आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Book Review By Avdhoot Paralkar, Divya Marathi, Rasik

पुस्तक परीक्षण : नव्या पिढीची भाषा मांडणारा कथासंग्रह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ या गणेश मतकरी लिखित कथासंग्रहाची नवता द्विभाषिक प्रयोगापुरती मर्यादित नाही. मतकरींनी हाताळलेल्या संवेदना मराठी साहित्याला अनोख्या आहेत.
आमच्या घरापासून आठ-दहा मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवर एक प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे. दर आषाढीला तिथं जत्रा असते. जत्रा म्हणजे रेग्युलर गावाबिवाला असते ना तशी. खाण्यापिण्याचे, फुटकळ खेळण्याचे स्टॉल्स... रँडमली उडणारे साबणाचे फुगे, जायंट व्हील आणि तोबा गर्दी... शहराचा शहरनेस पुसून टाकणारी... ट्रस्ट मी, इट्स क्रेझी आणि केऑटिक... नॉट टू मेन्शन अ‍ॅब्सर्ड. मुंबईसारख्या न्यूयॉर्क आणि हाँगकाँगशी कम्पीट करणार्‍या मेजर मेट्रोच्या मध्यभागी, दादरसारख्या भागात अशी गाववाली जत्रा असावी इज अनबिलिव्हेबल.’

गणेश मतकरी यांच्या ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ या कथासंग्रहातला हा मजकूर. मतकरी यांनी आपल्या कथांतून वापरलेल्या भाषेचा नमुना या परिच्छेदातून आपल्या समोर यावा. ही भाषा हा या पुस्तकाचा दोष नाही, तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हा प्रयोग अनुभवताना भाऊ पाध्ये यांच्या चाळीस वर्षांपूर्वीच्या ‘वासुनाका’ची आठवण होते, ज्यात त्यांनी नाक्यावरच्या तरुणांची भाषा वापरली होती. आजकाल पुण्या-मुंबईच्या शहरी मध्यमवर्गी तरुण वर्गात बोलली जाणारी ही द्विभाषिक भाषा मराठी साहित्यात आजवर इतक्या सजगपणे कोणी वापरलेली नाही. संग्रहात या भाषेचे तुकडे सर्वत्र विखुरलेले आहेत. या कथासंग्रहाची नवता या भाषेपुरती मर्यादित नाही. या कथासंग्रहातून मतकरींनी हाताळलेलं तरुण व्यावसायिकांचं जग, त्यांचे परस्परांशी चाललेले संवाद, त्यांच्या म्हणून म्हणता येतील अशा लहानसहान संवेदना हे सारे मराठी साहित्याला अनोखे आहे. मतकरींच्या कथासंग्रहातील कथांची निवेदनशैली सरळमार्गी आहे. आठवणींच्या निमित्तानं अधनंमधनं फ्लॅशबॅक येत राहतात तेवढेच. लेखकाला त्यातून जे सांगायचं आहे ते तितकंसं सरळ नाही. त्यात बराच गुंता आहे. मतकरींना एकच एक गोष्ट किंवा सूत्र या कथांमधून सांगायचं नाहीये. जे सांगायचं आहे ते सांगता सांगता त्यांना आजच्या तरुणांमधल्या व्यावसायिक स्पर्धा, व्यावसायिक नाती, त्यातले गुंते यांचा माहोलही उभा करायचा आहे.

आजचा वाचकवर्ग पन्नाशीच्या घरातला आहे. ज्या पर्यावरणात या कथांमधले प्रसंग आकाराला येतात, ते पर्यावरण या वयातल्या मराठी वाचकाला बरंचसं अपरिचित आहे. वाचायला सुरुवात केल्यावर वाचक चटकन या जगाशी आणि त्यातल्या बर्‍या-वाईट घटना, संवेदनांशी समरस होऊन जाईल, ही शक्यता या संग्रहाबाबतीत कठीण वाटते. कथा म्हणावी असे जे काही तपशील वाचकाच्या हाताला लागतात, त्यात खिळवून ठेवणारं असं काही नाही. ज्याला आपण नाट्य आणि संघर्ष म्हणतो, त्या स्वरूपाचं नाट्य आणि संघर्ष इथं नाही. या कथासंग्रहातल्या प्रत्येक कथेत इतकी व्यामिश्रता आहे की कथासूत्र स्पष्टपणे मांडणं मुश्कील व्हावं. विशिष्ट परिणाम साधण्यासाठी, आशय नेमकेपणानं वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखकलोक कथेची जी चातुर्यपूर्वक रचना करतात, तशी ती इथं आढळत नाही. आजच्या तरुणांच्या जीवन-व्यवहारातच जो विस्कळीतपणा आहे तो कथेच्या मांडणीत आहे. कथेतल्या प्रसंगांना व्यावसायिक पार्श्वभूमी आहे. आर्किटेक्ट व्यवसायातल्या लहानमोठ्या स्पर्धा, त्यातून निर्माण झालेले हेवेदावे यांचं वर्णन कथांत वाचायला मिळतं. या व्यवसायातील गैरव्यवहारांचं अस्पष्ट दर्शनदेखील या कथांतून अधनंमधनं घडत राहतं. दर्शन अस्पष्ट असण्याचं कारण हा गैरकारभार वाचकांसमोर यावा म्हणून काही हे लिखाण केलेलं नाही. सर्व काही कथेच्या अनुषंगानं समोर येतं. लेखकानं केलेला व्यावसायिक परिभाषेचा अतिरिक्त वापर काही वाचकांना तापदायक वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तो कुठेही उपरा वा अनावश्यक वाटत नाही. वेगवेगळ्या पात्रांची दहा आत्मकथनं लेखकानं आपल्यासमोर ठेवली आहेत खरी; पण या पात्रांना वेगळे स्वभाव, वेगळा पिंड देण्यासाठी लेखकानं विशेष परिश्रम घेतल्याचं जाणवत नाही. सर्व पात्रं बव्हंशी एकाच सुरात बोलताना आढळतात. पात्रांच्या स्वभावदर्शनासाठी सातत्यानं व्यावसायिक पार्श्वभूमी वापरल्यानं त्यांचे परिचय व्यावसायिक पातळीवरल्या त्यांच्या वर्तनाशी निगडित आहेत. या मर्यादेमुळे त्यांची पूर्ण व्यक्तिमत्त्वे साकारली जात नाहीत. निवेदकाचे त्यांच्याशी असलेले संबंध उडते आहेत. काही चुटपुट घटनांतून व्यक्तींच्या स्वभावाचा अंदाज येऊ शकत नाही. पण या सहप्रवाशांकडे वाचकांनी फार सखोलपणे पाहावं, अशी लेखकाचीच इच्छा नसावी. कादंबरीप्रमाणे कथा या वाङ्मय प्रकाराकडून पात्रांच्या समग्र व्यक्तिदर्शनाची अपेक्षा करणंही बरोबर नाही. व्यवसायातल्या पेचप्रसंगातून आणि कामातील योगदानामधून निवेदकाची आपल्या सहकार्‍यांबद्दल जी इंप्रेशन्स तयार होतात, ती इथं पाहायला मिळतात. कथांमध्ये याला असाधारण महत्त्व आहे. कारण कथांमधले तणाव, पात्रांमधली जवळीक, दुरावा, ताटातूट, एकमेकांविषयीची अढी, त्यातून जन्मलेलं अवघडलेपण आणि अबोला सारं व्यवसायातल्या लहानसहान हालचाली आणि घटनांतून निर्माण झालेलं. गणेश मतकरींच्या ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ या लेखन प्रयत्नाचा हा गाभा आहे, हे एकदा समजलं की कथांमधल्या आशयसूत्रातील गुंता सोडवणारी किल्लीच हाताशी लागते. मतकरींच्या कथेत कुटुंब नाहीच आहे. आणि जो समाज आहे त्या समाजाचं वर्तुळ खूप लहान आहे. मतकरी आपलं कथाविश्व सहसा त्या वर्तुळाबाहेर जाऊ देत नाहीत. काही अपवाद अर्थातच ‘भारद्वाज’सारख्या कथांमध्ये आहेत. हे सर्व ओझरतं असलं तरी त्यानं या आणि अशा इतर अनेक व्यवसायांतल्या बेफिकीर वृत्तीवर आवश्यक भाष्यं होऊन जातं.

या पुस्तकापुरतं बोलायचं तर या बाहेरील विश्वाच्या या निसटत्या उल्लेखानं या व्यावसायिक मंडळींच्या व्यावसायिक, भावनिक समस्या किरकोळ आणि उथळ वाटायला लागतात. आजकालची पिढी ज्या विश्वात वावरत आहे, त्या विश्वामधल्या उथळ आधुनिक संस्कृतीचं दर्शन घडवणं हेही या लेखनप्रपंचाचं एक उद्दिष्ट, कदाचित उप-उद्दिष्ट असल्याचं यातून स्पष्ट होतं. आजच्या करिअर केंद्रानं तरुणांचं विश्व झपाट्यानं दिशाहीन आणि मूल्यहीन बनत चाललं आहे, याचा विषण्ण करून सोडणारा प्रत्यय पुस्तकात अनेक जागी येत राहतो. ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ हा अनेक अर्थानं गणेश मतकरींचा मराठी साहित्यातला अभिनव प्रयोग आहे.

awdhooot@gmail.com
पुस्तक : खिडक्या अर्ध्या उघड्या
लेखक : गणेश मतकरी
प्रकाशक : समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या : 158
मूल्य : 150 रु.