भगवान निळे केवळ छंद म्हणून कविता लिहीत नाही, काव्यप्रतिभा ही दैवी देणगी आहे असे मानत नाही, क्रांती घडवून आणण्यासाठी विशिष्ट पोज घेऊन कविता लिहीत नाही, कारण त्याचं जगणं म्हणजेच आहे, एक रोखठोक कविता, जी स्पष्ट बोलते आणि विचार करायला भागही पाडते...
भगवान निळे हा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आणि एक थेट कवी म्हणून परिचयाचा आहे. जवळजवळ तीस वर्षांहून अधिक काळ तो सातत्याने कवितालेखन करतो आहे. ‘सांगायलाच हवंय, असं नाही’ हा त्याचा पहिला कवितासंग्रह. जगणं म्हणून कविता लिहिणारा भगवान निळे केवळ छंद म्हणून कविता लिहीत नाही, काव्यप्रतिभा ही दैवी देणगी आहे असोे मानत नाही, क्रांती घडवून आणण्यासाठी विशिष्ट पोज घेऊन कविता लिहीत नाही, स्वान्तसुखासाठी कवितेच्या नादाला लागत नाही आणि दु:खाचे भांडवल म्हणूनही तो कविता लिहीत नाही. कारण त्याचं जगणं म्हणजेच आहे एक रोखठोक कविता, जी स्पष्ट बोलते आणि विचार करायला भागही पाडते...
माझ्या गप्प बसण्याचाही होतो आवाज,
कुणाचीही झोप उडविण्यापुरता...
असं भगवान
आपल्या एका कवितेमध्ये लिहून जातो आणि मला वाटतं, आपल्या कवितेच्या ताकदीविषयी तो न बोलताही सांगत राहतो. तिच्याबद्दल वेगळं काही सांगायलाच हवंय, असं त्याला वाटत नाही आणि जेव्हा आपण त्याची कविता वाचत जातो, तेव्हा आपणही याच निष्कर्षापाशी येऊन थांबतो.
जगण्याच्या धावपळीत पावलापावलावर फरफट झाली, जगण्याचे मोल देऊन अनुभव गाठीला बांधले, खरे-खोटे, आपले-परके आपसूकच नाळ जुळत गेली, तुटतही गेली आणि शहाणपणाच्या शाळेत धडे गिरवता गिरवता आयुष्य संपून गेले, असा अनुभव गाठीला बांधून जगण्याचे संचित नाही, तर जगण्यापासून वंचित असलेल्यांची वेदना मांडणारी कविता म्हणूनही भगवानची कविता वेगळी वाटत जाते. तो स्वत:बद्दल लिहिताना म्हणतो, कविता ही माझी आत्मकथाच आहे. आणि ही त्याची आत्मकथा मग सर्वांच्या वेदनेची रुपककथा होऊन जाते.
शहाणपणाला नसते वय...
पण ते येईपर्यंत आयुष्य संपून गेलेले असते...
स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि या नात्यामधली अनवट अशी गूढता हा भगवानच्या कवितेचा आणखी एक विशेष म्हणावा लागेल. ही कविता मांडताना, एक कवी म्हणून भगवानच्या शब्दातून झिरपत राहणारी आश्वासकता आपल्याला हळुवारपणे कुशीत घेत जाते. एखाद्या लहानग्याला आईने पदराखाली घ्यावे, तितक्याच असोशीने भगवानची शब्दकळा अशी कविता लिहिताना अजून अधिक नितळ होत जाताना दिसते.
अजूनही वेळ गेलेली नाही
तुला अजूनही माझी आई होता येईल
अन् मला तुझं बाळ...
यासारख्या अनेक कवितांमधून भगवान स्त्रीच्या अंतरंगात डोकावताना दिसतो आणि त्याच्या आतली आश्वासक हाक निर्व्याजपणे मांडताना दिसतो.
नर आणि मादी हा तर अनादी गोंधळ, असे मानणारा भगवान. पुरुषाच्या आत लपलेल्या नराचे चित्रण अतिशय कठोरपणे करताना दिसतो. खरं तर ही अस्सल बाईपणाची कविता; पण ही कविता लिहिताना, भगवानच्या आत वावटळत असलेली एक बाई साक्षात समोर येऊन उभी राहते आणि माणसाच्या पुरुषीपणावर आसूड ओढत जाते. ही कविता लिहिताना भगवानच्या शब्दांना विलक्षण धार येते, आणि वाचणाऱ्याच्या मनावर ओरखडे उठत जातात.
लग्न झाल्यावर पुरुष बाईलाच दार बंद करायला सांगून
भाग पाडतो बायको बनायला वेळी-अवेळी
पुरुष सळसळतो, तेव्हा बनतो किनारा नसलेला समुद्र
तर बाईच्या आत हरेक कोपऱ्यात
दडून बसलेली असते गर्दी
त्यामुळे जगाला उंबरठ्याबाहेर ठेवणे जमत नाही तिला
आरस्पानी बाई शोधता शोधता
मी पाहिलेय
अनेक पुरुषांच्या डोळ्यात फक्त बाईचं विडंबन...
भगवान खेड्यातून शहरात आला, तोही थेट झोपडपट्टीतल्या वस्तीत. याच झोपडपट्टीत मी खऱ्या अर्थानं माणसं पारखायला आणि वाचायला शिकलो, असं त्यानं लिहून ठेवलं आहे. झोपडीच्या लाकडाच्या फटींमधून मला खरं जग दिसलं, अनुभवायला मिळालं... असंही त्यानं लिहिलं आहे. आजही त्याचा एक पाय भूतकाळात आहे, वरळीच्या मायानगरच्या झोपडपट्टीत आहे, त्याच्या जन्मगावात आहे आणि खेडेगाव ते शहरातली झोपडपट्टी आणि तिथून मग वेल फर्निश्ड फ्लॅट असा प्रवास मांडताना आजही त्याला लहानपणीचा पाऊस अस्वस्थ करतो. पावसाळा नकोसा वाटतो आजही त्याला. कारण बाबांचा आईसकांडी विकायचा धंदा होता. पाऊस सुरू व्हायचा आणि हा धंदा बंद व्हायचा आणि त्याबरोबरच चूलही थंड व्हायची, हा अनुभव त्याने घेतला आहे. आजही त्या थंड चुलीची धग त्याचे आतडे पिळवटून टाकते.
आजही,
दहा-बारा भिंतींच्या माझ्या तटबंदी घरात
पाऊस सुरू होताच मी लावून घेतो दारे-खिडक्या
अन् आठवतो, झोपडीच्या छतातून गळणारा पाऊस
पावसाच्या भीतीचा खिळा
दिवसेंदिवस अधिकच रुतत चाललाय काळजात.
भगवान कविता लिहीत नाही तर ती सहज लिहिली जाते. तो फक्त माध्यम म्हणून पेन हातात धरतो, असे वाटत जाते.
बाबा, आई, मुलगा, मुलगी यांच्याशी असलेली त्याची नाळ आणि तिचा घट्ट पीळ दाखणाऱ्या कविताही या संग्रहात क्रमाक्रमानं समोर येत जातात आणि एक मुलगा, नवरा आणि बाप म्हणून भूमिका निभावत असताना त्याची होणारी तगमग आपल्यासमोर येत जाते.
‘थेट अनुभवाला भिडणारी अभिव्यक्ती, स्वच्छ प्रतिमा विरहित शब्दकळा, विशेषत: स्त्रीच्या करुणामय अस्तित्वाची पारदर्शक ठसठसणारी नस पकडण्याची अद्भुत किमया ही भगवान निळे यांच्या कवितांची अस्सल सारिणी आहे.
वीणा तर निनादते आहे, नि विनाकारण शब्द तडफडतात समेवर, अशा आभासांची मूर्त लकेर काळजाला चिरत जाते.
मी खूप अस्वस्थ होतो, त्याच्या कविता वाचताना...’ असे कविवर्य प्रा. अशोक बागवे यांनी भगवानच्या या संग्रहाबद्दल बोलताना नमूद केले आहे.
खूप काही लिहिलं, बोललं गेलं त्याच्या कवितांबद्दल; तरीही दशांगुळे उरणारी भगवानची कविता म्हणूनच मला वाटते, सर्वार्थाने उजवी ठरत जाते आणि म्हणून या कवितेबद्दल मुद्दामहून काही सांगायलाच हवंय, असं वाटत नाही...
कवितासंग्रहाची निर्मिती उत्तम आहे आणि सतीश भावसार यांचं मुखपृष्ठही छान आशय व्यक्त करताना दिसत राहतं. एका अप्रतिम कवितेच्या मी शोधात आहे. मरणापूर्वी अशी एखादी कविता लिहायची आहे, जी कित्येक वर्षं माझ्यानंतरही जिवंत असेल, असे भगवानने म्हटले आहे. मला वाटते, प्रत्येक कवीची ती आस असते. भगवानला त्या कवितेची हाक स्पष्ट ऐकू येते आहे, हे सांगायलाच हवंय, असं काही नाही...
सांगायलाच हवंय, असं नाही
कवी : भगवान निळे, प्रकाशक : सृजन प्रकाशन, नवी मुंबई
मुखपृष्ठ : सतीश भावसार, किंमत : ~ १२०/-
satishsolankurkar@gmail.com