आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडवलशाही लालसेचा व्यापक पट (मनोगत)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गिरण्यांची मालक मंडळी बॅ. अंतुले यांच्या विरोधात गेली होती. त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात ते एक ठळक कारण ठरलं. त्याचं लॉबिंग कसं झालं, हे या कादंबरीत तुम्हाला पहिल्यांदाच वाचायला मिळेल.
इंग्रजांच्या काळापासून आपल्याकडे कामगारांना बऱ्यापैकी संरक्षण होतं. पण, १९९१च्या उदारीकरणाच्या धोरणानंतर कामगार कायद्यात सैलपणा आला. त्याचा फायदा घेत गिरणी मालकांनी चालू गिरण्यांमध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना आणली. त्यासाठी कामगारांना मोठ्या रकमांची आमिषं दाखवण्यात आली. पण प्रत्यक्षात झालं काय? कामगारांना नोकरी सोडताना रकमा मिळाल्याच नाहीत. मालकांनी दिलेले चेक वटलेच नाहीत. अशा पद्धतीने गिरणगावातून या कामगारांना अक्षरश: हुसकावण्यात आलं. गिरणगावचा हा उभाआडवा ऱ्हास, या कादंबरीचा गाभा आहे.

साधारण पंधरा वर्षांपूर्वी या कादंबरीची दिवंगत कवी नारायण सुर्वे यांच्याशी मी चर्चा केली होती. फ्रेंच कादंबरीकार व्हिक्टर ह्युगो याची ‘ला मिझरेबल’ कलाकृती जशी गाजली, तशी तुमची गिरणगावची कादंबरी ऐतिहासिक ठरेल, असे तेव्हा सुर्वे मला म्हणाले होते. गिरणगावच्या विषयावर दोनशे पाने लिहू शकलो तरी चिक्कार, असं माझं सुरुवातीचं मत होतं. पण, कादंबरीची
साधनं जमवायला सुरुवात केली, तसतसा लिखाणाचा पट विस्तारत गेला.

मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेर्ले गावचा, पण माझी नाळ गिरणगावशी जोडली होती. माझे वडील, दोन काका गिरणी कामगार होते. माझ्या गावातला घरटी एक माणूस त्या वेळी गिरणीत होता. शिकायला मी गावाकडं होतो, तरी वर्षातले चार महिने मी डिलाईल रोड, लालबागला मुंबईत असायचो. मुंबईतल्या लाल बावट्याची ताकद, कॉ म्रेड डांगे यांच्या सभा मी पाहिल्या, ऐकल्या होत्या. गिरणगावशी माझा असा सांधा जुळला होता, त्यामुळे ते वातावरण चितारणं मला फार कठीणं गेलं नाही. आमचं घराणं मूळचं शेतकरी कामगार पक्षाचं. लाल बावट्याची, डांगेंच्या चळवळीची कितीतरी गाणी माझ्या आईच्या, चुलतीच्या ओठावर असायची. मला ती अजूनही आठवतात.

या कादंबरीच्या निमित्ताने अण्णाभाऊंच्या लावण्या, गाणी मी पुन्हा वाचली. लिखित साधनं जाणीवपूर्वक धुंडाळली. कारण, हा काळ अगदी नजीकचा असला तरी तो इतिहासच आहे. त्या इतिहासाशी कादंबरीकार म्हणून आपण प्रामाणिक राहायला पाहिजे, असं माझं मत आहे. ते मी यापूर्वीच्या कादंबऱ्यांतसुद्धा पाळत आलो आहे. प्र. के. अत्र्यांच्या ‘नवयुग’, ‘मराठा’चे जुने अंक चाळले. कम्युनिस्ट पक्षाच्या ‘युगांतर’ साप्ताहिकाचे त्या वेळचे अंक पाहिले. डच इतिहासकारांचं मुंबईबाबतचं संशोधन वाचलं. अगदी चंदावरकर यांच्यापासून ते अलीकडच्या जयंत पवार यांच्यापर्यंतचं गिरणगावाचं जे काही म्हणून आहे, ते सारं वाचून काढलं. अनेक गिरणी मालकांना भेटलो. कामगार नेते दत्ता इस्वलकर, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, गिरणी कामगारांचे नेते दत्ता सामंतांचे बंधू दादा सामंत यांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या. अनेक संस्थांनी जमा केलेल्या वर्तमानपत्राच्या जुन्या कात्रणांचे संग्रह चाळले. त्यासाठी अगदी बेंगळुरुपर्यंत गेलो. विधिमंडळातील आमदारांची भाषणे वाचली. अशा प्रकारे या कादंबरीसाठी मी चार वर्षे खर्ची घातली.

या कादंबरीत तीन मुख्यमंत्री आहेत, कित्येक गँगस्टर आहेत, अनेक मिल मालक आहेत, ठळक सर्व कामगार नेते आहेत. अक्षरश: शेकडो पात्रं आहेत. तुम्ही ही पात्रं नाव बदलली असली तरी सहज ओळखू शकाल, अशी आहेत. मी महसूल खात्यात अनेक वर्षं काम केलं आहे. त्यामुळे गिरण्यांच्या जमिनीवरील एफएसआय (चटई क्षेत्र) अिधक मिळवण्यासाठी मंत्रालयात काय काय झालं, याची माहिती घेणं अवघड गेलं नाही. गिरण्यांच्या सौद्यात गँगस्टर कसे आले, त्यांचा उदय कसा झाला, त्यांची कार्यपद्धती, याची माहिती मला २६/११च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या इन्स्पेक्टर विजय साळसकरांकडून मिळाली. तो माझा जवळचा मित्र होता. मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना गिरणी कामगारांविषयी अधिक ममत्व होतं. त्यामुळे गिरण्यांची मालक मंडळी अंतुले यांच्या विरोधात गेली होती. त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात ते एक ठळक कारणं ठरलं. त्याचं लॉबिंग कसं झालं, हे या कादंबरीत तुम्हाला पहिल्यांदाच वाचायला मिळेल.
१९८२चा गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने झाला. तो संप बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने फोडला, असा एक प्रवाद आहे. पण, ही साधनं वाचून माझी नक्की खात्री झाली आहे, शिवसेनेत तेव्हा संप फोडण्याइतपत ताकद नव्हती. हां.... त्या वेळच्या राज्य सरकारने मात्र संप फोडण्यासाठी हरतऱ्हेने आपलं बळ वापरलं होतं. अगदी गुंडसुद्धा त्यासाठी तुरुंगातून सोडले होते. खरं तर गिरण्यांच्या जमिनी या सरकारच्या मालकीच्या. पुढे त्यावर गिरणी मालकांनी आपली नावं चढवली. डीसी रुलमध्ये बदल केले गेले. हे सारं मी या कादंबरीत मुळापासून रेखाटलं आहे.

कामगारांचा संप फुटण्यास कारण ठरले ते बदली कामगार. त्या वेळी मुंबईत सुमारे ७० हजार बदली कामगार होते. पर्मनंट होण्यासाठी त्यांची चाललेली धडपड, त्यांचं उपऱ्यासारखं जगणं... यात मी टिपलं आहे. संपाच्या काळात एक पोलिस इन्स्पेक्टर गिरणी मालकाचे जावई होते. गिरणीतला माल काढायला त्यांची मदत घेतली जात असे. गिरणगावातल्या त्या ऐतिहासिक संपाबाबत या कादंबरीत मी ठोस निष्कर्ष काढले आहेत. ते इतरांपेक्षा वेगळे आहेत...आिण धक्कादायकसुद्धा.

गिरणगावचं १९८२ ते २००८ या काळाचं संक्रमण या कादंबरीत दिसतं. गिरणगावचा संप ते गिरणगावची विक्री... या काळाभोवती ही कादंबरी फिरते. साध्या, सामान्य माणसाची सार्वत्रिक फसवणूक कशी झाली, त्यांची ही कहाणी आहे. गिरणगावची हीच तर भळभळती जखम आहे. कामगारांच्या ग्रॅच्युअटी कशा ढापल्या, पगार कसे बुडवले, अनेक दशके इमानेइतबारे केलेल्या पाळ्यांचे रेकॉर्ड मालकांनी कसं गटारात फेकलं, हे सारं मी बेधडकपणे कादंबरीत मांडलं आहे.

मी राजहंस प्रकाशनाचा लेखक आहे. राजहंसच्या अमृतमहोत्सवानिमित्त मला खास कलाकृती लिहायची होती. त्यासाठी मी ‘लस्ट फॉर लालबाग’चा प्रोजेक्ट हाती घेतला. हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला अपेक्षेपेक्षा बराच उशीर झाला. पण कादंबरी मनासारखी उतरल्याचा आनंद काही औरच आहे. डॉ . सदानंद बोरसे यांनी या कादंबरीचं संपादन केलं आहे. नोव्हेंबर महिन्यात ही कादंबरी सर्वत्र उपलब्ध होईल.

आनंदाची गोष्ट म्हणजे, व्हिक्टोरिया काळात जशी कादंबरीत चित्रे असत, तसा प्रयोग यात आम्ही केला आहे. अन्वर हुसेन या चित्रकाराच्या चित्रांनी कादंबरी आणखी उंचीवर नेऊन ठेवली आहे. अन्वर हा इस्लामपूरचा तरुण चित्रकार आहे. सुरेख चित्रे काढतो. सुमारे ५०पेक्षा अिधक चित्रे आम्ही या कादंबरीत वापरली आहेत. वाचकांना गिरणगावचं वातावरण अनुभवायला, ती चित्रे नक्कीच मदत करतील.

एकंदर ६४ कापड गिरण्या, त्यांची ६०० एकर जमीन, त्यातून उभा राहणारा १४ हजार कोटी रुपयांचा एफएसआय, त्यासाठी सुरू असलेला जीवघेणा संघर्ष आिण त्यामध्ये अडीच लाख कामगारांची झालेली ससेहोलपट, याचं महाभारत ‘लस्ट फॉर लालबाग’मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल! माझ्या प्रत्येक कादंबरीला वाचकांचा अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद लाभला आहे. मला खात्री आहे, ‘लस्ट फॉर लालबाग’ कादंबरीचंसुद्धा वाचक असंच स्वागत करतील!
- शब्दांकन : अशोक अडसूळ
authorvishwaspatil@gmail.com