आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारीचे छायाचित्रमय स्वगत...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या व मराठी संस्कृतीच्या ओळखीच्या ज्या निजखुणा आहेत, त्यांच्यात पंढरीची वारी ही सर्वात महत्त्वाची खूण मानली जाते. दरवर्षी पंढरीच्या वारीला लोटणारा जनसागर हा डोळ्यांचे पारणे फेडणारा एक सोहळा असतो. त्यातच नव्या पिढीला तिच्या भाषेत व ओळखीच्या माध्यमातून वारीचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिरीष शेटे यांच्यासारखा सुज्ञ कलाकार पुढे येतो आणि छायाचित्रांच्या साहाय्याने महाराष्ट्राची संस्कृती, संतपरंपरा आणि पंढरीची वारी यांची ओळख करणारे पुस्तकच सिद्ध करतो, ही बाब निश्चितच दिलासा देणारी आहे.

‘सेवितो हा रस वाटितो आणिका’ तुकोबांच्या या अनुभवाला अनुसरून ‘आपण स्वत: जे पाहिले ते इतरांना दाखवायचे’ असा चंग बाधून त्यासाठी उत्तम साधन असलेला कॅमेरा सरसावून शिरीष शेटे वारीत सहभागी झाले. आळंदी व देहूतून निघून आषाढ शुद्ध एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपुरी दाखल होणा-या संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या सोहळ्यातील अनेक क्षण शिरीष शेटे यांनी कॅमे-यात बंदिस्त केले आहेत. या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक फोटोसह येणा-या माहितीपर ओळी आणि अभंग हे ‘रनिंग कॉमेंट्रीचा’ प्रत्यय देतात. त्यांनी पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणी परिसर, गरुड खांब, चोखोबांची समाधी, नामदेव पायरी, पंढरीचे वाळवंट या छायाचित्रांतून साक्षात पंढरपूर नजरेसमोर उभे केले आहे. वारीचे प्रत्येक टप्पे, रिंगण, खेळ, भजन, कीर्तन, वारक-यांचा दिनक्रम अशा अनेक महत्त्वपूर्ण नोंदी त्यांच्या छायाचित्रांतून अधोरेखित होतात. विशेषत्वाने सोन्याचा पिंपळ, नेवासा येथील खांब, आळंदीचा अजानवृक्ष हा ज्ञानदेवादी भावंडांच्या स्पर्शाने पावन झालेला परिसर, तसेच संत एकनाथांचा पैठणमधील राहता वाडा, त्यांचे देवघर, गावाबाहेरचे समाधी मंदिर या तपशिलातील काही छायाचित्रांमुळे पंढरपूरच्या वारीविषयावरील हे एक परिपूर्ण पुस्तक तयार झाले आहे.

या पुस्तकात त्यांनी संत नामदेवांच्या खाणाखुणांचा अगदी पंजाबपर्यंत मागोवा घेतल्याचे लक्षात येते. संत नामदेवांचे पंढरपूरमधील राहते घर छायांकित करत असतानाच नामदेवांविषयी अत्यंत मोजक्या शब्दांत महत्त्वाची माहिती समजते. संत नामदेवांनी अगदी पंजाबपर्यंत भागवत धर्माची ध्वजा फडकवली. पंजाबमधील तापियाना साहेब गुरुद्वारामधील संत नामदेवांच्या मूर्तीचे छायाचित्रही या पुस्तकात आहे. तसेच दिल्ली येथील नामदेव मंदिर, हंपी येथील विरूपाक्ष मंदिर व विठ्ठल मंदिर अशी तीर्थे चित्ररूपाने पुस्तकात पाहायला मिळतात. प्रत्येक छायाचित्राखाली तीर्थांची माहिती आणि शक्य असेल तिथे अभंगवाणी लिहून त्यांनी या पुस्तकाला वाङ्मयीन उंची प्राप्त करून दिली आहे. वारक-यांच्या व्यक्तिचित्रात्मक छायाचित्रांतून सुरकुतल्या चेह-यांचे वारकरी ते जीन्स पँटमधील वारकरी असे वैविध्यही वाचकांसमोर येते. तब्बल 12 वर्षांनी वारक-यांसाठी खुल्या झालेल्या संत तुकाराम मंदिराचे छायाचित्र लक्षवेधी आहे. या मंदिरात संत तुकारामांचे अमर अभंग संगमरवरात कोरले गेल्याची माहितीही एका छायाचित्रातून मिळते.

शिरीष शेटे यांचे पुस्तक म्हटले तर डोळ्यांना सुखावणारे आणि म्हटले तर डोळ्यांत घातलेले अंजनही आहे. रस्त्यावरच जेवणारे वारकरी, चंद्रभागेच्या घाटावर कपडे सुकवणा-या बाया, माळरानभर उघड्यावरच विश्रांती घेत असलेले वारकरी छायाचित्रांमधून ठळकपणे अधोरेखित होतातच, पण शेटेंच्या या पुस्तकामुळे वाचकांच्या माहितीत व ज्ञानात मोलाची भर पडते यात काही वादच नाही. मात्र वारीच्या निमित्ताने एवढा प्रचंड जनसमुदाय लोटतो तेव्हा होणारी प्रचंड गैरसोय आणि प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव, वारक-यांनी सोडलेल्या गावात होणारा कचरा आणि ओघाने त्या गावात शिरकाव करणारे साथीचे आजार, वारीची कैक वर्षांची परंपरा असूनही महिलांसाठी शौचालयांची सोय नसल्याने उघड्यावर होणारे प्रातर्विधी अशा समस्यांवर मात्र शिरीष शेटे यांच्या कॅमे-याचा डोळा रोखलेला तितकासा आढळत नाही.

ते तीर्थांचे माहेर, लेखक - शिरीष शेटे
पृष्ठसंख्या - 188, प्रकाशक - मैत्रेय प्रकाशन, किंमत - 500 /-
bhingarde.namrata@gmail.com