य इतक्या पारदर्शीपणे सादर केल्याबद्दल चित्रकार-लेखक सुहास बहुळकरचे अभिनंदन!

जागतिक कीर्तीच्या कलावंतांमध्ये आपल्या कर्तबगारीने हक्काचे स्थान निर्माण करणा-या देऊसकरांच्या या पुस्तकाचा अनेक भाषांत अनुवाद होणे जरुरीचे आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत हा विलक्षण प्रवास पोहोचला पाहिजे, आणि तसा तो लवकरच पोहोचेल, ही आशा!

raghuvirkul@gmail.com
^ पुस्तकाचे नाव : चित्रकार गोपाळ देऊसकर -
कलावंत आणि माणूस
^लेखक : सुहास बहुळकर
^प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
^किंमत : रु. ३५०/-
^पृष्ठसंख्या : २७२
बातम्या आणखी आहेत...