आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Book Review Of Milute Aani Rasal Bye Dr.Anand Nadkarni

आनंददायी वाचनानुभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साचे आणि मवाळ।
मितुले आणि रसाळ॥
शब्द जरी कल्लोळ। अमृताचे॥
या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीनुसार ‘मितुले आणि रसाळ’ या डॉ. आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाची मांडणी आहे. मितुले म्हणजे ‘मोजकेच’. पण त्यामध्ये भावनांचा रसाळपणा हवा; तरच ही जोडी प्रभावी ठरेल, असे ज्ञानेश्वर म्हणतात.

डॉ. आनंद नाडकर्णी हे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील एक नामवंत तज्ज्ञ व ठाणे येथील इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या संस्थेचे संचालक. डॉ. नाडकर्णींचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, संवेदनक्षमता, जगण्याबद्दलची आस्था, व्यापक अनुभव यामुळे हे पुस्तक वाचकांना एक आगळी अनुभूती देणारे आहे. साहित्य-इतिहास-तत्त्वज्ञान अशा विविध विषयांना स्पर्श करणारे, पण तरीही ललित अंगाने जाणारे सहजसोपे लेखन ही डॉ. नाडकर्णींच्या लेखनाची खासियत. वेगवेगळे दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके, वर्तमानपत्रे, स्मृतिग्रंथ यांमध्ये पूर्वप्रसिद्ध झालेले हे लेख असले तरी ते पुस्तकरूपाने एकत्रित नव्याने वाचणे अधिक आनंददायी आहे.
‘फर्डा वक्ता ते प्रांजळ निरूपण : एक प्रवास’, ‘एका कवितेची गोष्ट’, ‘लेखनइमारतीचे कॉलम’, ‘जगण्याचा छंद’ या लेखांमध्ये डॉक्टरांनी आपल्या वैयक्तिक जडणघडणीतले अनुभव, घटना रंजकपणे मांडल्या आहेत. ‘जगण्याचा छंद’मध्ये छंदाविषयी डॉक्टर लिहितात, ‘छंद म्हणजे वर्तनाची अशी सवय, हळूहळू कर्माला अकर्माकडे नेईल. त्यामुळे तुमचा तणाव कमी होईल, तुम्हीच स्वत:चे समाधान निर्माण कराल. खरे तर ही साद लहानपणापासून आपल्या सार्‍यांना ऐकू येत असते. माझ्या आदिछंदाची साद... त्याला प्रतिसाद कसा द्यायचा ते आपल्यावर असते. आणि काही प्रमाणात आपल्या आजूबाजूच्या जवळच्या लोकांवरही... वास्तवाला देवत्वाचा नितळ, आरस्पानी स्पर्श म्हणजे छंद!’
‘आयपीएच’तर्फे राबविण्यात येणारा ‘वेध व्यवसाय प्रबोधन परिषद’ हा वार्षिक उपक्रम. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना भविष्याची दिशा दाखवणारा. विविध क्षेत्रांतल्या ‘रोल मॉडेल्स’ बरोबर मुक्त संवादाची संधी देणारा. ठाण्यामध्ये बावीस वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आता महाराष्ट्रातल्या सहा शहरांमध्ये पसरला आहे. या परिषदेविषयी डॉक्टरांनी लिहिलेले लेख वाचून या परिषदेची व्याप्ती आणि वाढती लोकप्रियता आकळते.

‘सिनेमा बघणे’ ते ‘सिनेमा अनेक अंगांनी अनुभवणे’ हा प्रवास व्यक्तीमधली भावनिक समज जागी करतो. मानसिक आरोग्याच्या जाणीव-जागृतीसाठी ‘आयपीएच’च्या माध्यम विभागातर्फे ‘मनतरंग’ हा मानसिक आरोग्यविषयक चित्रपट महोत्सव आयोजित केला गेला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. तारे जमीं पर, लक्ष्य, चक दे इंडिया, लगान, थ्री इडियट्स अशा चित्रपटांमधली दृश्ये ‘टेन्शनचे नियोजन’ या सूत्राभोवती गुंफून घेतलेले दोन-अडीच तासांचे सत्र अधिक प्रभावी होऊ लागले... ‘फिल्म अ‍ॅप्रिसिएशन-माध्यम साक्षरता’ या लेखात डॉक्टर सांगतात.

दिवंगत आयपीएस हेमंत करकरे यांच्याशी डॉक्टरांची दाट मैत्री. सामाजिक भान जपणार्‍या या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांविषयी ‘माझा उमदा मित्र’ या लेखामध्ये डॉ. नाडकर्णी म्हणतात, ‘गेल्या वीस वर्षांमध्ये आमच्या गप्पांच्या मैफली खूप जमायच्या. बर्‍याच वेळा इतर मित्रमंडळीही असायची. पण कधी-कधी आम्ही दोघेच बसायचो. एकमेकांच्या आयुष्यावर ‘रिफ्लेक्ट’ करायला, एकमेकांच्या विचार भावनांचे आरसे बनून... ही आमच्या दोस्तीची अगदी खासगी वीण. त्याची ओढ आम्हा दोघांनाही असायची.’ मुंबई पोलिस, आयपीएच आणि स्त्री मुक्ती संघटना यांनी कुमारवयीन मुला-मुलींसाठी सुरू केलेला ‘जिज्ञासा’ प्रकल्प असो; ‘ड्रग फाइट एटीनाइन’ हा जनजागरण कार्यक्रम असो; वा नाक्यावर जमणार्‍या, रोजंदारी करणार्‍या तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवणारा ‘एहसास’ हा जाणीव-जागृती प्रकल्प असो; हेमंत करकरे एक कार्यकर्ता म्हणून त्यात सहभागी असत.

‘माझी आई-मैत्रीण’ या लेखात डॉ. नाडकर्णींनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या डॉ. अनिल आणि सुनंदा अवचट या दांपत्याविषयी, विशेषत: सुनंदा अवचट यांच्याविषयी अतिशय आपलेपणाने लिहिले आहे. सुनंदा अवचट यांचे निधन झाल्यानंतर ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये लिहिलेला हा लेख आहे.

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करताना, समुपदेशन करताना, शिबिरे-कार्यशाळा घेताना आलेले अनुभव, घडलेल्या घटना डॉक्टरांनी या लेखांमधून सांगितल्या आहेत. ‘सांगितल्या’ आहेत म्हणजे त्या वाचताना डॉक्टर आपल्याशी बोलताहेत असाच भास होतो. कारण ‘जिज्ञासा’ प्रकल्पाच्या निमित्ताने मला डॉक्टरांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली आहे. त्यांची ओघवती, सोपी, मिश्किल भाषाशैली, कविता म्हणणे, यामुळे त्यांचे भाषण वा सत्र कितीही वेळाचे असले तरी कंटाळवाणे होत नाही. त्याचाच पुन:प्रत्यय हे पुस्तक वाचताना आला.

एकूण 21 लेखांचा हा संग्रह अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी केले आहे. पीळ घातलेल्या दोरीवरून चालणारा तरुण मध्ये असलेली गाठ पार करून आत्मविश्वासाने पुढे जात आहे, असे चित्र आहे. जीवनाच्या दोरीलाही कधी-कधी अशा गाठी बसतात, त्या अलगद पार करून पुढे जावे, हे संबोधित करणारे.
पुस्तकातील संदर्भानुसार चेन्नईला झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ. मोहन आगाशे डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याविषयी बोलताना म्हणाले होते, ‘हा आनंद म्हणजे एक ऑप्टिशियन आहे... त्याने दिलेला चश्मा लावला की समोरचे स्पष्ट दिसायला लागते. मग तो काच बदलतो, तर आता आधी न दिसणारी ओळही दिसायला लागते...’
mayekarpr@gmail.com

> मितुले आणि रसाळ
> डॉ. आनंद नाडकर्णी
> अक्षर प्रकाशन
> मूल्य रु. 150/-
> पृष्ठे 151