आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुस्तक परीक्षण: बालपणीचा आनंदगोफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपलब्ध पर्यावरणातून आनंदाबरोबरच चैत­न्याचा लाभ कसा होऊ शकतो, मन निसर्गपूजक कसे बनू शकते, यासाठी हे पुस्तक शालेय मुलांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्याचे बालपण सभोवतालच्या वातावरणाशी संवादी झाले आहे तो आशावादी, उत्साही होतोच, हा संदेश उषा परब लिखित ‘उच्च्यूऽऽ माच्च्यूऽऽ’ या पुस्तकाने दिला आहे. एकदा हे पुस्तक हातात घेतले की, वाचून पूर्ण झाल्याशिवाय वाचक ते ठेवणार नाही, एवढी खिळवून ठेवण्याची ताकद यामध्ये आहे..

उषा परब यांचे ‘उच्च्यूऽऽ माच्च्यूऽऽ’ हे अथर्व प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेले पुस्तक म्हणजे समृद्ध बालपणाचा आलेख आहे. एकदा हे पुस्तक हातात घेतले की, वाचून पूर्ण झाल्याशिवाय वाचक ते ठेवणार नाही, एवढी खिळवून ठेवण्याची ताकद यामध्ये आहे.
पुस्तकातील १९ लेखांमध्ये लेखिकेने आपल्या बालपणातील विविध प्रसंग चित्रित केले आहेत. गोव्यातील मोपा हे गाव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इ­सुली हा या लेखनाचा परीघ आहे. बालपणातील मित्र, मैत्रिणी, घर, भावंडे, सण, खेळ, खोड्या, फजिती याभोवती कथाबीजे गुंफली आहेत. कोकणातील हिरवागार निसर्ग सोबतीला आहे. एवढे मिळाल्यावर हरक्षणी आनंदात जगायचे, हाच काय तो ध्यास. ह्या ध्यासापोटी निसर्गाच्या अंगाखांद्यावर अक्षरशः हुंदडणाऱ्या लेखिकेचे बालपण हेवा वाटण्याजोगे आहे. असे वाटते की, आपण त्या वेळी तिच्या मित्रमंडळीत असतो तर हे सारे अमृतक्षण आपल्याही वाट्याला आले असते.
उच्च्यूऽऽ माच्च्यूऽऽ हा एक खेळ आहे. लपाछपी हे त्याचे स्वरूप. प्रदेशानुसार खेळाचीही नावे बदलतात. पण आपण कुणाला सापडू नये, म्हणून बेब्याच्या घरातील तांब्याच्या हंड्यात लेखिका लपते आणि नंतर बाहेर पडणे कठीण होऊन जाते. हे वर्णन वाचताना खेळातली गाणीही मन लुभवणारी आहेत.
कुंभाराची मडकी..
मडकीत माती..
मातीत मेला किडा..
कुठे आम्ही लपलोय..
शोधून काढा..
आणि हरल्यानंतरचा विजयो­न्मादही गाण्यातूनच पण प्रश्नाेत्तर स्वरूपात व्यक्त होतो.
कोंबडी का लोंबडी हरली?
बेब्या म्हणते हरली
शेणाची टोपली भरली?
बेब्या म्हणते भरली
डोक्यावर घेऊन चालली?
बेब्या म्हणते चालली...
या विविध खेळांमधून जीवनाचा अनुभव बालमन घेते जणू. ‘दिवसरात्र’ हा खेळ या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बालमन किती कल्पक असते, त्याचा हा नमुना आहे. इथेही बेब्या आहेच. खिडकीचा दरवाजा कमी अधिक उघडझाप करीत हा खेळ सुरू होतो. खिडकी पूर्ण बंद होते तशी रात्र होते आणि बेब्या म्हणते, दमले गं बाई शेतात काम करून आणि सर्व जण रात्र झाली म्हणून झोपतात व खोटे खोटे घोरतातही. सूर्य झालेली लेखिका थोड्या वेळाने खिडकीचे दार किंचित उघडते, तशी होते पहाट. कुणी तरी कोंबड्याची बांग देते. मग झाडलोट, सडासारवण, पाणी भरणे, चूल पेटवणे अशी मोठ्या माणसांसारखी कामे करताना खेळातली आई झालेली सर्वांची काळजी घेते, स्वयंपाक करते, त्यासाठी नारळाच्या करवंट्यांची होतात पातेली, वाट्या आणि झाडांची पाने ही ताटं. एक गुळाचा खडा, थोडं खोबरं, चवळीचे दाणे एवढ्या या भातुकलीच्या खेळात सणही साजरा होतो. पुढील जीवनात येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा हा जणू सरावच. एका खिडकीचा सूर्य करून मनसोक्त आनंद देणारा हा खेळ खरंच सुंदर आहे.
इ­सुलीच्या बारा वाड्यांतून लेखिकेचे बालपण आकारले आहे. कुडवाचे टेंब, सावंताचे टेंब, डोबाची शेळ, गावठण, पागावाडी, विलवडे, कोंडवाडा, क्षेत्रफळ अशी एकेक मजेदार नावे, शाळेत जाता येता करवंद खात एकमेकांच्या खोड्या काढत घर गाठणं, पटकोळणीची फुलं गोळा करणं, पावसात इ­सुलीच्या पुलावरून पुराचं पाणी पाहणं हे लेखिकेचे बालपणातले एक थ्रील आहे. कोकणातल्या सणांचा एक वेगळा बाज आहे. दिवाळीत घरोघरी होणारे भाताचे पोहे, नरकासूर समजून पायाने भल्या पहाटे कारठीनाच्या वेलीचे कारटं फोडणं, सातीवनाच्या सालीचा कडू रस पिण्याचा कार्यक्रम, बैलांना सजविणे, आंबोळ्यांचे जेवण आणि गोठ्यात लहान मुलांना बांधलेला वाडा याला पु­न्हा एक प्रादेशिक किनार आहे. हा वाडा बनविणे म्हणजेच जीवनाचे आकलन. माणसे घर बांधताना जशी आवश्यक सामग्री गोळा करतात, तशीच ही एक मोठी जबाबदारी लहान मुले आनंदाने घेतात. त्याची पूर्वतयारीही करतात. लेखिकेने बनवलेला वाडा विलोभनीय आहे व कोकणातले ग्रामजीवनच इथे साकारले म्हणूनच इथे गुरे राखणारा असतो, त्याच्या डोक्यावरचा काट्यांचा भाराही येतो. मला वाटते, बालपण म्हणजे पर्यावरण शिक्षण. खेळातून साकारणारे भविष्यकालीन जीवन, वाड्याला केळीच्या पानातला नैवेद्य म्हणजे पर्यावरणविषयीची कृतज्ञता.
बालपण किती प्रसंगावधानी असतं, त्याचेही दाखले इथे मिळतात. खेळात रमलेले बालमन अभ्यासाचा कंटाळाच करणार. पण हातात पट्टी घेऊन कमलताई अभ्यास घेऊ लागते तेव्हा -
आज तारीख किती?
कालच्या पुढची.
काल किती होती?
आजच्या आधीची.
या उत्तराने अभ्यास घेणारा शिक्षा करतोच, पण बालबुद्धीचा वेगही स्पष्ट होतो. रक्तबंबाळ झाल्याचं सोंग करताना गंधाच्या बाटलीतले रक्त उपयोगी पडते. चोरी पकडली जाताच आई-दादाची घेतलेली शपथ, अशी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी वापरलेली कौशल्ये वाचकाला थेट आपल्या बालपणात नेऊन पोहोचवतात. मासे पकडणे, गावची जत्रा, दशावतारी नाटकातला संकासूर, झाडावरून पडलेला आंबा खाण्यातली मजा, उधार घेतलेले चणे, भूकंपाच्या अनुभवाने मनात भीतीने मांडलेले ठाण, काजूबिया भाजणे, सायकल शिकण्यातला आनंद अशा अनेक मजेदार आठवणींचा हा खजिना आहे.

dr.tarujabhosale@gmail.com
उच्च्यूऽऽ माच्च्यूऽऽ
- लेखिका - उषा परब
- प्रकाशक - अथर्व प्रकाशन, कोल्हापूर
- पृष्ठ संख्या - १६४ - किंमत - रु. १९०/-