Home | Magazine | Rasik | Book Revivew By Ravindra Pokharkar

पुस्तक परीक्षण: 'शोध':एक अद्भूत नि रोमांचक वाचनानुभव

रवीन्द्र पोखरकर | Update - Aug 30, 2015, 12:53 AM IST

स्वराज्याची बांधणी, विस्तार आणि व्यवस्थित घडी बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना विपुल धनाची आवश्यकता होती.

 • Book Revivew By Ravindra Pokharkar
  स्वराज्याची बांधणी, विस्तार आणि व्यवस्थित घडी बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना विपुल धनाची आवश्यकता होती. आताच्या गुजरातमधील सुरत हे त्या काळी मोगलांच्या ताब्यातील एक अतिशय ऐश्वर्यसंपन्न शहर होते. म्हणूनच महाराजांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या धनाढ्य शहराची लूट केली. तीही एकदा नव्हे, तर दोनदा. या लुटीतून स्वराज्यासाठी महाराजांना विपुल धन प्राप्त झाले. यातील पहिली लूट १६६४मध्ये झाली, तर दुसऱ्यांदा १६८०मध्ये. याच दुसऱ्या लुटीचा संदर्भ घेत मुरलीधर खैरनार यांची ‘शोध’ आपल्यासमोर येते. सुरतेच्या पहिल्या लुटीतील सर्व मुद्देमाल सहीसलामत स्वराज्यात नेण्यात महाराजांना यश आलं होतं. मात्र दुसऱ्या लुटीच्या वेळी असं घडलं नाही. सुरत ते स्वराज्याची हद्द या मार्गात अनेक अडथळे उभे करण्यात मोगल शासकांना यश आलं. त्यामुळे या अडथळ्यांवर मात करून लुटीचा बहुमोल खजिना स्वराज्यात सुखरूपपणे पोहोचण्यासाठी महाराजांनी काही योजना आखल्या. त्यानुसार या प्रचंड खजिन्याचे दोन भाग करण्यात आले. आपल्याबरोबर असलेल्या सैन्याची महाराजांनी चार भागांत विभागणी केली.
  आनंदराव मकाजी व गोंदाजी नारो या आपल्या दोन बहाद्दर सरदारांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या मार्गांनी आवश्यक सैन्यासह महाराजांनी या खजिन्याची स्वराज्याच्या दिशेने रवानगी केली. खजिन्याच्या शोधात चाल करून येणाऱ्या मोगल सैन्याला चकवा देण्यासाठी महाराज स्वतः मात्र निवडक सैन्यासह मार्गातच थांबले. यापैकी आनंदराव मकाजींना आपल्या ताब्यातील खजिना सुरक्षितरीत्या स्वराज्यात पोहोचविण्यात यश आलं, मात्र गोंदाजी नारो इतका भाग्यशाली ठरला नाही. सात हजार जनावरांवर लादलेली एक हजार टनापेक्षा अधिक वजनाची प्रचंड लूट गोंदाजीच्या ताब्यात होती, आणि ती त्याला सुरक्षितपणे स्वराज्यात पोहोचवायची होती. मात्र, दुर्दैवाने त्याच्या नियोजित मार्गात मोगल सैनिक आडवे येत गेले आणि त्यांच्याशी लढा देत खजिन्याचे रक्षण करताना गोंदाजीचे बहुसंख्य सैनिक धारातीर्थी पडले. गोंदाजी स्वतःही जबर जखमी झाला. परंतु आपल्या ताब्यातील स्वराज्याचा खजिना मोगलांच्या हाती पडू नये, यासाठी त्याने मग एक जबरदस्त शक्कल लढवली. मात्र त्यानंतर दुर्दैवाने जबर जखमी अवस्थेत, तो मोगलांच्या हाती सापडला.
  लुटीच्या खजिन्याचा एक भाग सुरक्षितरीत्या स्वराज्यात पोहोचला, परंतु दुसऱ्या भागाची जबाबदारी ज्याच्यावर होती, तो गोंदाजी मोगल सैन्याच्या ताब्यात सापडल्याचे वृत्त महाराजांना समजले. त्याला मोगलांनी कुठे नेलेय आणि त्याच्याकडील खजिन्याचे नेमके काय झाले, हे जाणून घेण्याचा महाराजांनी आपल्या हेरांमार्फत प्रयत्न केला. गोंदाजी हाती लागला असला, तरी त्याच्याकडील खजिना मात्र मोगलांना सापडला नाही, हे महाराजांना समजले. पुढे या संदर्भात अधिक काही न समजल्याने मोरोपंत पिंगळेंना खजिन्याच्या शोधासाठी मागे ठेवून महाराजही काही दिवसांनी स्वराज्यात परतले.

  हा या कादंबरीच्या एकूण कथानकातील ऐतिहासिक भाग. मात्र इथून पुढे कथानक अचानक एक मोठी कलाटणी घेऊन वाचकांना धक्का देत थेट वर्तमान काळात येतं आणि १६७० सालापासून ते आजवर प्राप्त होऊ न शकलेल्या त्या प्रचंड बहुमोल खजिन्याचा आजच्या काळातील शोध आपल्याला पुरता गुंतवून टाकतो. गोंदाजीने आपल्या अटकेपूर्वीच आपल्या ताब्यातील खजिना एका दुर्गम ठिकाणी लपवलेला असतो. अटकेत आपल्या मृत्यूपूर्वी त्या संबंधीचा ठावठिकाणा महाराजांना कळावा, म्हणून सांकेतिक भाषेत काही नकाशे तयार करून ते कोठडीतील अन्य एका कैद्यामार्फत महाराजांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली असते. मात्र ते नकाशे महाराजांपर्यंत कधीच पोहोचले नाहीत. त्यामुळे त्या खजिन्याचा शोधही लागला नाही. गोंदाजीचे ते नकाशे महाराजांपर्यंत का पोहोचू शकले नाहीत? मग ते गेले तरी कुठे आणि कसे? कादंबरीतील हा साराच भाग अतिशय रोमहर्षक आहे. खजिन्याचा शोध घेण्याचा महाराजांचा प्रयत्न, त्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांच्या नंतर पेशव्यांचे प्रयत्न, इंग्रजांना या संदर्भात कळल्यानंतर त्यांचे प्रयत्न या सगळ्याची माहिती यात येते.

  अर्थात वर्तमान काळात वाचकांसमोर हे सगळं कथानक उलगडत जातं, तेही अतिशय वेगळ्या आणि नावीन्यपूर्ण पद्धतीने. त्यासाठी ‘उद्धारक समाज’ आणि ‘खोजनार’ यांच्याबरोबरच काही इतिहासप्रेमी आणि आणखी काही पात्रांची रचना अगदी बेमालूम पद्धतीने लेखकाने केलीय. केतकी आणि शौनक हे कथानकाच्या या भागातील नायक आहेत, तर एका वेगळ्या उद्देशाने खजिन्याचा शोध घेत असलेले आबाजी हे खलपुरुष आहेत. या तिघा प्रमुख व्यक्तिरेखांसोबत मग त्यांचे सहकारी, मित्र, मदतनीस, राजकारणी, पोलिस आदी अनेक घटकांचा या कथानकात सहभाग आहे. यातील ‘खोजनार’ हे प्रकरण ज्या पद्धतीने लेखकाने मांडलंय, ते विस्मयचकित करणारे आहे. त्याचप्रमाणे खजिन्याचा शोध घेण्यासाठी आबाजी साहाय्य घेत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जो सविस्तर उल्लेख वेळोवेळी कथानकातून येतो, तो उद‌्बोधक तर आहेच; त्याचबरोबर लेखकाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास, अफाट व्यासंग दर्शविणारादेखील आहे.

  लेखकाचे हेच परिश्रम आणि व्यासंग आपल्याला कादंबरी वाचताना इतरत्रही अनेक ठिकाणी स्पष्टपणे जाणवतात. सुरतपासून ते नाशिक, वणी-दिंडोरी आणि आसपासचा संपूर्ण परिसर, सप्तश्रुंग गड आणि आसपासचे सर्व किल्ले-डोंगर-दऱ्या, या संपूर्ण विस्तीर्ण परिसरातील गावे-वाड्या-वस्त्या, तेथील लोकसंस्कृती, त्यांचे सण-उत्सव या सगळ्याचा लेखकाने अतिशय बारकाईने अभ्यास केलेला आहे. कादंबरीतील जे कथानक मुंबईत आणि ‘क्लारा’च्या निमित्ताने परदेशात घडतं, त्याचीही मांडणी रोमांचक आणि अभ्यासपूर्ण आहे. कथानकाची गरज म्हणूनच खुद्द नाशिक शहरातील जे उल्लेख येतात, तेही असेच आपल्याला आश्चर्यचकित करून टाकणारे आहेत.

  एकीकडे केतकी आणि शौनकमधील हळुवार फुलणारे प्रेम लेखक तितक्याच हळुवारपणे आपल्यासमोर मांडत असताना आपण मोहरून जातो, तर दुसरीकडे आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी आबाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हिंसक कारवाया वाचताना आपल्या अंगावर शहारे येतात. कथानकाच्या ओघात इतिहासाचे जे दाखले लेखकाने दिलेत, ते अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाशिवाय आणि इतिहासाच्या आवडीशिवाय शक्यच नाहीत. मागील अनेक वर्षं या विषयावर आपण काम करीत होतो, असं लेखक मुरलीधर खैरनार यांनी अलीकडच्याच त्यांच्या एका लेखात म्हटलंय. त्याची शब्दशः प्रचिती आपल्याला ही कादंबरी वाचताना येते. विशेषतः अनंत कान्हेरे यांनी ज्यांची हत्या केली, ते नाशिकचे तत्कालीन कलेक्टर Jackson यांच्याविषयीची या कादंबरीत कथानकाच्या ओघात येणारी माहिती आपल्याला चक्रावून टाकते. ज्या ‘शिवमंथकाचा’ शोध घेणे हे केतकीच्या जीवनाचे एकमात्र उद्दिष्ट असते, त्यामागची एकूणच कहाणी आपल्याला अचंबित करून टाकते.

  एकूणच अनेक अर्थांनी ‘शोध’ वेगळी आहे. इतिहास, वर्तमान, मागील काही काळातील देश आणि राज्य पातळीवर घडलेल्या प्रमुख राजकीय-सामाजिक घडामोडी आणि मानवी हव्यास, प्रेम, कर्तव्य भावना, आधुनिक तंत्रज्ञान आदी अनेक बाबींची अतिशय चपखल सांगड घालून मुरलीधर खैरनार यांनी अतिशय परिश्रमपूर्वक ही कादंबरी लिहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून आणलेल्या आणि पुढे अदृश्य झालेल्या त्या अर्ध्या खजिन्याचं नेमकं काय होतं? आबाजींना तो सापडतो का? की केतकी-शौनक त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतात? त्या खजिन्यातील बहुमोल जडजवाहिरांपेक्षाही महाराजांशी संबंधित आणखी काही अतिशय महत्त्वाची माहिती त्यात असते, ती कोणती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ही भन्नाट कादंबरी वाचल्यावरच मिळू शकतील.
  ‘शिवकालातील अस्सल संदर्भ, वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं तरुणाईच्या भाषेत ‘ऑथेंटिक’, ‘अनबिलिव्हेबल’ आणि ‘अनपुट डाउनेबल’, ‘अस्सल मराठी थ्रिलर’ असं जे या कादंबरीचं वर्णन करण्यात येतंय, ते अक्षरशः आणि शब्दशः खरं आहे.

  ravindrapokharkar@gmail.com
  शोध
  >लेखक : मुरलीधर खैरनार
  >प्रकाशक : राजहंस प्रकाशन
  >पृष्ठसंख्या - ४९७
  >किंमत : रु. ५००/-

Trending