आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Book Review Of An Uncertain Glory (India And Its Constitution)

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या 'अस्थिर वैभवा'ची परखड मीमांसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन सध्या त्यांनी केलेल्या उलटसुलट विधानांमुळे बरेच चर्चेत आहेत. जगभर मान्यता पावलेले ते भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत व अनेक विषयांचे तज्ज्ञ आहेत.

देशात नियोजन आयोगाच्या गरिबीच्या पुन्हा नव्याने केलेल्या व्याख्येमुळे आणि त्यावर काँग्र्रेसच्या ‘बुद्धिमान’ नेत्यांनी केलेल्या हास्यापद भाष्यामुळे राजकारणात व सामाजिक क्षेत्रात एकच गदारोळ माजलेला दिसतोय.

या पार्श्वभूमीवर अत्यंत ताजे असे हे पुस्तक, याच विषयांना वाहिलेले असल्याने मी त्याची ओळख वाचकांना करून देत आहे. दोन्हीही लेखक आपापल्या क्षेत्रातील मानलेले दिग्गज आहेत. ज्यॉ द्रेझ हे फे्रंच वंशाचे जरी असले तरी ते गेली 30-35 वर्षे भारतात राहत आहेत. आधी ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठित संस्थेत शिकवायचे व नंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या भारतातील नावाजलेच्या शिक्षण संस्थेशी जोडले गेले. ते एक समाजशास्त्रज्ञ आहेत व आर्थिक मागासलेपण, अन्न सुरक्षा तसेच भारतातील शिक्षणव्यवस्था यावर त्यांचे मुबलक प्रमाणात लेखन आहे.

दोन्हीही मान्यवर लेखकांनी मिळून याआधीसुद्धा पुस्तके लिहिली आहेत आणि त्या त्या क्षेत्रात ती खूप गाजली. हे पुस्तकही त्याच श्रेणीत बसते व यावरही बरीच चर्चा लगेचच सुरू झाली आहे.

भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, परंतु त्याचबरोबर राष्टÑ स्वतंत्र होऊन अनेक दशके लोटल्यावरही गरिबी, वाढत चाललेला बकालपणा, ग्रामीण भागात स्वच्छतागृहांचा अभाव, आरोग्यसेवेच्या नावाने चाललेला खेळखंडोबा व कोट्यवधी रुपये खर्च केल्यावरही हवे तसे ‘फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर’ व ‘सोशल इन्फ्रास्ट्रक्चर’ नसणे आदी विषयांवर हे पुस्तक केंद्रित आहे. यात एकूणच व्यवस्थेवर प्रहार केले गेले आहेत.

लेखक पहिल्यांदाच स्पष्ट करतात की, जगात चीनबरोबर भारताची तुलना गेली काही वर्षे करण्यात येत आहे. स्वत: द्रेझ व सेनही अनेक प्रकारची आकडेवारी समोर आणत हे सांगण्याचा प्रयत्न करतात की, आपली अर्थव्यवस्था सध्या डळमळीत असली आणि विकासदर कमी (5 टक्के) असतानासुद्धा जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांपेक्षा भारत सुस्थितीत आहे आणि जगात दुसºया क्रमांकावर आहे.

उज्ज्वल (आर्थिक) भविष्य किंवा अभिमान वाटेल अशी परिस्थिती भारतात असूनसुद्धा त्याबद्दल संशयाचे किंवा अस्थिरतेचे वातावरण आहे. कारण अत्यंत पायाभूत बदलसुद्धा भारतात अजून झालेले नाहीत. मुख्यत्वे गतिशील, परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत प्रगती आणि सहज शक्य असणारे बदल देशाची गरज आहे. त्यात महिलांची आणि गरिबांची जास्त दखल घेण्याची आवश्यकता आहे.

लेखक दोन घटनांची उदाहरणे पुस्तकात वेगवेगळ्या संदर्भात वारंवार देतात व भारताच्या उणिवांवर नेमके बोट ठेवतात. एक म्हणजे, मागील वर्षी डिसेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या व अत्यंत चीड आणणाºया बलात्काराबद्दल व त्याआधी जुलै 2012मध्ये अचानक खंडित झालेल्या देशातील वीजपुरवठ्याबद्दल, ज्याने पूर्ण भारताला अंधकारात ढकलून दिले होते. लेखकांना सखेद आश्चर्य व दु:ख वाटते की, असे कसे घडू शकते?
पुस्तक एकूण दहा प्रकरणांमध्ये विभागलेले आहे आणि दिल्लीतील मध्यवर्ती सरकार, राज्यांतील सरकार व ढिम्म बसलेले प्रशासन यामुळे हा देश कसा प्रगत देश होऊ शकला नाही, हे समजावण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकातून केलेला आहे. हा विषय तसा स्तुत्यच आहे आणि जरी या विषयावर इतर अनेक लेखकांनी वेळोवेळी लिहिलेले असले तरी जागतिक पातळीच्या मान्यवर लेखकांचा दृष्टिकोन वेगळाच असतो आणि तो जागोजागी या पुस्तकातून डोकावतो.
लेखकांची ही जोडी तशी ‘अ-भारतीय’ अशीच मानावी लागेल. कारण ज्यॉ द्रेझ यांनी भारतीय नागरिकत्व 2002मध्ये स्वीकारले आणि सेन जरी भारतीय असले तरी ते गेली अनेक वर्षे भारताच्या बाहेरच राहून अध्ययन व ग्रंथलेखनाचे काम करत होते. बरीच वर्षे हार्वर्ड या विख्यात विद्यापीठात त्यांनी शिक्षणकार्य केले. दोन्हीही लेखकांनी विविध संशोधन व दाखले देत जगातील पुढारलेल्या अर्थव्यवस्थांची व देशांची तुलना भारताशी केली आहे.

ब्राझील 1960 ते 1970 या दशकात फार झपाट्याने प्रगती करणारा देश होता, परंतु सामाजिक पातळीवर-शिक्षण, वैद्यकीय व्यवस्था, कुपोषण वगैरेंमुळे बराच मागासलेलाही होता. परंतु पुढे जाऊन ब्राझील बदलला व त्याने आपली धोरणे सर्वसमावेशक केली आणि फक्त श्रीमंतीकडे जाण्याच्या मार्गावरून थोडे वेगळे वळण घेतले. ब्राझीलची तुलना दक्षिण कोरियाच्या प्रगती साधण्याच्या पद्धतशीर मार्गाशी करत ब्राझीलची प्रशंसा केली आहे; परंतु भारत हा चार-पाच दशके जुन्या ब्राझीलच्या मार्गावर आहे आणि बदललेल्या ब्राझीलकडून काही शिकला नाही तर फक्त ‘उद्देशहीन श्रीमंती’कडेच पावले उचलत आहे, जेणेकरून ‘अस्थिर वैभवा’कडे त्याची वाटचाल चालू राहील, जे धोक्याचे ठरू शकेल, असे लेखक सूचित करतात.

भारतातील सशक्त लोकशाही मूल्यांची वाखाणणी करताना सेन व दे्रझ बांगलादेशचे उदाहरण देतात की, आमच्या शेजारी देशाने आमच्यापेक्षा अनेक सामाजिक क्षेत्रांतील उणिवा भरून काढल्या व देशातील सगळ्या घटकांचा धोरणे बनवताना विचार केला-जसे जीवनमानाचा दर्जा, मुलांचे लसीकरण, बालमृत्यूदर, मुलींचे शिक्षण वगैरे.

पुस्तकात भारतातील न संपणाºया भ्रष्टाचाराबद्दल विस्ताराने लिहिण्यात आले आहे, आणि भीती व्यक्त करण्यात आली आहे, की यामुळे पैशाकडे पैसा जाताना दिसतो, धोरणे बदलली जातात व गरिबांना ज्या मूलभूत सुविधा हव्या त्या मिळत नाहीत. भारतातील आरोग्य क्षेत्रावरही प्राधान्याने लक्ष देण्याची गरज लेखक एका पूर्ण वेगळ्या प्रकरणातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात.

हे पुस्तक अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व त्यांचे आर्थिक विषयांवरचे किंवा धोरणतज्ज्ञ डॉ. माँटेकसिंग अहलुवालिया यांनी निश्चित वाचण्याची
गरज आहे. राजकारण, वैश्विक धोरणे तसेच अर्थशास्त्र या विषयांमध्ये गोडी असणाºयांनी तर निश्चित वाचावा असा हा ताजा ग्रंथ आहे.

*पुस्तकाचे नाव : अ‍ॅन अनसर्टन ग्लोरी
(इंडिया अँड इट्स काँट्रॅडिक्शन)
*लेखक : ज्यॉ द्रेझ व अमर्त्य सेन
*प्रकाशक : पेंग्विन
*पाने : 434
*किंमत : 699 रुपये
abhilash@dainikbhaskargroup.com