आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवधनुष्य पेलणारा शिवनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा उदय ही मध्ययुगीन महाराष्ट्रातील आमूलाग्र बदल घडविणारी घटना होती. सर्वत्र परकीय सत्तेचा बहारीचा काळ असतानाही आपल्या कर्तव्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे, ही एक क्रांतिकारक घटना होती. म्हणूनच शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे ठरले. ते गोरगरिबांचे उद्धारकर्ते व कैवारी होते. त्यामुळे महाराजांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रजेची तयारी होती. महाराजांनी स्थापन केलेले राज्य रयतेला आपले राज्य वाटत होते. त्यांचा प्रभाव आजही मराठी मनामनावर प्रकर्षाने दिसून येतो.

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा अनेक कादंबर्‍या, चित्रपट, नाटक व मालिकांमधून घेण्यात आलेला आहे. सोलापूरचे कवी मुबारक शेख यांनी ‘शिवनामा’तून चितारलेले काव्यात्मक शिवचरित्र वाचनीय आहे. प्रत्येक कवितेतून प्रसंगानुरूप शिवचरित्र उलगडत जाते.

छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या राजवटीत जेवढा स्त्रियांचा सन्मान केला, तितका क्वचितच एखाद्या राजाने केलेला असेल. शिवरायांनी जे अजोड कार्य केले ते स्वसामर्थ्यावर केले. एखाद्या राजाचा वारसदार म्हणून ते जन्माला आले नाहीत. त्यांनी लोकहिताची कामे केली. प्रजेची अनिष्ट प्रथांतून सुटका केली. त्यामुळे त्यांना रयतेचा संपूर्ण पाठिंबा मिळत गेला.

‘शिवनामा’मधील निरनिराळ्या छंदातील कविता जितक्या सहज सुंदर उतरल्या
आहेत तितकीच मुबारक शेख यांनी लिहिलेली गीतेही अप्रतिम आहेत.
उदाहरणादाखल हे मुखडे पाहा-
महाराष्ट्राची शान शिवराय
अमुचा जीव की प्राण शिवराय।।
रत्नांचा रत्न शिवरत्न माझा शिवराया
जगावरती त्यांच्या कर्तृत्वाची छाया।।
शिवरायांच्या पराक्रमाची महती सांगे माती
कणाकणातून निनादे जय जय छत्रपती।।

राज्याभिषेक, अष्टप्रधान या कविता तर कवीने अतिशय चित्रमय शैलीत लििहलेल्या आहेत. या कविता वाचताना तत्कालीन सारे प्रसंग, संदर्भ डोळ्यांसमोर तरळत राहतात. या कवितांचे आकृतिबंधही निराळ्या धाटणीचे आहेत. या कविता दीर्घकाळ स्मरणात राहणार्‍या आहेत.

कवीने महाराजांशी केलेला ‘मुक्त संवाद’ अंतर्मुख करायला लावणारा आहे. शिवाजी महाराज हा एकच विषय असला तरी कुठेही एकसुरीपणा येऊ न देता महाराजांच्या पराक्रमाचे विविध पैलू उलगडून दाखविण्यात कवी
पुष्कळ अंशी यशस्वी झालेला आहे, असेच म्हणावे लागेल.

कवीची इितहासावर असलेली मजबूत पकड ‘शिवनामा’ वाचताना पानोपानी जाणवत राहते. कवितेच्या आशयानुरूप राजशेखर पाटील यांनी काढलेली चित्रेही आकर्षक, समर्थक आहेत. नादसौंदर्य, छंदसौंदर्य, आशयसौंदर्य या तिन्ही पातळ्यांवर ‘शिवनामा’ पुरेपूर उतरला आहे.
शिवनामा
कवी : मुबारक शेख
प्रकाशक : महाराष्ट्र पब्लिकेशन, सोलापूर
मूल्य : ~ १५०/-
पुस्तक परीक्षण
ओंकार देशपांडे
बातम्या आणखी आहेत...