आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डनची सदाहरित गाथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘विम्बल्डनच्या हिरवळीवरून’ हे पुस्तक माझ्या हाती पडणार, याच कल्पनेने माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्यात भर होती ती नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन 2013ची. आणि लंडनला तब्बल 77 वर्षांनी लाभलेल्या अँडी मरी या नव्या चॅम्पियनची. जर ‘टेनिस’ हा भूगोल विषय असेल तर केदार लेले यांनी त्याच्या प्रत्येक अक्षांश व रेखांशावर असलेले बिंदू अचूक निवडले आहेत व ते प्रभावीपणे व सहज या पुस्तकातून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवले आहे. टेनिस हा खेळ टीव्हीवर बघायला जितका सोपा आहे अथवा पेपरमध्ये वाचायला जेवढा साधा वाटतो, तसा तो नसून कठीण, तांत्रिक व नियमबद्ध खेळ आहे. हा फरक कदाचित एखाद्या टेनिस खेळाडूलाच जाणवेल, पण तो लेखकाने या पुस्तकात सर्वसामान्यांना समजेल अशा रीतीने वर्णिला आहे.

या पुस्तकाच्या सुरुवातीलाच टेनिस खेळाचे बारकावे, सखोल अभ्यास करून काढलेली निरीक्षणे वाचायला मिळतात. विम्बल्डनची गाथा किती महान व मानाची आहे, हे प्रत्येक प्रकरणामधून ठासून सांगितले आहे. पुस्तकामध्ये प्रमुख व अतिशय मान्यवर, प्रसिद्ध खेळाडूंचे वर्णन खूप छान केले आहे. नुसत्याच त्यांच्या जन्म अथवा प्रसिद्धीच्या तारखा न देता त्यांची खेळाची शैली, त्यांचे एका व्यावसायिक खेळाडूमध्ये होणारे रूपांतर व त्यांनी गाठलेली उच्च शिखरे अतिशय सुंदर सांगितली आहेत.

टेनिस हा विषय तसा किचकट आहे. त्यातले बारकावे व खेळाडूंची वैशिष्ट्ये या दोन्ही गोष्टी केदार लेले यांनी व्यवस्थित समजावून सांगितल्या आहेत. हे पुस्तक वाचताना काही गोष्टी राहून गेल्यात, असेही वाटते. किंबहुना लेखकाने ज्या सखोलतेने वर्णन केले आहे, ते वाचून या गोष्टींवर का प्रकाश टाकला नाही, याचा प्रश्न पडतो.

सर्वात प्रथम असे लिहावेसे वाटते, की विम्बल्डनने 125 वर्षे पूर्ण केली व इंग्रजांनी त्यातली 60 वर्षे भारतावर राज्य केले. तर मग टेनिस हा विषय त्यांनी भारतात का बरं आणला नाही किंवा केदार लेले यांच्यासारख्या सखोल अभ्यासकाला याविषयी काय वाटते, हे जाणून घ्यायची उत्सुकता नक्कीच आहे. या विषयावर लेले यांची काही टिप्पणी नक्कीच मनातल्या काही प्रश्नांना स्पर्शून गेली असती.

याचबरोबर टेनिस हा एक जरी खेळ असला, तरी त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेलासुद्धा हातभार लागतो. उदा. पर्यटन. एवढेच नव्हे तर टेनिस हा जागतिक खेळ आहे व तो जगातल्या सर्व वर्णाच्या लोकांना एकाच धाग्यात गुंफतो व त्यांना या खेळाचीच भाषा बोलायला भाग पाडतो, तेही वर्णभेद विसरून.


बलाढ्य देशांसमोरही अनेक उग्र समस्या आ वासून उभ्या आहेत. पहिल्या व दुस-या महायुद्धामध्ये बलाढ्य राष्ट्रांची सर्वात जास्त हानी झाली होती. तरी टेनिस या विषयावरचे प्रेम, त्या खेळाचा उच्च दर्जा, लोकप्रियता, प्राइज मनी वाढतच गेली. हे सर्व होत असताना या देशांनी काय रणनीती अवलंबली, याचा उल्लेख केदार यासारख्या सखोल अभ्यासकाकडून अपेक्षित आहे, असे वाटते.

टेनिस या खेळावर केदार लेले यांचे निस्सीम प्रेम आहे. लोकांना टेनिस खेळाबद्दल केवळ माहितीच नव्हे तर एक प्रकारचे आकर्षण वाटावे व त्यांनी या खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान देण्याची प्रेरणा त्यांना मिळावी, असे लेखकाला वाटत असावे. त्याच दृष्टीने लेले यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
भारतीय खेळाडूंची माहिती जरी या पुस्तकात सांगितली असली तरी त्यांनी आपल्या स्वत:च्या देशासाठी हा खेळ का विकसित केला नाही, याबद्दल प्रश्न अनुत्तरित राहतात. टेनिस या खेळाला आपल्या देशात फर्स्ट करिअर म्हणून बघायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त करावीशी वाटते.
indiantennisholidays@gmail.com


पुस्तकाचे नाव - विम्बल्डनच्या हिरवळीवरून
लेखक - केदार लेले
प्रकाशक - ईश्वरी प्रकाशन
पृष्ठसंख्या - 227
मूल्य - 300 रुपये