आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाहक स्वकथन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत देवगावकर या तरुण पत्रकाराचं ‘पाणउतारा’ हे स्वकथन नुकतंच प्रकाशित झालं आहे. हे पुस्तक जेव्हा हाती आलं तेव्हा पुस्तकाचं नाव काय ठेवावं, हेसुद्धा लेखकाला कळू नये, असा व्यवस्थाशरण प्रश्न पहिल्यांदा मनात उभा राहिला. तरीही कोणी कोणाचा पाणउतारा केला हे समजून घेतलं पाहिजे, म्हणून वाचत गेलो आणि यातनांच्या कहाण्यांनी लडबडलेल्या बागेची ही सफर अस्वस्थ करून गेली.

बीड जिल्ह्यातल्या देवगाव या गावातील भारत नावाच्या तरुणाचीच नाही तर त्याच्या कुटुंबाची ही कथा. तत्कालीन महारातही गोसावी होते, हे वाचत असताना लक्षात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचं वादळ बीड जिल्ह्यात उशिरा पोहोचलं आणि त्यानं तिथेही जन्म दिला विद्रोहाला. या गोसावी घराण्यानं आपल्याकडची पोथ्यांची बाडं नदीत नेऊन बुडवली. गावकीची कामं भाईबंदांना बंद करायला लावून गावाची नाराजी ओढवून घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका’ हा मूलमंत्र आपल्या अनुयायांना दिला. मुलांना शिकवण्याची चढाओढ सुरू झाली. शाळा विठ्ठल-रुखमाईच्या देवळात भरत असल्यानं अस्पृश्य मुलांना शाळेत यायला बंदी होती. गावात एक महार मास्तर शाळेत आला आणि गावातल्या महार मुलांना शाळेचे दरवाजे उघडले. मास्तर महार आहे म्हणून शाळा मंदिरातून गाईच्या गोठ्यात हलवली गेली. मास्तरला गावात कुणी घर देत नाही, म्हणून महारवाड्यात राहावं लागतं. महार मास्तर ही कल्पनाच गावच्या लोकांना सहन होत नाही. मास्तरची गावातून बदली केली जाते. महार मास्तरची बदली झाल्यावर गावात नवीन ब्राह्मण शिक्षक येतो. शाळा परत मंदिरात येते. भारत शाळेत का येत नाही याची चौकशी हा ब्राह्मण शिक्षक करतो, तेव्हा गावातल्या जातीयतेची कल्पना त्याला मुलं करून देतात. गुरुजी गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांचं मन वळवतो आणि भारतचा शाळेचा रस्ता मोकळा होतो. शिक्षणासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी भारतने ठेवली होती. शाळा दुपारची असली तर दुपारपर्यंत काचपत्रा विकायचा आणि दुपारी शाळेला जायचं. एस. टी. तिकिटाला पैसे नाहीत म्हणून तो कंडक्टरची नजर जाणार नाही याची दक्षता घ्यायचा. बापानं तर अक्षरश: भीक मागून पोराच्या शिक्षणासाठी पै पै गोळा केली.

एसएससीच्या परीक्षेचा फॉर्म भरायला पैसे नव्हते तर भालेराव नावाच्या सरांनी चाळीस रुपये दिले, तेव्हा परीक्षेला बसता आले. भारतच नव्हे तर अख्खी शाळा इंग्रजीत नापास झाली. त्या वर्षी मंगेश म्हसकर हा दहावीला पहिला आला होता. आॅक्टोबरला परत एसएससीला बसून तो पास होतो.

औरंगाबादच्या नागसेन वनातील आंबेडकर महाविद्यालयात तो अकरावीला दाखल झाला. त्या वेळी प्रसिद्ध साहित्यिक प्र. ई. सोनकांबळे महाविद्यालयाचे प्राचार्य होते. बारावीनंतर प्रवासाच्या त्रासाखातर कॉलेज बदलून तो विवेकानंद कॉलेजला आला. ज्या इंग्रजीत एसएससीला नापास झाला होता, तोच विषय त्याने बी.ए.ला घेतला आणि जेमतेम का होईना पास झाला. दरम्यान, एसवायबीएला असतानाच आईबापानं गळ घालून त्याचं लग्न करून दिलं होतं...
बी.ए. झाल्यावर त्याची चार-पाच वर्षे वाया गेली. भारतनं आता जर्नलिझम करायचं ठरवलं होते. विद्यापीठात नंबर न लागल्यानं तो निराश झाला, पण खचला नाही. त्याने आपली कैफियत उत्तम साळवे या भारतीय दलित पँथरच्या कार्यकर्त्याला सांगितली आणि त्याच्या प्रयत्नातून एमजीएम वृत्तपत्र महाविद्यालयात अवघे पाचशे रुपये भरून प्रवेश मिळवला.

पत्रकारिता करायची तर ग्रामीण भागात संधी नाही, म्हणून तो मुंबईत येतो. इथे नातेवाईक असतानाही तो कुणाकडे न जाता दादरच्या स्मशानभूमीत लाकड वाहायचं काम करतो; आणि काही दिवस तिथेच राहतो. आपल्या ईप्सिताचा शोध घेत राहतो...

या स्वकथनाचे नाव ‘पाणउतारा’ असे लेखकाने का ठेवले असावे, प्रश्न सुरुवातीलाच नोंदवला होता. पण स्वकथन वाचून संपते तेव्हा इथली व्यवस्थाच माणसाचा पाणउतारा करायला भाग पाडणारी आहे, हे लक्षात यायला वेळ लागत नाही.

योग्यता असणा-यांचाही फक्त विशिष्ट जातीचा म्हणून पाणउतारा कसा केला जातो, हे यातून समजून येते. या स्वकथनातून प्रथमच बाबरी पतन, अब्दुल कलाम यांच्यावेळची राष्‍ट्रपती निवडणूक, पाकचा दहशतवादी हल्ला, असे समग्र समाजजीवनावर प्रभाव टाकणारे देशातील काही ठळक पण महत्त्वाचे प्रश्न लेखकाने अधारेखित केले आहेत. मुंबईतल्या सिद्धार्थ विहारचं वातावरणही लेखकाने प्रभावीपणे रेखाटलं आहे. औरंगाबादेत असताना वडलांना शासकीय रुग्णालयात दाखल केलेलं आहे. त्या रुग्णालयात भेटलेल्या अनाथ नर्सची-अंजली दोडकेची कहाणी तर अत्यंत करुण आहे. आणि तिने त्याला ओळखपाळख नसताना खोलीवर आणणे, खाऊपिऊ घालणे आणि सोडायला जाताना केलेली लग्नाची विनंती हा सारा प्रसंग अत्यंत करुण आहे.

या स्वकथनाच्या निमित्ताने वृत्तपत्रांतून होणारे शोषणही लेखकाने समाजासमोर आणले आहे. एखाद्याचा बाहेर मोठा नावलौकिक असतो, ती व्यक्ती समाजाला शोषणरहित समाजाचे तत्त्वज्ञान सांगत असते, त्याच्याविषयी समाजात आदरभाव असतो; पण हीच व्यक्ती शोषणकर्ती असून भांडवलशहा व त्याच्यात काही फरक नाही असे कळते, तेव्हा माणसाचा भ्रमनिरास होतो.

मराठवाड्यानं प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणींचे पक्षी’, रुस्तुम अचलखांब यांचे ‘गावकी’, शरणकुमार लिंबाळे यांचे ‘अक्करमाशी’ अशी अनेक महत्त्वपूर्ण स्वकथने मराठीला बहाल केली आहेत. मराठी वाङ्मयात त्यांचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. त्यात पत्रकार भारत देवगावकर यांच्या स्वकथनाची भर पडली आहे. औरंगाबादसारख्या चळवळीच्या केंद्रात राहूनही लेखकाने मराठवाडा नामांतरासारख्या प्रश्नासंबंधीचं तत्कालीन जनमानस आणि बाबरी पतन काळातील वातावरण विस्तारानं मांडायला हवं होतं. ते झालं असतं तर हे स्वकथन चळवळीचा दस्तऐवज ठरलं असतं.
पुस्तकाचे नाव - पाणउतारा
लेखक - भारत देवगावकर
प्रकाशक - आयडिया पब्लिकेशन
पृष्ठसंख्या - 120
मूल्य - 130 रुपये