आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकथेची पुरचुंडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परी गं परी ही बालकथेची छोटीशी पुरचुंडी आहे. मंगला अवलगावकर यांनी बालकथारूपी जीवनभर पुरणारी शिदोरीच दिली आहे असं म्हणावंसं वाटतं. विविध नीतिमूल्यांनी भरलेल्या या चौदा गोष्टी बालकाच्या जीवनात निश्चितच प्रेरक ठरतील याची खात्री वाटते.

‘परी गं परी’ या कथागुच्छातील प्रत्येक फूल पूर्णत: विकसित, सुगंधित व नीतिमूल्यांनी ओतप्रोत भरलेले आहे. विषयभिन्नता आली तरी छोट्यांच्या गळी उतरण्यास लावलेले नीतितत्त्व मुलांना आकर्षक व कुतूहलास्पद आहे. पहिली कथा फकीर सेनापतीची आहे. राजाचा व सैन्याचा आत्मविश्वास वाढविणारा राजाचा फकीर मित्र सर्वांनाच गोडी लावणारा आहे. ‘वाघोबाची फजिती’ ही कथा जंगलाचे वातावरण निर्माण करते. जंगलचे नियम सर्वांनीच पाळले पाहिजेत. निसर्ग प्रत्येकाला नियमाने जगायला शिकवतो.

छोट्या दोस्तांना आवडणारे परी विश्व फार सुंदर आहे. कल्पनेच्या भरार्‍यांत परी राज्यात प्रवेश करणारा छोटासा राजू व त्याचे तेथील अनुभव मुलांना आवडणारे आहेत. विविधांगांची उधळण करीत लेखिकेने येथे मुलांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ‘चाणाक्ष पारू’ या कथेत एकदम वास्तववादी चित्रण आहे. शेतकरी व त्याची मेहनती मुलगी दुष्ट सावकाराच्या कट-कारस्थानाचा हुशारीने कसा मुकाबला करतात ते सांगितले आहे. गोष्टींची, मालिकांची आणि तीही चढत्या कमानीत असल्यामुळे खूप मजा आली आहे. प्रत्येक गोष्ट नावीन्यपूर्ण, मनोरंजक व कोणता न कोणता संदेश देणारी आहे व सहजतेने आपल्या उद्देशाप्रत पोहोचणारी आहे. प्रत्येक कथा ही परिपूर्णतेच्या मार्गाने वाटचाल करीत असल्यामुळे कुठेही रटाळपणाचा येथे लवलेशही नाही. पुढच्या कथेचे औत्सुक्य कायम ठेवून पहिली कथा संपते. एक छान, मुलांना हवंहवंसं त्यांच्या भावविश्वातलं-मनातल पुस्तकं असं म्हणता येईल.

पुस्तकाचे नाव : परी गं परी
लेखिका : मंगला अवलगावकर