आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसमजुतीपलीकडचे गांधीजी...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीजी म्हणजे पुराणमतवादी, गांधीजी म्हणजे विज्ञानाचे शत्रू आणि गांधीजी म्हणजे औद्योगिकीकरणाचे कडवे विरोधक... या गैरसमजुतींना छेद देत सुधींद्र कुलकर्णी यांनी ‘म्युझिक आॅफ द स्पिनिंग व्हील’ या पुस्तकाद्वारे गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाची अपरिचित बाजू वाचकांपुढे आणली आहे...
सुधींद्र कुलकर्णी हे पूर्वाश्रमीचे नामवंत इंग्रजी पत्रकार व भाजपच्या ‘थिंक टँक’चे महत्त्वाचे सदस्य. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी असताना (1998-2004) त्यांनी पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्या आधी लालकृष्ण अडवाणी भाजपचे अध्यक्ष असताना त्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी क ाम पाहिले. ते स्वत:देखील भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून दिल्लीत कार्यरत होते. एकूणच भाजपचे विचारवंत लेखक, तसेच उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे नेते अशी त्यांची आजवरची ओळख. कुलकर्णी ज्या पक्ष वा संघटनेशी नाते सांगतात, त्या भाजप काय किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोहोंचे विचार आणि कार्य लौकिकार्थाने गांधी विचारांशी जुळणारे नाहीत. मात्र, असे असताना सुधींद्र कुलकर्णी यांनी सखोल अभ्यास करून महात्मा गांधींवर एक जाडजूड पुस्तक लिहावे, या कुतूहलापोटी मी तीनेकमहिन्यांपूर्वी ‘म्युझिक आॅफ द स्पिनिंग व्हील’ हे प्रस्तुत पुस्तक वाचायला घेतले.
आजवर गांधीजींवर हजारावर पुस्तके लिहिली गेली आहेत. देशोदेशीचे अनेक लेखक गांधीजींवर आजही संशोधन करत आहेत. गांधीजींविषयीची नवनवीन माहिती, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू जगापुढे आणत आहेत. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांचे हे पुस्तक गांधीजी ही व्यक्ती आणि विचार अशा दोहोंबद्दलचे आकलन विस्तारणारे ठरले आहे.
‘स्पिनिंग व्हील’ म्हणजे चरखा. चरखा हीच गांधीजींची ओळख. गांधीजी सूत कातण्यासाठी बराच वेळ चरख्यावर बसायचे, ग्रामोत्थान आणि खेड्यात राहणा-या भारतीयांची क ाळजी वाहायचे; परंतु उद्योग, विज्ञान यांकडे त्यांचा कल नव्हता, त्याला ते विरोध करायचे, असा समज आतापर्यंत कायम होता. त्या समजालाच छेद देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.
चरखा आणि गांधीजी यातील अन्योन्य संबंध उलगडून सांगताना लेखकाने एकेठिकाणी गांधीजींचे पुढील वाक्य उद््धृत केले आहे, ‘खादीचा प्रचार करून मी वा-याच्या विरुद्ध दिशेला माझे ‘स्वराज’ जहाज वल्हवत आहे, जे बुडणार आहे. मी देशाला ककळोखात ढकलत आहे.’ त्याचबरोबर वर्धा येथे भारतीय विणकर असोसिएशनच्या प्रतिनिधींसमोर बोलताना गांधीजींनी व्यक्त केलेली, ‘काँग्रेसने चरखा स्वीकारला जरूर; परंतु आनंदाने नव्हे, तर माझ्या दबावामुळे’ अशी मनातला सलही लेखकाने वाचकांपुढे आणला आहे.
भारतात जे चित्र आज दिसत आहे, त्यात ग्रामीण विकास संपूर्ण थांबल्यासारखा आहे, बेरोजगारी वाढत आहे, विज्ञान आणि औद्योगिकीकरणामुळे नवे व गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गांधीजींसारख्या द्रष्ट्या विचारवंताला हे सगळे आधी दिसत होते का? म्हणूनच तर ते साधी राहणी, नैतिकता, विज्ञान व अर्थशास्त्र यांची वेगळीच सांगड घालून दाखवत होते का? असे विचारप्रवृत्त करणारे प्रश्नही लेखकाने या पुस्तकाद्वारे मांडले आहेत. गांधीजींच्या चरखा वापरण्यामागे समाजाला जवळ आणणे, स्वत:च्या पायांवर उभे करणे, ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणे, असे व्यापक समाजभान दडले होते, हेही लेखकाने स्पष्ट केले आहे. आज इंटरनेट व त्या ओघाने आलेले नवीन आविष्कार याच गोष्टी साध्य करून देत आहेत; पण थोड्या वेगळ्या मार्गाने, याचीही आठवण या निमित्ताने लेखकाने करून दिली आहे.
लेखक पुढे म्हणतो, आजच्या इंटरनेटच्या तंत्रज्ञानाने जे साध्य होत आहे तेच गांधीजींना चरख्याच्या माध्यमातून त्या काळी साधायचे होते. चरख्याद्वारे त्यांना एक असे नवे जग निर्माण करायचे होते, जेथे हिंसा नव्हे, अहिंसा असेल. एकमेकांवर अवलंबून असलेला समाज असेल आणि सहकार्य व नैतिकतेला त्या समाजात सर्वोच्च प्राधान्य असेल. संशोधनाअंती लेखक असेही मत मांडतो क ी, वारबर्ट विनर, अ‍ॅलन ट्युरिंग, व्हॅनव्हर बुश, जॉन पोस्टेल, रिचर्ड स्टॉलमन व बिल जॉल, तसेच अ‍ॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज आदी जगभरातल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रतिभावंतांवर गांधींच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. इतकेच नव्हे, तर जॉब्ज महात्मा गांधींना ‘हीरो’ मानायचे, असे जॉब्जच्या चरित्रात लिहिल्याचा संदर्भही येथे लेखकाने दिला आहे.
एकूणच गांधीजींच्या चारित्र्यात, वर्तणुकीत खादी, चरखा व ग्रामोद्योग हे सामाजिक, आर्थिक, राजकीय उत्कर्ष साधण्याची प्रभावी साधने होती. पण त्या काळातही लोक त्यांना विरोध करायचे. पण आज जग जेव्हा सतत नवनवीन तांत्रिक संशोधने करत आहे, तेव्हा गांधीजींचे ‘जुने’ विचारच किती सामर्थ्यवान आणि टिकाऊ, दिशादर्शक आहेत हे समजते, असे मत लेखक कुलकर्णी यांनी या पुस्तकाद्वारे मांडले आहे.
गांधीजींचे तत्त्वज्ञान व इंटरनेट युगाशी त्याची सांगड, गांधीजी व न्युक्लियर हत्यारे, गांधीजींनी इंटरनेटचा स्वीकार केला असता का? गांधीजींचा जन्म सन 1869चा व इंटरनेटचा सन 1969चा. बरोबर 100 वर्षांनंतरचा; परंतु दोघांमध्ये काय दुवा असू शकतो? जगप्रसिद्ध वैज्ञानिक आइनस्टाइननी गांधीजींमध्ये काय बघितले? या सगळ्या कुतूहल निर्माण करणा-या प्रश्नांचा अत्यंत सुसूत्रपणे मागोवा घेण्यात लेखक कमालीचे यशस्वी ठरले आहेत. किंबहुना, प्रवाहाबाहेरचा विषय निवडून लेखकाने या पुस्तकाद्वारे गैरसमजुतींपलीकडचे गांधीजी वाचकांसमोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, असेच मी म्हणेन.
गांधीजी कधीही तंत्रज्ञानाचे विरोधक नव्हते. ते आज जिवंत असते तर कदाचित त्यांनी इंटरनेट आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी अधिक प्रभावीपणे केला असता. ते नेहमीच म्हणायचे की, मानवाचे शरीर सर्वात मोठे यंत्र (मशीन) आहे आणि त्याची नीट निगा राखणे, त्यासाठी उपवास, व्यायाम, योग व चालणे तसेच मेंदूचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करणे, कमीत कमी गरजा ठेवणे हे सगळे विचार आजच्या चंगळवादी, पण धकाधकीच्या आयुष्यात प्रेरणादायी ठरणारे आहेत. खरे तर गांधीजींचेच विचार आजच्या काळातही समाजाला योग्य दिशा दाखवणारे ठरत आहेत, असेही हे पुस्तक पदोपदी सूचित करत असते. पाच मोठ्या विभागांत 36 प्रकरणे व त्यात विस्तृत माहितीचे प्रदीर्घ लेख असे स्वरूप असलेल्या या पुस्तकाचे एकेक पान, एकेक प्रकरण युवा पिढीने; त्यातही राजकारणी मंडळींनी पुन:पुन्हा वाचण्याजोगे, अभ्यासण्याजोगे आहे. हेच या पुस्तकाचे वेगळेपणही आहे.
म्युझिक ऑफ द स्पिनिंग व्हील
महात्मा गांधीज् मेनिफेस्टो फॉर इंटरनेट एज
सुधींद्र कुलकर्णी, अ‍ॅमरिलीस प्रकाशन
किंमत 595, पाने 725