आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परराष्‍ट्र नीतीची वाचनीय उकल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा एक वर्षाचा कार्यकाल नुकताच पूर्ण केला. या दरम्यान सर्वाधिक चर्चा झाली ती, त्यांच्या परराष्ट्र दौ-यांची. एका वर्षात त्यांनी १८ देशांना भेटी दिल्या. या दौ-यांची सुरुवात शेजारी राष्ट्र असलेल्या भूतानपासून झाली. नेपाळ, म्यानमार, चीन या शेजारी देशांतही मोदी जाऊन आले. या सगळ्या दौ-यांचे फलित काय, त्याचा भारताला किती उपयोग झाला, यावर तातडीने भाष्य करणे खरे तर फारच घाईचे. तरीही सोशल मीडियातून मोदी यांच्या परदेशगमनावर यथेच्छ टीका झाली. मोदींनी परदेशात जाऊन केलेली काही विधानेसुद्धा प्रसंगी अवमानकारक आणि परराष्ट्रनीतीचे औचित्यभंग करणारी होती.

या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त लेखक शशी थरूर यांच्या ‘पॅक्स इंडिका : इंडिया अँड द वर्ल्ड इन द ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी’ या पुस्तकाकडे पाहायला हवे. मूळ इंग्रजीत हे पुस्तक तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले आहे. ‘बृहत भारत’ हा त्याचा मराठी अनुवाद ज्येष्ठ पत्रकार आ. श्री. केतकर यांनी नुकताच केला आहे. चिनार प्रकाशनाने हे पुस्तक मराठी वाचकांपुढे आणले आहे. थरूर यांनी हे पुस्तक लिहिले, तेव्हा ते काँग्रेस पक्षाचे खासदार होते (तसे ते आताही आहेत) आणि त्यांच्या पक्षाची सत्ता देशात होती. साहजिकपणे थरूर यांच्या राजकीय बांधिलकीचा प्रभाव त्यांच्या लेखनावर पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, स्वतः थरूर यांनी या पुस्तकातील मते संपूर्णपणे वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. त्यावर विश्वास ठेवून वाचकांनी पुस्तक उघडावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. थरूर यांनी आणखी एक बाब सांगून ठेवली आहे. एका भारतीय मुत्सद्द्याने त्यांना सांगितलेली ही गोष्ट आहे. तो मुत्सद्दी थरूर यांना म्हणाला –“भारतीय मुत्सद्देगिरी ही हत्तीच्या प्रणयक्रीडेप्रमाणे असते. ती अतिशय उच्च पातळीवर आणि मोठ्या गोंगाटात केली जाते. तिचे फलित मात्र दोन वर्षांपर्यंत समजून येत नाही.” थोडक्यात, परराष्ट्र धोरण हा विषय इतका उथळ नसतो. त्यामुळे निष्कर्षांपर्यंत येण्याची घाई परराष्ट्र धोरण समजून घेताना दाखवता येत नाही.

हे लक्षात ठेवूनच थरूर यांनी भारताच्या परराष्ट्र नीतीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा लेखाजोखा अकरा सविस्तर प्रकरणांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण आशियात खंडप्राय व्याप्ती असलेल्या भारताला पाकिस्तान, चीन, बांगलादेश, अफगाणिस्तान (पाकव्याप्त काश्मीर हा देशाचा भाग धरला तर), श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव, म्यानमार असे सख्खे शेजारी आहेत. यातल्या प्रत्येक शेजा-याशी असणा-या हितसंबंधांना ऐतिहासिक, भौगौलिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय असे विविधांगी कंगोरे आहेत. पाकिस्तानला आपण भाऊ मानायचे की वैरी? चीनबरोबर स्पर्धा करायची, संघर्ष करायचा की सहकार्य? अमेरिका, इस्रायल, रशिया आदी पाश्चिमात्यांपैकी आपले खरे मित्र कोण? हे भारताच्या परराष्ट्र धोरणापुढे असणारे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत. यांची उकल करत असताना थरूर यांच्यापुढे सतत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री केलेला नियतीचा करार असतो. “आज सर्व देश आणि त्यामधील लोक अशा घट्ट बंधांनी जोडले गेले आहेत, की त्यापैकी कुणीही वेगळे राहून जगण्याची कल्पनाही करू शकणार नाही. शांततेचे विघटन करता येत नाही. स्वातंत्र्याचेही तसेच आहे. संपन्नतेच्या बाबतीतही तेच म्हणता येते, आणि जगाच्या या एकभावनेने अरिष्टांबाबतही तसेच म्हणता येईल. आता कुणीही एकाकी, बाजूला पडलेल्या तुकड्याप्रमाणे दुर्लक्षित राहू शकणार नाही’, असा वैश्विक विचार नेहरू यांनी स्वातंत्र्य मिळत असतानाच्या मध्यरात्री मांडला होता. अर्थात, व्यावहारिकतेची जोड नसल्याने हे विचार स्वप्नाळू आहेत, अशी टीका झेलण्याचे प्रसंगही नेहरूंवर पुढच्या काळात ओढवले होते. असे असले तरी थरूर यांच्या परराष्ट्र धोरणाचे मध्यवर्ती सूत्र नेहरूंनी नियतीशी केलेल्या करारावरच बेतले आहे.
नेहरूंच्या अलिप्ततावादी धोरणाला ते बहुविध हातमिळवणीची जोड देतात. एकविसाव्या शतकातील बदलांना प्रतिसाद देण्यासाठी बहुविध मैत्री करार अपरिहार्य असल्याचे ते म्हणतात.
स्वतः थरूर यांची प्रदीर्घ कारकीर्द संयुक्त राष्ट्रसंघात आणि भारतीय राजकारणात आल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात गेली आहे. या दरम्यानचे विविध अनुभव आणि किस्से त्यांच्या लेखनात आहेत. त्यामुळे थरूर यांनी केलेली परराष्ट्र नीतीची चर्चा केवळ पुस्तकी, बोजड थाटाची न होता रंजक, वाचनीय झाली आहे. पत्रकार, बुद्धिजीवी वर्ग, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून हे पुस्तक उपयुक्त ठरेल. आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल रुची असणा-यांची भूक वाढवण्याचे कामही हे पुस्तक करते. परराष्ट्रनीती अभ्यासणा-यांना दिशादर्शन करण्याचा, आंतरराष्ट्रीय धोरणांबद्दलची समज वाढवण्याचा प्रयत्न थरूर यांनी केला आहे. केतकरांचा मराठी अनुवाद थरूर यांच्या चटपटीत, आकर्षक इंग्रजी लेखनाचा रसभंग करत नाही.

sukrut.k@gmail.com