आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्ट्रगलर- चंदेरी दुनियेतील प्रत्येक कलावंताने उमेदवारीच्या काळात संघर्ष केलेला असतो. कलावंत म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्याच्या प्रवासात अनेक अडथळे येतात, निराशा पदरी पडते, कधी अपमान सहन करावा लागतो. अपेक्षाभंगही होतो. कुणाला मोक्याच्या क्षणी संधी मिळते, चांगला गुरू मिळतो, कुणाचा मदतीचा हात लाभतो. कितीही सेलिब्रेटी कलावंत असला, तरी स्ट्रगल त्याला चुकलेला नसतो. मराठी चित्रसृष्टीतील सेलिब्रेटींनी पूर्वी केलेली तपश्चर्या, घेतलेली मेहनत जगाला कळावी, म्हणून आशिष निनगुरकर यांनी या कलावंतांच्या मुलाखती घेऊन त्यांचा स्ट्रगल पुस्तकरूपात वाचकांसाठी सादर केला आहे. अभिनेते सुनील बर्वे, संदीप कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, श्रेयस तळपदे, मकरंद अनासपुरे, अमृता सुभाष, भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर, मिलिंद शिंदे अशा 20 कलावंतांचे जीवनाभुव वाचकाला अंतर्मुख करतात.
आशिष निनगुरकर,
प्रकाशक - प्रतिभा प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठे - 144, किंमत - 160 रुपये
भारलेली झाडे
1963 ते 2013 या पन्नास वर्षांच्या कालखंडातील कविता असलेला केशव भणगे यांचा हा संग्रह त्यातील वैविध्यामुळे संग्राह्य झाला आहे. या कवितांची निवड करण्याचे काम प्रसिद्ध रेषाचित्रकार श्रीधर अंभोरे यांनी केले आहे. त्यांच्या चित्रानेच मुखपृष्ठ सजले आहे. ‘स्वत:चा आतला आवाज आणि भोवतालचा कोलाहल यांची नोंद जेव्हा कविता घेऊ लागते, तेव्हा केवळ अलिप्तपणे निर्मिती होत नाही, तर तिला स्वत:चे रूपही मिळते. केशव भणगे यांची कविता अशा प्रकारची असून विषय वैविध्यामुळे ती रसिकांना आकर्षित करते. लय हे तिचे प्रधान वैशिष्ट्य असले, तरी उपहास आणि उपरोधाची मांडणी करताना ते मुक्तछंदाचाही प्रत्ययकारी वापर करतात. त्यांच्या चिंतनशीलतेचे नानारंगी पदर अनुभवताना भोवतालच्या राजकारणाचे रंग नर्म विनोदीशैलीत मांडण्याचे त्यांचं कसबही लक्षात येतं,’ असा अभिप्राय समीक्षक प्रा. डॉ. सतीश बडवे यांनी दिला आहे.
कवी केशव भणगे, अहमदनगर
प्रकाशक - आपलं प्रकाशन, पुणे.
पृष्ठे - 80, किंमत - 30 रुपये.
- प्रतिनिधी / अहमदनगर
निवडक राजकीय विचारवंत
या पुस्तकामध्ये 12 पाश्चिमात्य विचारवंत आणि 14 भारतीय विचारवंत यांचे मौलिक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य विचारवंतांमध्ये आय.बर्लिन व जॉन रोल्स यांच्यासारख्या आधुनिक राजकीय विचारवंतांचेही विचार मांडले आहेत. कौटिल्य भारतीय राजनीतीचा महत्त्वपूर्ण धागा असल्याने भारतीय राजकीय विचारप्रणाली कौटिल्याशिवाय अशक्य आहे हा विचार ठेवून लेखकाने कौटिल्याची राजनीती विशद केली आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्यापासून मौलाना आझादपर्यंत निवडक विचारवंतांचे विचार या पुस्तकात सादर केले आहेत. वाचकांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत मांडणी केली आहे. त्यामुळे हे पुस्तक उपयुक्त आणि रोचक आहे.
लेखक : प्रा. आर. ए. पाटील
प्रकाशन : अक्षरबंध प्रकाशन
पृष्ठे : 176, मूल्य : 175 रु.
भारतीय शासन व राजकारण
महाराष्ट्रातील सर्वच अकृषी विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्र या विषयांतर्गत भारतीय शासन व राजकारण हा विषय नेमलेला असतो. मात्र त्याचबरोबर सर्वसामान्य माणसालाही आपल्या देशाविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असते. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून लेखकाने हे पुस्तक लिहिलेले आहे. ब्रिटिश काळातील घटनात्मक परिवर्तनापासून या विषयाची सुरुवात केलेली आहे. एकूण 15 प्रकरणांत विभागलेल्या या पुस्तकात विविध आयोगांविषयीची माहिती, आघाड्यांचे राजकारण आदी बाबींचा मागोवा घेण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तक राजकीय बाबींविषयी कुतूहल शमवणारे ठरते.
लेखक : प्रा. आर. ए. पाटील
प्रकाशन : अक्षरबंध प्रकाशन
पृष्ठे : 216, मूल्य : 175 रु.
- प्रतिनिधी / नाशिक
मर्यादांच्या अंगणात वाढताना
समाजातील स्वत:ला पटलेल्या मार्गावरून चालणारं एक मध्यमवर्गीय तरुण जोडपं लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना पहिली मुलगी होते. तिच्या जन्माचा आनंद साजरा करण्यापूर्वीच डॉक्टर सांगतात, बेटर यू फरगेट द बेबी... बिकॉज शी इज नॉट नॉर्मल...., सदसद्विवेकबुद्धीला जागून निर्णय होतो. मुलगी आमची आहे, आम्ही तिला आहे तशी वाढवू, धक्क्यातून सावरत हळूहळू वस्तुस्थितीचा डोळस स्वीकार होतो. नियतीचं हे दान आव्हान म्हणून घेतलं जातं, स्वत:वर, प्रयत्नांवर आणि माणसांमधल्या चांगुलपणावर विश्वास ठेवून वाटचाल सुरू होते आणि मर्यादांच्या अंगणातही सगळे एकमेकांसोबत आपापल्या अवकाशात वाढत राहतात. विवेक आणि विश्वासाचा हात धरून आपल्या मतिमंद मुलीच्या विकासासाठी दोघांनी मिळून केलेल्या धडपडीची ही कहाणी दोघांनी मिळूनच सांगितली आहे. एका अर्थानं नियतीनं पदरात घातलेल्या एका चिरंतन वेदनेशी, दु:खाशी केलेल्या संघर्षाची ही गोष्ट; पण त्याकडे मागे वळून बघताना कुठेही कटुता नाही, निराशा नाही, नशिबाला दोष देणं नाही. आहे ती फक्त एक समजूत आणि भल्यावरचा विश्वास. म्हणूनच वेदनेची, संघर्षाची असली तरी ती वाचकाला विचारपूर्वक धडपडण्यातल्या आणि त्यातून वाढत, शिकत राहण्यातल्या आनंदाचा प्रत्यय देते.
लेखक : सुजाता लोहकरे, अरुण लोहकरे
प्रकाशन : सुविद्या प्रकाशन, सोलापूर
पृष्ठे : 91, मूल्य : 100 रुपये
पुरनपोयी
रमेश बोरसे यांचा हा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यात एकदोन प्रचारात्मक कविता, गद्याकडे झुकणार् या काही कविता. हे किरकोळ दोष वगळता ही कविता चांगली कविता आहे. प्रासादिकता, विद्रोह, रचनेतील, प्रयोगशीलता, अस्सल अहिराणी शब्दकळा, वाक्प्रचारांची समर्पक योजना, काव्यगत आशयाला असलेले जीवनानुभवाचे अधिष्ठान यासारख्या वैशिष्ट्यांमुळे ही कविता लक्षणीय झाली आहे. पुरनपोयी या कवितेत पुरणपोळी बनवण्याची खास खान्देशी प्रक्रिया पुरणपोळीचे खान्देशी संस्कृतीशी असलेले अतूट नाते, खान्देशची सुगरण अशा अनेक अंगाने ही कविता लक्षणीय आहे, असे प्रस्तावनेत साहित्यिक, विचारवंत प्रा. डॉ. फुला मोतीराम बागूल हे या अहिराणी कवितासंग्रहाबद्दल म्हणतात.
कवी : रमेश बोरसे
प्रकाशन : राऊ प्रकाशन, देवपूर, धुळे.
पृष्ठे : 48, मूल्य : 100 रुपये
श्री कचेश्वर
शोध आणि बोध
जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या कृपापात्र शिष्यपरिवारातील संत श्री कचेश्वर ब्रह्मे हे प्रख्यात वैदिक ब्रह्मे घराण्यातील, चाकण येथील होत. त्यांच्या घराण्यातील वंशज श्री. विलास राजगुरू यांनी सदरची ग्रंथकृती निर्माण करून संत साहित्यामध्ये अतिशय मोलाची भर घातली आहे. संत श्री तुकोबारायांची परंपरा व योग्यता महाराष्ट्रात प्रचार-प्रसारात आणण्यात संत कचेश्वर महाराजांचा मोठा सहभाग आहे. चरित्र व कार्याची माहिती उपलब्ध नव्हती; परंतु राजगुरू यांनी ग्रंथांचे संदर्भ व आधार घेऊन, चांगली ग्रंथनिर्मिती करून, संत कचेश्वरांच्या लौकिक व वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा मागोवा येथे घेतला आहे. सुंदर रंगीत छायाचित्रांनी पुस्तक जिवंत व प्रेक्षणीय, वाचनीय झाले आहे. या ग्रंथाचा संतसाहित्याच्या अभ्यासकांना निश्चितच उपयोग होईल, असे अभिप्रायात संत तुकाराम महाराज अध्यासन पुणे विद्यापीठाचे प्रमुख व प्राध्यापक महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदार महाराज लहवितकर म्हणतात.
लेखक-संकलक : विलास राजगुरू
प्रकाशन : शुभ क्रिएशन, पुणे.
पृष्ठे : 97, मूल्य : 150 रुपये
- प्रतिनिधी / औरंगाबाद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.