आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुनी तरुणाई: दहा कार्यकर्त्यांची आत्मकथने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय राहिलेले लोक हळूहळू निराश होत गेले. 1980चे दशक येता येता बरेचसे काळाच्या पडद्याआड गेले. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली पिढी एव्हाना मोठी झाली होती. त्यांच्या आकांक्षांना पंख फुटले होते. पण वास्तव भीषण होते. गरिबी, बेरोजगारी, महागाई, जातीयवाद, धर्मवाद त्यात राजकीय व प्रशासकीय भ्रष्टाचार यामुळे देश पुरता खंगून गेला होता. आपले भविष्य काय, ही प्रत्येक युवकाला चिंता वाटू लागली. अशा काळात नवयुवक रस्त्यावर आले. 1980चे ते दशक युवकांचे होते. गुजरात, मराठवाडा आणि बिहारचे तरुण आंदोलनात उतरले. या तरुणांना स्वातंत्र्य आंदोलनातील युवा नेते जयप्रकाश नारायण यांचे प्रतिभासंपन्न नेतृत्व लाभले. ‘कोणत्याही प्रस्थापित विचारधारेने देशाचे प्रश्न सुटणार नाहीत, आपण आपला मार्ग शोधला पाहिजे’, यासाठी जे.पीं.नी देशातील युवकांना ‘संपूर्ण क्रांती’ची हाक दिली. जे.पी. म्हणायचे, मला ‘धुनी’ युवकांची ‘तलाश’ आहे. बिहारमधील युवकांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यापाठोपाठ महाराष्टÑातील तरुणांनी जे.पीं.च्या हाकेला ओ दिली.

जे.पीं.नी या युवकांसाठी ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ नावाची संघटना स्थापन केली. महाराष्टÑातील शेकडो ‘धुनी’ तरुण या संघटनेत आले. त्यापैकी दहा युवकांची आत्मकथने ‘धुनी तरुणाई’ या पुस्तकात प्रकाशित करण्यात आली आहेत. प्रसिद्ध साहित्यिक मिलिंद बोकील आणि अमर हबीब यांनी या संकलनाचे संपादन केले आहे. मिलिंद बोकील यांनी या पुस्तकासाठी प्रदीर्घ प्रस्तावनाही लिहिली आहे. ती जशी इतिहासाचा पट उलगडणारी आहे, तशीच कार्यकर्त्यांच्या मनाचे पट स्पष्ट करणारी आहे. रजिया पटेल, अरुणा तिवारी, चंद्रकांत वानखडे, मोहन हिराबाई हिरालाल, भीमराव मस्के, शोभा शिराढोणकर, कुंजबिहारी, शैला सावंत, शेषराव मोहिते आणि अमर हबीब या दहा जणांनी आयुष्याच्या वाटचालीतील ‘वाहिनीचे दिवस’ टिपले आहेत. ही कार्यकर्त्यांची मनोगते आहेत. त्यामुळे कोणी त्यात भाषेचे सौंदर्य वा साहित्यिक कलाकुसर शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची निराशा होईल. 1980च्या दशकातील तरुणांच्या हृदयाची स्पंदने मात्र त्यात स्पष्ट ऐकू येतील. जीवन, समाज समजावून घेण्यासाठी व ते बदलण्यासाठी अधीर असलेल्यांची ही मन:स्पंदने आहेत.

चळवळी होतात. कार्यकर्ते आपली आयुष्ये झोकून देतात. काही जण निराशही होतात. काही जण आज नाही तर उद्या प्रकाश दिसेल, या आशेने चालत राहतात. अशा कार्यकर्त्यांचा इतिहास नोंदला जात नाही. वाहिनीच्या कार्यकर्त्यांचीदेखील कोणतीच अधिकृत नोंद नव्हती.

या पुस्तकाने अशा नोंदींचे महत्त्व अधोरेखित केले आहे. निरनिराळ्या चळवळीतील कार्यकर्त्यांची आत्मकथने काळाच्या पोटात गडप असलेले वास्तव उजळ करतात, हे या पुस्तकावरून दिसून येते. ही आत्मकथने वाचून जे.पीं.च्या आंदोलनाचे सूक्ष्म धागे उलगडता येतील. एकूणच कार्यकर्त्यांची ही बोलकी आत्मकथने जरूर वाचावीत अशी आहेत.

‘धुनी तरुणाई’ संपादक- मिलिंद बोकील व अमर हबीब,
पाने-160, किंमत- 150 रुपये,
प्रकाशक- परिसर प्रकाशन, अंबाजोगाई
(asha.waghmare@gmail.com)