आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यावरण प्रेमामुळे कागदी पुस्तकांकडे बघण्याचा सुजाण नागरिकांचा दृष्टिकोन बदलतोय. यामुळे प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांमध्ये ‘स्क्रीन’वरचे लेखन लोकप्रिय होतेय. त्याचवेळी विकसनशील देशांसाठी कागदाच्या वाढत्या किमती परवडेनाशा झाल्यात. यामुळे ‘स्क्रीन’चा पर्याय या देशासाठीही आवश्यक बनतोय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘टेक्नोसॅव्ही’ तरुणाईच्या हातात आलेली वेगवेगळ्या माध्यमातली ‘स्क्रीन’ त्यांना अधिक भावते. अगदी बुटांच्या खरेदीपासून, विमानाचे तिकीट काढण्यापर्यंत आणि बँकांचे व्यवहार करण्यापासून ते पोट भरण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट हातातल्या ‘स्क्रीन’वरून हातावेगळी करण्याकडे तरुण पिढीचा ओढा आहे. पुस्तकांची खरेदी आणि पुस्तकांचे वाचनही याला अपवाद नाही.
अर्थात ग्रंथालय मग ते खासगी असो वा सार्वजनिक, शाळेतलं, गावातलं असो किंवा बड्या शहरातलं या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे सगळीकडची पुस्तकं कागदाचीच. ग्रंथालयांमधल्या पुस्तकांवरची धूळ कित्येक दिवसांमध्ये, महिन्यात झटकली जात नाही. यावरून असे वाटते की, पुस्तकांबद्दलचं प्रेम ओसरलंय की काय, तर दुस-या बाजूने पुस्तक मेळे, पुस्तक विक्री प्रदर्शनात लाखो रुपयांची पुस्तकही हातोहात खपताना दिसतात. या परस्परविरोधी चित्रामुळे संभ्रम वाढतो.
० तीन हजार पुस्तके दरवर्षी येतात मराठी भाषेत :
अर्थातच खपणारी पुस्तके आणि त्यांचा दर्जा याबद्दलची चर्चा करण्याचा हेतू येथे नाही हे आवर्जुन सांगायला हवं. मराठी पुस्तक जगतात नेमकं चाललंय काय, याची चर्चा मात्र करायची आहे. आजमितीस सुमारे तीन हजार पुस्तके दरवर्षी नव्याने मराठी भाषेत प्रकाशित होतात. ही संख्या मोठी आहे, परंतु एवढ्या मोठ्या संख्येतील किती पुस्तके गाजतात, लोकांच्या लक्षात किती राहतात किंवा जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोहोचतात किती? अत्यंत गाजलेली म्हणून ज्या मराठी पुस्तकांचा उल्लेख केला जातो त्या पुस्तकांच्याही प्रतींचा खप तीन-चार लाखांपेक्षा जास्त नसतो. मराठीत दर्जेदार, कसदार लेखनाची वानवा आहे म्हणून असं घडत नाही.
० अनेक मराठी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचतच नाहीत :
लाखोंच्या संख्येने विकल्या जाणा-या कित्येक इंग्रजी पुस्तकांचाही दर्जा साधारण किंवा त्याहीपेक्षा खालचा असतो. मुद्दा दर्जाचा नाही. मराठीतली अनेक पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजेच लेखक आणि वाचक यांच्यातला दुवा असलेला ‘प्रकाशक’ पुरेसा यशस्वी ठरत नाही. हा प्रश्न केवळ मराठीलाच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांना भेडसावू लागलाय. आजकाल प्रत्येक क्षेत्र व्यापून राहिलेला ‘मार्केटिंग’ हा कळीचा मुद्दा मराठी ग्रंथ जगतामध्ये अजून तितका प्रभावी ठरलेला नाही.
० ऑनलाइन मराठी अजूनही अडचणीचेच :
आता कुठे मराठी प्रकाशन संस्थांची संकेतस्थळे निदान मर्यादित वाचकांना तरी माहिती होऊ लागली आहेत. ई-बुक्स, ऑनलाइन पुस्तक खरेदी गेल्या तीन-चार वर्षांत मराठीत आली आहे, परंतु यातही प्रमुख भर आहे तो सरधोपटपणे पुस्तके ‘स्कॅन’ करून किंवा ‘पीडीएफ फॉर्म’मधली पाने ‘अपलोड’ करण्यावरच. अनेकदा ‘ऑनलाइन’ मराठी वाचताना ‘फाँट’ त्रास देतो, आकार वाढवताना अक्षरे फुटतात. परदेशातल्या मराठीप्रेमींना पुस्तकांचे ‘लगेज’ विमानातून घेऊन जाण्यात अडचणी येतात. हवे तेव्हा हवे ते पुस्तक लगेच मिळत नाही. देशातल्या पुस्तकप्रेमींनाही कमी-अधिक प्रमाणात या अडचणींचा सामना करावा लागतो. नव्या पिढीच्या ‘स्क्रीन’प्रेमाला मराठी प्रकाशकांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला नाही तर या मुळे फक्त मराठी प्रकाशकांचे नुकसान होणार नाही तर मराठी भाषेचीही हानी होईल. मराठी पुस्तके जगभर नेण्यासाठी, नव्या पिढीला मराठीची आवड लावण्यासाठी प्रकाशकांनी इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करणे ही काळाची गरज बनलीय.
० मेहतांचे पाऊल ‘ई-पब’च्या दिशेने
पुण्यातल्या मेहता पब्लिशिंग हाउसने ई-बुक्सच्या आधुनिकीकरणाकडे पाऊल टाकले आहे. मराठीत ‘ई-पब’चा वापर पहिल्यांदाच होत असल्याचा त्यांचा दावा आहे. या संदर्भात सुनील मेहता म्हणाले, ‘‘इंग्रजी भाषेत रुळलेली ही व्यवस्था आम्ही मराठीत प्रथमच आणतो आहोत. वि. स. खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व. पु. काळे या आमच्या लोकप्रिय लेखकांची तसेच अनुवादित व इतर सुमारे साडेतीन हजार पुस्तके आमच्या ई-पबवरून जगभरातल्या वाचकांना मिळतील.’’ ई-पबमुळे पुस्तकांची छपाई, वाहतूक, साठवणूक हा सगळाच खर्च वाचतो हा प्रकाशक म्हणून होणारा फायदा आहे. शिवाय, पुस्तकांचा खप किती झाला याची अचूक आकडेवारी ऑनलाइन मिळते त्यामुळे लेखकांच्या रॉयल्टीवरून होणारे वाद पूर्णपणे थांबतील. पुस्तक खरेदीतली सुलभता आणि सहज उपलब्धता ही वाचकांची सोय आहे. पुढच्या वर्षापर्यंत आमचे कोणतेही पुस्तक ई-पबवर फक्त ९९ रुपयांत विकत आणि 49 रुपयांत तात्पुरते देण्याचा माझा प्रयत्न आहे.
० तरुणांची पसंती ‘स्क्रीन’ला
सत्तर किंवा फार तर ऐंशीच्या दशकात किंवा तत्पूर्वी जन्माला आलेली पिढीच फक्त आता कागदावरची पुस्तके आवडीने वाचते. परंतु 1995 नंतर जन्माला आलेल्या पिढीला स्क्रीनवरची पुस्तके अधिक आवडतात. मग ही स्क्रीन त्यांच्या मोबाइलची असो, आयपॅडची असो, लॅपटॉप किंवा टॅबची असो. स्वस्तात उपलब्ध होणारे तंत्रज्ञान आणि साधनांची सुलभता हे प्रमुख कारण या बदलामागे आहे. त्यामुळे कागदांवर छापल्या जाणा-या पुस्तकांना काही भविष्य उरलेय का, असा प्रश्न नजीकच्या भविष्यात उद्भवला तर आश्चर्य वाटायला नको. कारण वाचकांची गरज किंवा रुची (इंटरेस्ट) असते ती फक्त आशयात (कंटेंट).
आशयाची भूक, माहितीची गरज, ज्ञानाची अभिलाषा कोणत्या माध्यमातून भागवली जाते याची फिकीर वाचकाला असण्याचे कारणच उरत नाही. यामुळेच पुस्तकांचे जग आता वेगाने बदलू लागले आहे. लिहिण्यासाठीचा प्रवास पाषाण, वृक्षांची पानं किंवा साली, प्राण्यांची कमावलेली कातडी, धातूचे पत्रे, कापड, कागद असा होत आता ‘स्क्रीन’पर्यंत येऊन पोहोचलाय.
भविष्य ‘ई-बुक्स’, ‘इंटरनेट सेल’चे
असोसिएशन ऑफ अमेरिकन पब्लिशर्स आणि बुक इंडस्ट्री स्टडी ग्रुपने नुकतेच एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचे दाखले मराठी प्रकाशकांना दिशा दाखवणारे आहेत. एकट्या अमेरिकत गेल्यावर्षी तब्बल 3.04 अब्ज डॉलर्स (सहज चाळा म्हणून सध्याच्या गडगडलेल्या रुपयाच्या हिशेबाने या आकड्याचे रूपांतर करून पाहायला हरकत नाही.) इतक्या किमतीची पुस्तक विक्री फक्त इंटरनेटच्या माध्यमातून झाली. इंटरनेटवरून होणा-या पुस्तक विक्रीत 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी दुकानांमधली पुस्तक विक्री 15.04 अब्ज डॉलर्स इतकी झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत दुकानांमधून झालेल्या पुस्तक विक्रीतली वाढ जेमतेम 6.9 टक्के आहे. याचा अर्थ एवढाच की भविष्य हे ‘ई-बुक्स’चे आणि ‘इंटरनेट सेल’चे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.