आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तक परिचय: परिवर्तनाचा कोवळा आवाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळवणारी सर्वात लहान वयाची मुलगी मलाला युसूफजई, आपले ‘मी मलाला’ हे आत्मकथन घेऊन वाचकांसमोर आली आहे. अर्पणपत्रिकेपासून हे लेखन लक्ष वेधून घेते. ‘अन्यायाचा सामना करणाऱ्या आणि त्याबद्दल ज्यांचा आवाज बंद केला गेला अशा सर्व मुलींना...’ तिने हे लेखन समर्पित केले आहे आणि ‘आपल्या सगळ्या जणींचा आवाज ऐकला जाईल’ असा दुर्दम्य आशावादही व्यक्त केला आहे. एकूण पाच भागांचे हे आत्मकथन तालिबानच्या आधी, मृत्यूची दरी, तीन मुली तीन गोळ्या, जीवन-मरणाच्या हिंदोळ्यावर आणि पुनर्जन्म अशा शीर्षकांनी वाचकांना भेटते.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी हट्टाने शाळेत जाते, म्हणून मलालावर गोळ्या झाडल्या गेल्या. निसर्गसौंद्याचे देणे लाभलेल्या स्वात खोऱ्याचा तालिबानींनी ताबा घेतला तेव्हा मलाला नावाच्या कोवळ्या मुलीने त्याविरोधात आवाज उठवला होता. प्रत्येकीच्या शिक्षणाच्या हक्कासाठी तिने लढायचे ठरवले..हा तिचा गुन्हा होता. याची किंमत ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तिला चुकवावी लागली. शाळेतून बसने घरी येत असताना तिच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. एकाएकी तिचं आयुष्य जीवन-मरणाच्या सीमेवर हेलकावे घेऊ लागले. पण या हल्ल्यातून ती आश्चर्यकारकरीत्या वाचली आणि आपल्या ध्येयासाठी त्याच निर्धारानं कार्य करत राहिली..तिचा हा लढा जागतिक बनला आणि शांतता नोबेलची मलाला मानकरीण झाली. वयाच्या फक्त १६ व्या वर्षी तिने संयुक्त राष्ट्रसंघात भाषण दिलं. जगातल्या प्रत्येक शिक्षण नाकारल्या गेलेल्या मुलीच्या शिक्षणहक्कासाठी तिनं ‘मलाला फंड’ सुरू केला आहे. मलालाची ही संघर्षकथा सुप्रिया वकील यांनी मराठीत अनुवादित केली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हा अनुवाद प्रकाशित केला आहे. एक कोवळा आवाजही परिवर्तनाची पहाट कशी जागवू शकतो, याचे हे आत्मकथन उत्तम उदाहरण आहे.