आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Books Of Stress Management, Meditation And Stress To Solve By Books

मन:शांती व तणावमुक्तीवरील उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल प्रत्येक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती एका अदृश्य दबावाखाली जगत असते. हा दबाव म्हणजे वेगवेगळे ताणतणाव. आपापल्या क्षेत्रात यश-प्रगतीसाठी प्रयत्न सुरू असतोच. अडचणी, संकटं हा जगण्याचा भाग असूनही ते नीट न स्वीकारण्याने ताणतणाव डोकं वर काढतात. या ताण-तणावानं जगणं असह्य होऊ लागतं. ज्यांना जीवनात आनंद अनुभवायचा असतो, त्यांच्यासाठी या पुस्तकात अनेक उपाय सुचवलेले आहेत. तणावमुक्तीसाठी ते सोपे आहेत. त्यांचा उपयोग केल्यास आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल. त्याकरिता प्रयत्न मात्र करावयास हवा. आयुष्यात अडचणी, संकटं येत राहणारच, पण त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची कास धरली पाहिजे. माणसाची सर्व धडपड आनंदी जगण्यासाठीच असते. तिकडं जाण्यासाठी सांगितलेले उपाय एकदा अनुभवूनच पाहा. ते संकटांचा सामना करणार्‍या औषधासारखे उपयोगी ठरतील. सोप्या भाषेतील हे पुस्तक सर्वांना अंतर्मुख करायला जरूर लावते.

बर्‍याचशा लोकांबाबत चाळिशीपर्यंतचा काळ उच्चतम असतो, जेव्हा ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या सर्वाधिक कार्यक्षम असतात. चाळिशीनंतर दिवसेंदिवस त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. या पुस्तकात दिलेले उपाय, तंत्र, क्लृप्त्या यांचा योग्य तो उपयोग केल्यास निश्चितपणे तारुण्यातील मानसिक व शारीरिक क्षमता आपण एेंशी वर्षापर्यंत टिकवू शकता. या पुस्तकाच्या उपयुक्ततेबाबत लेखक असे म्हणतात की, यातील क्लृप्त्यांचा तीन महिन्यांपर्यंत दररोज प्रयोग करून त्या अमलात आणल्या तर जीवनात आमूलाग्र बदल घडवतील.

पुस्तकातील प्रकरणे पुढीलप्रमाणे : तणावाला समजून घ्या, तणावरहित आयुष्यासाठी, तणावमुक्तीसाठी सकारात्मक मार्ग, तणावाच्या नियोजनासाठी मन:शक्तीचा वापर, आयुष्यातील चढउतार, आरोग्याचे यंत्र - राजयोग, राजयोगाचे आकलन ही प्रकरणे आहेत. यातून बहुतेक सर्वच शंकांचे निरसन होऊ शकते. या पुस्तकात अधूनमधून टिप्स आणि महान मान्यवर व्यक्तींचे ताणतणावाबाबतचे सुविचार आहेत. प्रत्येक प्रकरणातील काही ठळक मुद्दे, लीड वा सारांश विचार बोल्ड टाइपमध्ये दिले आहेत. त्याचबरोबर उदाहरणासंह समजावून सांगितलेले आहे. तणावाची कारणे, दुष्परिणाम, उपाय इ.सह त्यावरील फॉर्म्युले दिलेले आहेत. त्यामुळे विचार व पुस्तक समजण्यास सोपे जाते. मुद्देसूदपणा व शास्त्रीयदृष्ट्या एखादी गोष्ट समजावून सांगणे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य वाटते.

पुस्तकाचे नाव : स्ट्रेस मॅनेजमेंट-तणावातून मन:शांतीकडे
लेखक : डॉ. गिरीश पटेल, अनुवाद : राजश्री खाडिलकर
प्रकाशन : साकेत प्रकाशन, औरंगाबाद-पुणे.
पृष्ठसंख्या : 166, शुल्क : 140 रुपये.